"उद्योग निर्माण" - श्री. राजेंद्र सावंत आणि श्री. अजित मराठे ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 November 2011

"उद्योग निर्माण" - श्री. राजेंद्र सावंत आणि श्री. अजित मराठे

बॉर्न२विनच्या कार्यक्रमात डोळे ऊघडणारी, ऊद्बोधक मुलाखत.
 बॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यवेध सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यात  निर्माण रीअलटर्स अॅन्ड डेव्हलपर्स लिमिटेडचे चेअरमन राजेंद्र सावंत आणि कार्यकारी संचालक अजित मराठे हे दोन मान्यवर प्रमुख पाहुणे होते. बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी दोघांची मुलाखत घेतली. ही मुलाखत अनेक दृष्टीने ऊद्बोधक होती, नव्हे डोळे ऊघडणारी होती.
राजेंद्र सावंत आणि अजित मराठे दोघेही इंजिनिअर. पार्ल्याच्या परांजपे विद्यालयात अगदी लहानपणापासून ते एकत्र शिकत. राजेंद्र संपन्न वर्गातील तर अजित निम्न मध्यम वर्गातील, दोघांच्या जाती वेगळ्या. पण या कशाचा अडथळा न येता ते दोघे घनिष्ट मित्र झाले, कारण त्या दोघांची उंची. ती जास्त असल्याने दोघांना मागच्या बाकावर बसावे लागे- बॅकबेंचर्स! पण बॅकबेंचर्स असूनही दोघांनी इंजिनिअरींगची पदवी घेतली. अजित यांनी इंजिनिअरींगची पदवी घेतल्यानंतर दोन वर्षे संघाचा स्वंयसेवक म्हणून पूर्ण वेळ काम केले. राजेंद्र यांनी त्यांच्या वडिलांना बांधकाम व्यवसायात मदत करणे सुरू केले. रायगड मिलीटरी स्कूलचे मोठे काम त्यांना करायला मिळाले व त्यातून खूप शिकायले मिळाले. पुढे वडिलांबरोबर व्यवसाय कसा करायचा यावरून मतभेद झाले. ते घराबाहेर पडले. ते व अजित यांनी मिळून व्यवसायच करायचे ठरवले. श्रीमंत व्हायचे असेल तर धंदा करणे आवश्यक हा स्पष्ट विचार त्यांच्या मनात होता. राजेंद्र यांनी वडिलांबरोबर व्यवसाय केला होता, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील कामाचा त्यांना अनुभव होता. इंजिनिअरींगची पदवीबरोबरच राजेंद्र यांच्या मते एफइ युनिव्हर्सिटीचे मौल्यवान शिक्षण गाठीशी होते. एफइ युनिव्हर्सिटी म्हणजे फिल्ड एक्सपिरीयन्स युनिव्हर्सिटी!

ह्या दोघांना पहिले काम मिळाले ते पाच हजार रुपयात एका घराचे पेंटींग करण्याचे. स्वत: रंगकाम केले. अशी छोटी कामे करत असताना १९९४मध्ये, अजित यांच्या मावशीने सुचवले, त्यांचा नेरळला प्लॉट आहे, तो प्लॉट विकसित करा. बदल्यात पैसे नकोत, दोन फ्लॅट द्या. हा प्रस्ताव म्हणजे जणू एक खाण मिळाली. या प्लॉट योजनेच्या भूमीपुजनाच्या दिवशी तेथिल बारा प्लॅटपैकी सहाचे बुकींग झाले. इतकच नाही तर तिथे नंतर असे अनेक प्रस्ताव त्यांच्याकडे चालून आले. राजेंद्र यांनी या योजनेची सुरवात करताना उद्गार काढले होते, इथे निर्माण नगरी होणार आहे. ते उद्गार सार्थ ठरवत या जोडीने तिथे पंचवीस इमारती बांधल्या.

अतुल राजोळी उपस्थित प्रेक्षकांना संबोधताना
या दोघांच्या कंपनीचे काम अशा प्रकारे सुरू होते. पण बांधकाम व्यवसाय हा अतोनात पैसा आवश्यक असणारा उद्योग आहे. २००२ पर्यंत ते कामे मिळवत होते, पूर्ण करत होते, पण आर्थिक बाजूचा फारसा विचार न करता. बरीच वर्षे कॅश फ्लोची समस्या होती. डोक्यावर चाळीस लाखाचे कर्ज झाले होते. अनेकदा त्यांच्या मनात विचार यायचा, उगाच धंद्यात पडलो. दोघांनी त्याच सुमारास लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स केला. या कोर्समुळे मात्र त्यांच्या काम करण्याच्या पध्दतीत आमूलाग्र बदल झाला. डेलिगेशन हा शब्द त्यांनी इथे ऐकला आणि तो प्रत्यक्ष अंमलात आणला. काम मिळाल्यानंतर त्यातच गुंतून न राहता, ते पूर्ण करण्याची जबाबदारी योग्य व्यक्तींवर सोपवून, त्यावर देखरेख करण्याचे काम स्वत:कडे घेणे असे धोरण त्यांनी स्वीकारले. यामुळे जास्त कामे ते घेऊ शकले. तसेच त्रयस्थपणे नजर ठेवल्याने गुणवत्ता राखली जात आहे याची खात्री बाळगतानाच, त्यातून उचित नफा कसा मिळवायचा तेही लक्षात आले. कंपनीकरता व्हिजन काय असावी त्यांनी ठरवले. अशा प्रशिक्षणाचा कोर्सचे या दोघांना इतके महत्व वाटते की ते सतत दर सहा महिन्यांनी असे नवे नवे कोर्स करत असतात. आपल्या कर्मचार्‍यांना सतत प्रशिक्षणाचा देतात. असे कोर्स म्हणजे स्वत:चा नव्याने शोध घेणे म्हणता येईल. लॅंडमार्क फोरमचा प्रशिक्षणाचा कोर्स करून तर जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलली असे ते म्हणतात. आपल्याकडे काही विचारवंत व्यक्तीमत्व विकास प्रशिक्षणाचे कोर्स इत्यादी म्हणजे एकाच छापाची माणसे घडवणे, थोतांड वगैरे त्याला नावे ठेवतात. त्यांचे डोळे उघडायला हरकत नाही.
अर्थात व्यवसाय वाढवताना पैसा कुठून आणायचा हा फार मोठा प्रश्न होता. राजेंद्र म्हणतात ओपीएम हे भांडवल म्हणजे अदर पीपल्स मनी!  तुमची सचोटी, तुमचे नाव हे तुमचे भांडवल. तुम्ही जर शर्यतीत जिंकणारे घोडे असाल तर लोक तुमच्यावर पैसे लावणार. लोक पैसे देतात ते चॅरीटी म्हणून नाहीच वा बिनव्याजी नाही. त्यांनी दिलेल्या पैशावर त्यांना योग्य परतावा मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. तो त्यांना देऊन स्वत:ला वाजवी नफा मिळायला हवा. हे गणित जमले तर एफइ युनिव्हर्सिटीच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन तुम्हाला यशस्वी उद्योजक ही पदवी मिळणार!


'उद्योग निर्माण' मुलाखत रंगात आली असताना...
पार्टनरशिप टिकली आहे, अशी उदाहरणे कमी आहेत. त्याबाबत राजेंद्र सांगतात, प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे. ती टिकवण्याचे त्यांनी नियम सांगितले ते असे: योग्य पार्टनर निवडता आला पाहिजे. एकमेकांबरोबर थेट संवाद होणे फार महत्वाचे आहे. मला न विचारता निर्णय का घेतला असा इगोचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ नये म्हणून संवाद हवाच. एकमेकांबद्दल विश्वास हवा. तसेच स्वत:ची व पार्टनरची सामर्थ्यस्थाने ओळखता आली पाहिजेत. राजेंद्र म्हणतात मी क्रिएटर आहे, मी नवनवीन आयडिया देतो, पण अमंलबजावणीत कमी पडतो हे ते मोकळेपणाने सांगतात.
अजित पार्टनरशिपबाबत सांगतात, मतभेद झाले असा सुगावा लागला तरी लोक आगीत तेल ओतायला तयार असतात. इतकेच काय मतभेद नसतानाही लोक एकमेकांविषयी काय बोलतात, त्याऐवजी स्वत:च एकमेकांशी बोला. मनातून स्पष्टता हवी. व्यवसाय करताना प्रत्येक बाबतीत दोघांचे मत तंतोतंत जुळणार नाही. त्यातून कटूता येऊ शकते. तिचे लगेच निराकरण व्हायला पाहिजे. एक मार्मिक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला. पार्टनरशिप आहे म्हणून एकमेकांच्या घरात हस्तक्षेप करायचा, दुसर्‍याच्या घरात जास्त लक्ष घालायचे हे टाळलेच पाहिजे. त्यात अंतर राखायला हवे. खूप जिव्हाळ्याचे मैत्र असले तरी एकमेकांना स्पेस दिली पाहिजे. राजेंद्र हे लिडर आहेत असे अजित दिलखुलासपणे म्हणतात. महत्वाचा प्रस्ताव घेऊन कोणी आले तर पहिली मिटींग राजेंद्र यांच्याबरोबर होते, मग अजित ते काम पुढे नेतात.
मैत्रीच्या भक्कम पायावर त्यांच्या पार्टनरशिपची टोलेजंग इमारत ऊभी आहे.
लघुउद्योजकांना चांगली माणसे मिळत नाहीत, मिळाली तरी टिकत नाहीत ही समस्या नेहमी ऐकू येते. अजित त्याबाबत म्हणतात, नवी नवी माणसे आणा, तुमच्यापेक्षा हुशार माणसे आणा. ही चांगली माणसे तुमच्यासाठी पैसा कमावतील. ही माणसे छोट्या कंपनीत का येतील? जर तुमच्याकडे व्हिजन असेल तर येतील. वाढीच्या मार्गावर असलेल्या कंपनीत राहून त्यांचीही वाढ होत जाईल म्हणून येतील. कामाचे समाधान हा महत्वाचा मुद्दा आहे. मी सांगेन ते, तसच आणि तेवढेच करा म्हणजे ओझ्याचे हमाल व्हा, अशा पध्दतीने माणस असमाधानी राहतील. त्यांच्यावर कामाची जबादारी दिली पाहिजे, डेलिगेशन पाहिजे. ते केल्यानंतर त्यांच्यामागे ऊभे राहून त्यांच्या खांद्यावरून बघत त्यांना काय करायचे बारिकसारीक सूचना देत राहू नका. तुम्ही डेलिगेशन केले नाहीत तर अपवर्ड डेलिगेशन होते, म्हणजे हाताखालचा माणूस तुम्हाला कामाल लावतो, कारण तो प्रत्येक काम घेऊन तुमच्याकडे येतो आणि काय करू विचारतो! कामाची एक सुनियोजित व्यवस्था निर्माण केली पाहिजे. दैनंदिन व्यवहारातील आपल्या हस्तक्षेपाशिवाय कंपनी सुरू राहिली पाहिजे म्हणून टीम हवी. कर्मचार्‍यांची वृत्ती व सचोटी याला ते महत्व देतात. आवश्यक असेल तर कर्मचार्‍यांची मानसिकता बदलणे गरजेचे ते म्हणतात.  राजेंद्र म्हणतात लोक काम का करतात याच्या पाच प्रेरण आहेत. भीती, पैसा, कामाची दखल घेतली जाणे, त्याबद्दल शाबासकी, मालकाचे नेतृत्व, श्रद्धा उदा: देश, धर्म यासाठी लोक काम करतात. मग पैसा हा त्यांच्यासाठी बाय-प्रॉडक्ट असतो.
यशस्वी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्कार स्विकारताना
बिल्डर म्हटल्यावर एक प्रतिमा डोळ्यासमोर येते, शब्द बदनाम झाला आहे याबाबत राजेंद्र सांगतात, त्यांच्या आईने त्यांना सांगितले सामान्य माणूस आपल्या आयुष्याची कमाई विश्वासाने तुमच्या हवाली करतो, त्यांचा विश्वास सार्थ करा. आईला दिलेला शब्द ते कसोशीने पाळतात. लोक काय बोलतात यापेक्षा ग्राहक समाधानी आहेत याचा त्यांना आनंद आहे. स्वत:चे मन साफ आहे. लोकांचा इतका विश्वास निर्माणने कमावला आहे की लोक त्यांच्याकडे मुदतठेवीत पैसे ठेवतात तेही फक्त १२ टक्के व्याज मिळत असताना, कारणे इथे ठेवलेले पैसे सुरक्षित आहेत हा त्यांचा विश्वास आहे. प्लॅटचे शंभर टक्के पेमेंट ते चेकने घेतात. चुक होणे आणि फसवणूक यात फरक आहे. त्यांच्या हातूनही कधी चुक होऊ शकते, पण त्याची दुरुस्ती केली जाते यामुळे विश्वास टिकून राहतो.

सहसा उद्योजकांची आपल्याला प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये अशी इच्छा असते. पण निर्माण मात्र आपले ज्ञान शेअर करण्यावर विश्वास ठेवते. पन्नास मराठी बिल्डर त्यांना तयार करायचे आहेत. त्यांनी साडे तीन वर्षांचा कोर्स त्याकरता तयार केला आहे. बिल्डरच्या हाताखाली बिल्डर ही संकल्पना त्यांनी अंमलात आणली.
प्रत्येक मोठा माणूस पार्टनरशिप करूनच मोठा झाला आहे. पार्टनरशिप हाच विकासवृध्दीचा एकमेव मार्ग आहे.
अजित यांनी एक चांगली आयडीया सुचवली. समजा व्यवसायातील उलाढालीचा ५००० कोटी रुपयांचा टप्पा साधायचा आहे. मग अशा उद्योजकाला जाऊन भेटा, ज्याची तितकी उलाढाल आहे. त्याच्याबरोबर सहज बोलूनही काही नवीन गोष्टी समजू शकतात. अजित व राजेंद्र दोघे दीपक घैसासना भेटले, तेही डिनरच्या निमित्ताने. ह्या एका बैठकीतून आर्थिक बाजू कशा बघावा लागतात त्याबाबतची माहिती त्यांना मिळाली. आपल्या व्यवसायाचे प्रॉफीट सेंटर काय आहे, कुठून नफा होतो ते शोधणे ही कल्पनाही अजित यांनी सांगितली.
काम व कुटुंबासाठी वेळ देणे, यांच्यात कसा समन्वय साधता हा एक हमखास प्रश्न असतो. त्याबाबत ते म्हणतात, २००२ पर्यंत आम्ही कामात सतत व्यस्त असायचो. घराकडे लक्ष दिले नाही. ते संघर्षाचे दिवस होते. नंतर घडी बसल्यावर व डेलिगेशन करणे सुरू केल्यावर आता वेळ देऊ शकतात.

मराठी उद्योजक म्हटल्यावर समाजसेवेची अपेक्षा असते. उद्योजक स्वत: त्यात गुंतला तर व्यवसायाकडे दुर्लक्ष होणार हा धोका त्यात असतो. परंतु निर्माणने त्याचीही एक सुनियोजित प्रणाली तयार केली आहे. प्रत्येक प्लॅटमागे ते पाच हजार रुपये समाजासाठी बाजूला काढून ठेवतात. त्यातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल शंभर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातो.

यापुढील व्हिजनबाबत ते सांगतात, आम्हाला कधीच रहेजा, हिरनंदानी बनायचे नव्हते. एल अॅन्ड टी सारखी एक उत्तम नाव असलेली कंपनी व्हावे असे वाटते. आणखी तीन वर्षांनी वार्षिक उलाढाल पाच हजार कोटीपर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. आज त्यांचे चाळीस प्रकल्प सुरू आहेत. भारतातील पहिल्या पाच बिल्डरपैकी एक त्यांना व्हायचे आहे. या उद्दीष्टांबरोबरच राजेंद्र यांनी एक उद्दीष्ट सांगितले ते अक्षरश: क्रांतिकारी म्हणावे असे आहे. मराठी समाज म्हणजे धंदा करणारा समाज अशी समाजाची ओळख असावी अशी त्यांची महत्वाकांक्षा आहे. असा विचार सुचणे हीच परिवर्तनाची नांदी आहे.
बॉर्न२विन आपल्या प्रशिक्षणातून उद्योजकांना प्रेरित करत असतेच, पण अशा कार्यक्रमातून सातत्याने उद्योग व अर्थक्षेत्रातील मान्यवरांना, लोकांसमोर आणून त्यांचे उद्बोधन करत असते, त्यामुळे राजेंद्र यांची महत्वाकांक्षा पूर्ण होईल अशी आशा वाटते.


उदय कुलकर्णी  ९८६९६ ७२६९६
kuluday@rediffmail.com

3 comments:

pushkar Mantri said...

अजित व राजेंद्र यांची दोस्ती शोलेमधील जय वीरूप्रमाणे आहे. जियेंगे साथ उद्योग करेंगे साथ और सबको आगे ले जाएंगे साथ हा त्यांचा मंत्र आहे. स्वत:च्या उद्योगातील महत्वाच्या गोष्टी शेअरकेल्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला. खास करून कावळा व ईगो याची गोष्ट खूपच उद्बोधक होती. त्या दोघांचे व बॉर्न टू व्हीनचे खूप खूप आभार.

Anonymous said...

karach abar

Anonymous said...

vaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites