भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! - दिपक घैसास ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

08 September 2012

भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! - दिपक घैसास


‘भविष्यावर अवलंबून राहू नका, तुम्हीच तुमचे भविष्य निवडा! आजच्या तरूणाईने निव्वळ सुशिक्षित न होता ई-शिक्षित पण व्हावे कारण काळाची ती गरज आहे’, असे प्रतिपादन प्रसिध्द उद्योजक दिपक घैसास यांनी केले. वीर सावरकर सभागृह, दादर येथे बॉर्न टू विनच्या बाराव्या ‘लक्ष्यसिद्धी सोहळा : वेध भविष्याचा’ या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा आणि बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आणि अमेय आमरे आदी मान्यवर उपस्थित होते.


भविष्याचा वेध घेत दिपक घैसास यांनी यावेळी आईनस्टाईनच्या सूत्राचा आधार घेत यशस्वी होण्याचे नवीन सूत्र मांडले ते म्हणजे G = MC2. G = Growth (वाढ), MC2 म्हणजेच Ability to manage the change (बदल घडविण्याची क्षमता) असेल तर वाढ निश्चितच होते. बदल हा नेहमी सकारात्मक असावा. कोणत्याही उद्योग-धंद्यात परिस्थितीचे आकलन होणे गरजेचे असते. याकरिता कमी बोलून जास्त ऐकण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. कोणतेही सॉफ्टवेअर तयार करताना निव्वळ इंजिनिअर असून फायद्याचे नसते तर त्या क्षेत्रातील अद्ययावत माहिती असणे देखील तेवढेच महत्त्वाचे असते. माहिती मिळेल तेवढी जमवत रहा, परंतू ती कधी वापरायची हे माहित असणे देखील तेवढेच आवश्यक आहे. भविष्यामध्ये पारंपारिक उद्योग-धंद्यापेक्षा माहिती तंत्रज्ञान, जैव-तंत्रज्ञान, व्हर्चुअल बॅंकिंग, इंटरनेट टिव्ही, ऍनिमेशन यावर आधारीत उद्योगधंदयांची प्रगती जास्त असेल शिवाय सांघिक प्रयत्नांच्या आधारावर हे लवकर साध्य होईल अशी भविष्यवाणी त्यांनी केली.

भविष्याचा वेध घेऊनच आपण माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राकडून जैविक तंत्रज्ञानाकडे वळलो आणि जेनकोव्हल स्ट्रॅटजिक सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड या  स्कंधकोशिका (Stem Cell) संवर्धन करणाऱ्या कंपनीची स्थापना केली.  बॉर्न टू विन नवीन उद्योजकांना घडविते हे नक्कीच कौतुकास्पद आहे, त्याबद्दल अतुल राजोळी यांचे अभिनंदन. भविष्यात संपूर्ण जगभरात बॉर्न टू विनचा झालेला शाखाविस्तार पाहायला आपणांस आवडेल, असे गौरवोद्गार दिपक घैसास यांनी काढले.


 या सोहळ्यादरम्यान पंढरपूर येथील प्रभा हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका मंगलताई शहा यांचा त्यांच्या समाजकार्याकरिता बॉर्न टू विनतर्फे सत्कार करण्यात आला. मंगलताई शहा या पालवीच्या माध्यमातून ५२ एचआयव्ही बाधित लहानग्यांचा सांभाळ करतात. सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की ‘नितीमत्ता, नैतिकता, सचोटी नसल्याने समाजात वाईट प्रवृत्ती बोकाळल्या आहेत. नियतीचे भोग वाट्यास आलेल्या या मुलांना आपल्या मायेची गरज आहे. येथे रामाचे मंदीर बांधण्याची लोकांना इच्छा आहे परंतू खरा राम कोठे आहे’, असा खडा सवाल मंगलताईंनी यावेळी केला. पंढरपूरास कधी गेलो तर पांडूरंगाचे दर्शन घेण्याअगोदर मी पालवीचे दर्शन घेईन, असे भावोत्कट उद्गार दिपक घैसास यांनी काढले. बॉर्न टू विनतर्फे संकलित केलेले सव्वादोन लाख रुपये ‘पालवी’करीता मंगलताई शहा यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. तसेच पालवी संस्थेतील एका मुलाचे पालकत्व बॉर्न टू विनने यावेळी घेतले.


 ‘उद्योग-धंदा करताना अडचणी, परिस्थिती, आर्थिक मंदी, बाजारपेठेतील अनिश्चितता अशी शंभर कारणे आम्हाला उद्योजक सांगतात. मात्र प्रशिक्षणानंतर त्यांच्याकडे यावर दोनशे उत्तरे तयार असतात. मराठी तरूणांना मराठी उद्योगविश्वातील दिग्गजांचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता यावे, त्यांचे मार्गदर्शन लाभावे याकरिता प्रत्येक लक्ष्यसिद्धी सोहळ्यास उद्योगविश्वातील असामान्य व्यक्तिमत्त्वांना निमंत्रित केले जाते. आतापर्यंत निर्माण ग्रुपचे अजित मराठे, राजेंद्र सावंत, कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, राजकीय विश्लेषक उदय निरगुडकर, एल ऍण्ड टीचे वाय.एम देवस्थळी, दास ऑफशोअरचे अशोक खाडे आदी मान्यवरांनी लक्ष्यसिद्धी सोहळ्यास वलयांकित केले’, असे बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांनी सांगितले.

या लक्ष्यसिद्धी सोहळ्यादरम्यान बॉर्न टू विनच्या यशस्वी प्रशिक्षणार्थी व प्रशिक्षकांना दिपक घैसास यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 
 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites