दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगा ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

12 January 2013

दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगा


दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगा
अनघा दिघे, सोमवार ३१ डिसेंबर २०१२ 
स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारा एक युगकर्ता संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद. अनेक शास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि उद्योजकांना प्रेरणा देणारे, १८९३ मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे सर्व धर्म परिषद गाजवणारे, भारताचे खरे भारतीयत्त्व सार्थ रीतीने जगापुढे मांडणारे स्वामी विवेकानंद हे थोर देशभक्त होते, रामकृष्ण परमहंस यांचे सच्चे अनुयायी होते आणि भारताच्या पुनर्बाधणीचा महत्त्वपूर्ण असा आधारस्तंभ होते. या अभूतपूर्व, संघटन कुशल आधुनिक योगी पुरुषाचे विचार हे या पुढेही युगानुयुगे लोकांना प्रेरणा देणारे ठरतील-
प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक देश महान बनण्यासाठी पुढील तीन गोष्टी अत्यावश्यक आहेत- चांगुलपणावरील अढळ श्रद्धा, मत्सर आणि संशयी वृत्ती दूर ठेवणे, काही लोक जे चांगले बनण्याचा आणि चांगले काही करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत, त्यांना मदत करणे.
स्वत:सोबत सगळे जग ओढून घेतल्याशिवाय/हलवून सोडल्याशिवाय या जगातील एक अणूदेखील हालचाल करत नाही. जागृतीच्या या लाटेवर जोवर सगळे जग स्वार होत नाही, तोवर खरीखुरी प्रगती होऊ शकत नाही. दिवसेंदिवस ही गोष्ट अधिकाधिक स्पष्ट होत आहे की, जातीयता, राष्ट्रीयता किंवा इतर संकुचित/भुसभुशीत पायावर उभे राहून कुठल्याही समस्येचे उत्तर मिळू शकत नाही. प्रत्येक कल्पना किंवा विचार हा जोवर अखिल विश्वाला गवसणी घालत नाही तोवर समधानकारक प्रगती साधता येणार नाही. समग्र जीवनाला सामावून घेईपर्यंत आकांक्षेची व्याप्ती ही कायम विस्तारत राहिली पाहिजे. गेली काही शतके आपल्या देशाची पिछेहाट झाली आहे. गतकाळातील वैभव/ऐश्वर्य हे आज आपल्याजवळ नाही. असे का, या अधोगतीची अनेक कारणे आहेत. भारतीयांनी बाळगलेला संकुचित दृष्टिकोन तसेच कोतेपणाने आकसून घेतलेली कृतींची सीमीतता हे त्यापकी एक कारण आहे.

प्रत्येकाने जे जे काही छोटेसेदेखील करण्यासारखे आहे ते ते त्याला करू दिले पाहिजे. एखाद्यासाठी कुठला मार्ग हा सर्वोत्कृष्ट आहे, हे त्याला त्याच्या अनुभवावरून कळते. भारताचे भवितव्य हे आपणा सर्वाच्या कामावर अवलंबून आहे. आपली कम्रे पाहा, इतर कोणालाही बोल लावून दोषारोप करू नका. समोर सुरू असलेल्या परिस्थितीचा गंभीरपणे विचार केल्यावर शक्य असेल ती मदत करा. जर तुम्ही मदत करू शकत नसाल तर हाताची घडी घालून शांतपणे बाजूला उभे राहा आणि काय होते, ते नुसते पाहात राहा. मदत करू शकत नसाल तर निदान ईजा पोहोचवू नका. या जगात जर कुठले पाप असेल तर ते केवळ दुर्बलता हे आहे. सर्व प्रकारच्या दुबळेपणास निक्षून नकार द्या. कारण दुर्बलता हे पाप आणि दुर्बलता हेच मरण आहे. उभे राहा, निर्भय व्हा, सामथ्र्यवान बना. संपूर्ण जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घ्या आणि हे जाणा की, तुम्हीच तुमच्या नियतीचे निर्माणकर्ता आहात.
जे इतरांसाठी जगतात, तेच खरेखुरे जीवन जगतात. त्या व्यतिरिक्त इतरांचे जगणे हे मृतवत आहे. तुम्ही नि:स्वार्थी आहात का, हाच तर मूळ प्रश्न आहे. जर खरोखरच तुम्ही नि:स्वार्थी असाल तर एकही धर्मग्रंथ न वाचता, कुठल्याही चर्च किंवा देवळात न जातादेखील तुम्ही परिपूर्ण बनू शकता.
परमेश्वरावर ज्याचा विश्वास नाही तो नास्तिक, असे सनातन धर्म सांगतो; परंतु ज्याचा स्वत:वर विश्वास नाही, तो खरोखरच नास्तिक होय. नवीन धर्मानुसार, नास्तिकाची हीच व्याख्या करता येईल. जोवर तुमचा स्वत:वर विश्वास नाही, तोवर तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकतच नाही. सर्व क्षमता आणि सामथ्र्य हे तुमच्या  आत आहे. यावर संपूर्ण विश्वास ठेवा की, मनात आलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही साकार करू शकता, अगदी काहीही सिद्ध करू शकता.. तुम्ही दुबळे आहात, असे कधीही वाटून घेऊ नका. तुमच्या पुढय़ातील कार्यासाठी कंबर कसून उभे राहा, तुमच्यातील दैवी क्षमता झळकू दे.

बल/ताकद हे जीवन आहे. दुर्बलता हा साक्षात मृत्यु आहे. स्वत:ला दुर्बल समजणे यासारखे सर्वात मोठे पाप दुसरे नाही. जसा विचार कराल, तसे तुम्ही व्हाल. तुम्ही असा विचार केलात की, तुम्ही दुबळे आहात तर तुम्ही दुबळे व्हाल, तुम्ही जर असा विचार धरून ठेवलात की, तुम्ही ताकदवान/बलवान आहात तर खरोखरीच ते सामथ्र्य तुमच्यामध्ये अवतरेल. चांगले असणे आणि चांगले काम करणे हा सर्व धर्माचा सारांश आहे. तुमच्या स्वत:च्या पायावर उभे राहा आणि तुमच्या स्वत:च्या बलावर मरणाचा स्वीकार करा. अगदी कठोर अशा विरोधाच्या परिस्थितीमध्ये, मतभेद जेव्हा फार टोकाचे असतात तेव्हा संपत्ती/पसा अडका हे कामास येत नाहीत. अशा बिकट अवस्थेमध्ये ना तुमचे नाव कामास येते, ना प्रसिद्धी.. ना तुमचे शिक्षण.. केवळ स्वच्छ चारित्र्यच तुमची नौका अशा वादळांमधूनही तारुन नेते.
शिक्षण हा माणसामध्ये बीजरूपात अस्तित्वात असलेल्या उत्कृष्टतेचा आविष्कार असतो. एक कल्पना उराशी बाळगा. ती कल्पना म्हणजे तुमचे जीवनसर्वस्व बनू द्या. तिचाच विचार करा. तिचीच स्वप्ने पाहा. तुमच्या जीवाचे भरण-पोषण हे त्याच कल्पनेवर करा. तुमचे मस्तिष्क, स्नायू, नसान् नसा, तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हा त्या एकच एका कल्पनेने भरून जाऊ द्या आणि दुसरी प्रत्येक कल्पना, प्रत्येक विचार हा तुम्ही बाजूला ठेवा. यशाचा हाच तो राजमार्ग आहे.
ज्या दिवशी तुम्ही कुठल्याही समस्येला सामोरे जात नाही, त्या दिवशी तुमची प्रवासाची दिशा चुकली आहे, याबद्दल खात्री बाळगा. यशस्वी होण्यासाठी, तग धरून राहण्याची प्रचंड क्षमता आणि दुर्दम्य असे मनोबल जरूरी असते. सातत्य टिकवून ठेवणारा जीवात्मा आख्ख्या समुद्राचे पाणीदेखील पिण्याची क्षमता ठेवतो. अशा जीवात्म्याच्या केवळ इच्छाशक्तीने तो पर्वताच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करू शकतो.. या प्रकारची ऊर्जा, या स्वरूपाची दुर्दम्य इच्छाशक्ती बाळगा. खूप मेहनत घ्या आणि तुम्ही ध्येय साध्य केलेले असेल.

कामाशी एकरूपत्व झाल्याने आपण दुखी कष्टी होतोय, असे आपल्याला वाटते. कामातून नव्हे, तर आसक्तीमुळे आपल्या वाटय़ाला दुख/दैन्य येते. प्रत्येक जीवात्मा हा मूळात ईश्वराचाच अंश असतो. बाह्य़ आणि आंतरिक निसर्गावर नियंत्रण ठेवून ही आंतरिक (ईश्वरी) ऊर्जा प्रकट करणे हे या जीवात्म्याचे ध्येय असते. सदैव कार्यरत राहणे, भक्ती करणे किंवा मनावर ताबा मिळवून किंवा तत्त्वज्ञानाच्या आकलनामार्फत हे ध्येय गाठता येते. यासाठी एकाच वेळी, एकापेक्षा अधिक मार्गाचादेखील स्वीकार करता येतो. सर्व धर्माचे हेच ते सारसर्वस्व आहे.
जे झाले आहे, (पुरे केले आहे) त्याकडे मागे वळून वळून पाहात बसू नका. पुढे चला. कोणालाही घालून-पाडून बोलून, निदानालस्ती करू नका. काहीही प्रयत्न जो करत नाही, त्यापेक्षा पुढे जाण्यासाठी धडपड आणि संघर्ष करणारा हा निश्चितच उजवा ठरतो. (वजनाच्या रूपकामध्ये बोलायचे तर,) २० हजार टनांच्या तोलामोलाच्या पोकळ वार्ता करण्यापेक्षा एक औंस केलेले काम हे लाख मोलाचे असते..  जेव्हा इतरांसाठी काम करता तेव्हा तुमचे काम सर्वोत्कृष्ट असते. चित्तशुद्धीची - अस्सलतेने निखारून आलेल्या हृदयाच्या पावित्र्याची आज नितांत गरज आहे..
सर्व प्रकारचे ऐषो-आराम, सुखासीनता यांचा त्याग करा. तुमचे नाव, किर्ती, पत, पदनाम या काशाचीही तमा बाळगू नका. एवढेच काय, कार्य करायला उतरलात की, तुमच्या जीवाचीही पर्वा करू नका.. मदतीचा हात देणाऱ्या कार्यकर्त्यांचा सेतू बांधा आणि जीवनसागरामध्ये तरून जाण्यासाठी अनेक दशलक्ष जीवांना मदतीची साद द्या.. तुमचा वर्ण काय आहे, याचा विचार करू नका. हिरवा, निळा, लाल असे सगळे रंग एकजीव होऊन तेजस्वी पांढरा रंग - प्रेमाचा रंग निष्पन्न होतो. फक्त मनापासून काम करा. याचे होणारे परिणाम आपले आपणच पुढील उत्कर्षांची काळजी घेतील..
प्रत्येक देशाला एक नियती साकार करायची आहे. प्रत्येक देशाकडे इतरांना देण्याजोगा एक संदेश आहे. प्रत्येक देशाला एका ध्येयाची पूर्तता करायची आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आपल्या समुदायाचे/प्रजातीचे ध्येय, आपल्या समाजाने साकृत करावयाची नियती काय आहे, हे समजून घ्यायला हवे. देशांच्या मांदियाळीमध्ये आपल्या देशाची जागा आणि भूमिका जाणून घेतल्यास सौहार्द आणि सहिष्णुतेच्या जगभर उमटणाऱ्या सुरांमध्ये आपण लावावयाच्या सुराची जागा आणि जाग आपल्याला येईल. बडबड करण्यामध्ये तुमची शक्ती वाया घालवू नका. त्या ऐवजी नीरव शांततेमध्ये ध्यान करा.
मनाचे सामथ्र्य हे सूर्याच्या किरणांप्रमाणे असते. जर ते एकवटले तर आत्म्याचा गाभारा ज्ञान-प्रकाशाने उजळल्याशिवाय राहात नाही. उठा, जागे व्हा, जोपर्यंत लक्ष्य साध्य होत नाही, तोपर्यंत विश्रांती घेऊ नका.


उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान् निबोधत।

Source: http://www.loksatta.com/career-vrutant-news/keep-willness-strong/

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites