प्रगतीच्या मार्गावरील न संपणारा प्रवास ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 February 2013

प्रगतीच्या मार्गावरील न संपणारा प्रवास

लक्ष्यवेध हा बॉर्न२विन संस्थेचा अत्यंत महत्वाचा प्रशिक्षण कार्यक्रम. तो पूर्ण केलेल्या आपल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यासाठी संस्था लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करते. याप्रसंगी उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीस बोलावून, त्यांच्या मुलाखतीतून नव-उद्योजकांना प्रेरित करते, शिवाय त्यातून त्या उद्योगक्षेत्राची खूप माहितीही मिळते.

७ फ्रेबुवारी १३ला झालेल्या १४ व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात ह्यावेळेस प्रमुख पाहुणे होते टुरिझम क्षेत्रातील महर्षी, केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील. प्रथम त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. नंतर बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी केसरी पाटील यांची मुलाखत घेतली. केसरीभाऊंचे वय ७८ आणि त्यांनी अक्षरश: शुन्यातून सुरवात करून इतके उत्तुंग यश मिळवले. आपल्याला वाटेल ते स्वत:च्या जुन्या आठवणीत फक्त रमून जातील आणि त्यांचे विचार असतील, मी सगळे जग पाहिलेले आहे (शब्दश:, कारण अगदी अंटार्क्टीकालाही ते जाऊन आलेले आहेत, तेही वयाच्या पंचाहत्तरीत!) आणि ७८ पावसाळे पाहिलेले आहेत, मी अधिकारवाणीने सांगतो ते तेवढे ऐका. खरोखर त्यांचा तितका अधिकार नक्कीच आहे. पण त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले, त्यांचे तत्व आहे, ते कधीही मी इतके पावसाळे पाहिले आहेत असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, असं म्हणणं म्हणजे नवीन गोष्टी शिकणे बंद करणे. माणूस आयुष्यभराचा विद्यार्थी असतो, त्याने आपल्या नातवंडांकडूनही शिकायला हवे. केसरीभाऊंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कडक शिस्त. काही गोष्टींबाबत ते अतिशय काटेकोर आहेत. ते दहा वर्षे बोर्डी येथील विद्याभवन शाळेत शिक्षक होते, त्याचा हा परिणाम किंवा आणखी मागे जायचे तर विद्यार्थीदशेत झालेले राष्ट्रसेवा दलाचे संस्कार. मथाणे या आडवळणाच्या खेडेगावात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांत नेतृत्वगुण होते. अनेकवेळा वडिलांना प्रवास करावा लागे, त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांच्या पुस्तिका घरी असत. या पुस्तिका नंतर आपल्या आयुष्याच्या इतक्या अविभाज्य भाग बनणार आहेत याची केसरीभाऊंना मात्र कल्पनाही नसावी! लहानपणाच्या संस्कारांबाबत वाचनप्रियता, शिस्त, कष्ट या ठळक आठवणार्‍या गोष्टी. तसेच वाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचाही प्रभाव त्यांच्यावर झाला. भूगोल व इतिहास हे केसरीभाऊंचे मित्र झाले ते केसरी टूर्स सुरू करण्याच्या आधीपासूनच. आणि हा भूगोल व इतिहासही केवळ आपल्या देशाचा नाही तर संपूर्ण जगाचा. हे दोन्ही त्यांना अजूनही मुखोदगत आहेत. पण आपण केसरी टूर्सचा इतिहास बघू! 


केसरीभाऊंचे मोठे बंधू राजाभाऊ पाटील यांनी राजाराणी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. आधी केवळ सुट्टीत केसरीभाऊं त्यांना मदत करत, सहलींबरोबर जात. ६७ नंतर मात्र केसरीभाऊं नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळासाठी राजाराणी ट्रॅव्हल्सचे काम करू लागले. त्यावेळेस नोकरी सोडणे हे आव्हान होते, पण त्यांनी ते स्वीकारले. राजाभाऊंबरोबर त्यांनी वीस वर्षे काम केले. सहल संचालक म्हणून काम करताना जबाबदारी घ्या, सबबी सांगू नका आणि पर्यटक काय सांगत आहे ते केवळ कानाने ऐकू नका, तर त्याचे मनन करा, असे ते सांगतात. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या काश्मीरच्या सहली प्रसिध्द होत्या. केसरीभाऊ हमखास या सहलींना जात. प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याबरोबरच पर्यटकांना आपल्या जोशपूर्ण शैलीत काश्मीरचा इतिहास सांगत. त्याबाबत ते पर्यटकांमध्ये मशहूर होते. शिवाय ते पर्यटकांना सांभाळून घेत, त्यांच्याबरोबर भाऊंचे सूर जुळत. भाऊ म्हणतात, मराठी माणूस मुखदुर्बळ. त्याला बोलके करावे लागते. सहल म्हणजे मोठा ग्रुप असतो. प्रत्येकजण धीटपणे चारचौघात बोलू शकेल असे नाही. अशी माणसे मग मागे राहिली तर ती इतरांइतकी सहल एंजॉय करू शकणार नाहीत. केसरीभाऊ अशा लोकांबरोबर आपुलकीने वागत, त्यांचा संकोच दूर करत. हे पर्यटकही मग तितक्याच उत्साहाने सहलीत रममाण होत.  


अपरिहार्यपणे त्यांचे बंधूबरोबर मतभेद झाले. विचार करून त्यांनी बाहेर पडून स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे ठरवले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी असा निर्णय घेणे धाडसाचे होते. पैशाचे पाठबळ नव्हते, पण लोकांचा भक्कम पाठिंबा होता. विचार सुधारकी होते, पुढे जाण्याची प्रवृत्ती होती. टूरिझम हा सेवाक्षेत्रातील व्यवसाय. १९८४ साली आर्थिक सुधारणांचे वारे वाहणे अजून सुरू झालेले नव्हते. या क्षेत्रासाठी बॅंका कर्ज देत नसत. केसरीभाऊंना आपल्या पत्नीचे – सुनिताबाईंचे – दागिने गहाण टाकून भांडवल उभे करावे लागले. आज मात्र बॅंकाच कर्ज घ्या म्हणून धोशा पुरवतात ती गोष्ट वेगळी! १९८४ ते १९९७ या काळात केसरीभाऊ आणि त्यांचे कुटुंबिय खूप राबले, जीव तोडून मेहनत केली. त्यावेळेस रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण वगैरे सुविधा नव्हत्या. चर्चगेट स्टेशनवर जाऊन ते झोपत, म्हणजे सकाळी खिडकी उघडल्याबरोबर नंबर लावता येईल. वर्क लाईक अ कूली अॅन्ड लीव्ह लाईक अ प्रीन्स हा त्यांचा खाक्या. शैलेश व हिमांशू ही मुले व वीणा व झेलम ह्या मुली. त्याचबरोबर सुना व जावई या तरूण पिढीच्या साथीने मग केसरी टूर्सचा रथ भरधाव निघाला. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. सतत यशाचे नवे नवे टप्पे पार करत हा या क्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेला ब्रॅन्ड झाला. एक सहल नेली, बस्स, पुन्हा दुसरी सहल न्यायची, तेव्हाच काही विचार करायचा असा तोकडा विचार केसरीभाऊं आणि त्यांच्या कुटुंबियांनी कधीच केला नाही. नावीन्यपूर्ण कल्पना आणल्या व त्या यशस्वीपणे राबवल्या. माय फेअर लेडी ही टूर बघा. अनेक स्त्रियांना परदेशात सहलीला जायचे असते, पैसे असतात, पण बरोबर येण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसते. अशा स्त्रियांसाठी ही टूर किती चांगली. फक्त स्त्रियाच या सहलीत असतात. माय फेअर लेडी ही म्हणूनच एकट्या जावे लागणार्‍या स्त्रियांसाठी सहलीची सोय करणारी संकल्पना राहात नाही तर त्यांना मोकळीक देणारी, त्यांना आत्मविश्वास देणारी, स्वत:साठी वेळ काढायला शिकवणारी सहल बनते. आपल्या गौरी शिंदेंचा इंग्लिशविंग्लिश चित्रपट २०१२ मध्ये आला, त्यातही स्त्रियांनी संसारात राहूनही सन्मानाने जगावे, स्वत:साठी वेळ काढावा, अशी संकल्पना आहे. फरक इतकाच माय फेअर लेडी टूर सुरू होऊन दहा वर्षे झाली! माय फेअर लेडीत अपवाद म्हणून एक पुरूष पर्यटक असतो. तोही बघा कसा नेमका निवडलेला आहे. या टूरवर स्त्रियांच्या बरोबर असतात, होम मिनिस्टरमुळे घरोघरी पोचलेले सर्व स्त्रियांचे लाडके भावजी अर्थात आदेश बांदेकर

याशिवाय हनिमून कपल्स, विद्यार्थ्यांसाठी नासाच्या टूर्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सहली, धार्मिक स्थळांच्या सहली अशा विविध प्रकारच्या त्यांच्या सहली आहेत. त्या सर्वच लोकप्रिय आहेत. फक्त मराठी लोकच केसरीचे पर्यटक नसतात तर सर्व भाषिक असतात. सर्वांमध्ये ते लोकप्रिय आहेत. कॉर्पोरेट टूर्स हा त्यांचा विभागही जोरात कार्यरत आहे. पर्यटक देवो भव हा मंत्र केसरीभाऊंनी आपल्या टीमला दिलेला आहे. माझे मायबाप पर्यटक हो असा ते उल्लेख करतात. ग्राहकसेवा याला ते खूप महत्व देतात. तसेच आपल्या कर्मचार्‍यांना ते आपल्या उद्योगातील भागीदार मानतात, त्यांना सहकारी म्हणतात. कंपनीत आज १००० कर्मचारी असून ५०० टूर मॅनेजर्स आहेत.

स्पर्धेबाबत ते म्हणतात, स्पर्धा हवीच, त्याला तोंड देता आले पाहिजे. तथापि स्पर्धा ही सकारात्मक विचारसरणीची बैठक असलेली हवी. स्पर्धेमुळे विचलीत होऊ नये व आपल्या ध्येयावरचे लक्ष ढळू देऊ नये. तसेच व्यवसायायबाबत विस्तार करण्याचे धोरण हवे, पुढे जात राहणे हे ध्येय आहे असे ते म्हणतात.

केसरीभाऊंना सामाजिक भान आहे. एक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला, मराठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा, पण इंग्लीश भाषेवरही प्रभुत्व अगदी हवेच कारण ती आता ग्लोबल भाषा झाली आहे. तसेच बिल गेट्सच्या एका वचनाची त्यांनी आठवण करून दिली, तुम्ही गरीब म्हणून जन्मला तर तो तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणूनच मराल तर तो तुमचा दोष आहे. अर्थात माणसाने सतत प्रयत्न करत राहून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे, हे त्यांचे सांगणे आहे. केसरी पाटील यांची ही मुलाखत ऐकताना श्रोतृवर्ग उत्साहात दाद देत होता. ते जे बोलत होते मनापासून.

याच कार्यक्रमात अतुल राजोळींनी लिहिलेल्या माझा मोटीव्हेटर मित्र या पुस्तकावर आधारित एका पर्मनंट कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. या कॅलेंडरमध्ये रोज एक सुविचार वाचायला मिळेल.


बॉर्न२विनने ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती हे त्रैमासिक सुरू केले असून त्याच्या पहिल्या अंकांचे प्रकाशन केसरीभाऊंच्या हस्ते करण्यात आले. हा अंक अतिशय देखणा झाल्याचे मत अनेकांनी बघताक्षणीच जाहीर केले!
 

बीग आयडीयाचे जान्हवी राऊळ व मंगेश राऊळ यांनी केसरी टूर्सचा संदर्भ देत, जगभरातील महत्वाची स्थळे दाखवणारा एक भव्य व देखणा बॅकड्रॉप बनवला होता, त्याचे सर्वांनी कौतूक केलेच, केसरीभाऊंनी स्वत: त्यांना मंचावर बोलावून त्यांना दाद दिली.
 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites