स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

02 September 2013

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस
कालनिर्णयच्या रूपात मराठी घराघरातमनामनात पोहोचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. दैनिक लोकसत्तातील शब्दकोडय़ांपासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द, त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी वळणं, चढउतार, त्या सगळ्यांतून बावनकशी सोन्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडलेले जयंत साळगावकर म्हणजे एक आश्चर्याचा प्रवास आहे.

(वडिलांबद्दलचे जयराज साळगांवकर यांचे अनुभव)
बाबांनी १९५१ मध्ये लोकसत्तादैनिकामध्ये शब्दकोडे विभागात रचनाकार आणि सहसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी मालवणमध्ये ज्योतीनावाचे एक नियतकालिक चालवलं होतं. प्रचलित तसंच संत साहित्याच्या वाचनामुळे त्यांना शब्द, त्यांचे अर्थ, त्यातले बारकावे यांचं चांगलं ज्ञान होतं. लोकसत्ताच्या शब्दकोडे विभागात नोकरी करताना त्याचा त्यांना चांगलाच उपयोग झाला. लोकसत्तातील शब्दकोडय़ांना तेव्हा अमाप लोकप्रियता होती. शब्दकोडे विभागात तीस-बत्तीस माणसं काम करत. एका चौकोनाला आठ आणे अशी शब्दकोडे स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी होती. सुरुवातीला शब्दकोडय़ांवर सरकारी बंधनं नव्हती, पण नंतर तीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसं नसावीत आणि वर्षभरातून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावीत अशी बंधनं आली. प्रत्येक स्पर्धेत एक लाखाच्या आसपास रक्कम जमा होत असे. बक्षिसं देऊनही चांगली रक्कम उरत असे. शब्दकोडय़ांमध्ये जितकी विविधता तितकं लोकांचं त्याबद्दलचं आकर्षण वाढे. लोकसत्ताचा खपही वाढे. त्यामुळे बाबा आणि विद्याधर गोखले शब्दकोडय़ांमध्ये नावीन्य आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघत. लोकसत्तातली शब्दकोडी इतकी लोकप्रिय होती की या वर्तमानपत्राचा उल्लेखच लोक कोडय़ाची लोकसत्ताअसा करत आणि असा उल्लेख केलेला तेव्हाचे संपादक ह. रा. महाजनी यांना अजिबात आवडत नसे, अशी आठवण बाबा सांगत. शब्दकोडे विभागात काम करताना विद्याधर गोखले यांच्यावर महिन्यातून एक तर बाबांवर महिन्यातून एक शब्दकोडे करण्याची जबाबदारी असे. त्याशिवाय त्या शब्दकोडय़ाच्या जाहिराती करायच्या आणि थोडेफार इतर व्यवस्थापकीय काम असे. ही कामं करूनही त्यांच्याकडे भरपूर वेळ उरायचा. त्या वेळात त्यांनी फलज्योतिषाचा आणि हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला. अगणित लोकांच्या कुंडल्या आणि हात त्यांनी त्या काळात बघितला. या अभ्यासाचा त्यांना लगेचच उपयोग झाला तो अत्यंत लोकप्रिय अशी लोकसत्तातली शब्दकोडी १९५६ मध्ये बंद पडली तेव्हा.
शब्दकोडे विभाग बंद झाल्यानंतर बाबा मात्र लोकसत्तातून बाहेर पडले. नोकरी सोडताना मिळालेल्या १५-१६ हजारांच्या रकमेतून त्यांनी लोकमित्रनावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण सहा महिन्यांतच ते पैसेही संपले आणि साप्ताहिकही बंद पडलं. पण या लोकमित्रच्या अंकात बाबा साहित्याच्या अंगाने, संतवचनांवर आधारित राशिभविष्य लिहीत असत. त्यांचं या पद्धतीचं राशिभविष्य त्या काळात लोकप्रिय झालं होतं. लोकमित्रबंद पडल्यानंतर लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांनी बाबांना, त्याच प्रकारचं भविष्य लोकसत्तात लिहावं असं बाबांना सुचवलं. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही त्यांना अशा प्रकारे कामात आला. त्यानंतर १९५६ ते १९६२ या काळात ते लोकसत्ताच्या रविवारच्या अंकात राशिभविष्य लिहीत. बाबांनी त्या काळात इतर नियतकालिकांमध्ये कथा, लेख असं भरपूर लिखाण केलं. त्यांचं राशिभविष्य वाचायला लोकांना फार आवडायचं. त्यामुळे नंतरही इतर अनेक दैनिकांमध्ये त्यांनी राशिभविष्य लिहिलं.
१९५६ साली त्यांनी लोकसत्तातली शब्दकोडं विभागातली नोकरी सोडली, पण शब्दकोडय़ाची त्यांच्यात निर्माण झालेली आवड मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच १९५८ साली शब्दरंजन स्पर्धा सुरू झाली. त्यात प्रामुख्याने भर होता साहित्य क्षेत्रावर. सुप्रसिद्ध असलेल्या तसंच फारसा माहीत नसलेल्या साहित्यिकांच्या अवतरणांवर आधारित शब्दकोडं हा अगदी नावीन्यपूर्ण प्रकार होता. ते खरोखरचं शब्दरंजनच होतं. मराठी वाचकांनी शब्दरंजन स्पर्धा अक्षरश: डोक्यावर घेतली आणि बाबांना एक नवीनच मार्ग सापडला. शब्दरंजन म्हणजे जयंत साळगावकर हे समीकरणच पुढे रूढ होऊन गेलं. या शब्दरंजन स्पर्धेने बाबांना यश, पैसा सगळं मिळवून दिलं. पण त्यांचा स्वभावच असा होता की त्यातून त्यांना पुढचं काहीतरी दिसत असायचं. त्यातूनच पुढच्या कल्पना सुचायच्या आणि मग त्या प्रत्यक्षात उतरवायच्या मागे ते लागायचे.

साहजिकच शब्दरंजन स्पर्धेतून मिळालेल्या आर्थिक समृद्धीतून त्यांना वेध लागले ते संतवाङ्मय लोकांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे. दासबोधातला विचार लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी त्या वेळी सव्वा रुपया किमतीत दासबोध उपलब्ध करून दिला. त्याशिवाय १९६० साली त्यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर स्वरगंगानावाचा एक भक्तिगीतांचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अडीच लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमाला आले आणि त्या काळातल्या अव्वल गायकांनी गायलेल्या भक्तिरसात डुंबले. शब्दरंजननावानेच त्यांनी एक मासिकही सुरू केलं होतं. त्याचे संपादक होते ग. दि. माडगूळकर. शब्दरंजनमधून जसजसा फायदा होत होता, त्यातून आर्थिक पाठबळ उभं राहात होतं, तसतशा बाबांच्या डोक्यातून नवनवीन कल्पना बाहेर येत होत्या. त्या तर ते प्रत्यक्षात आणतच, शिवाय त्या काळातल्या वेगवेगळ्या संस्थांना, समाजोपयोगी कामांना भरघोस आर्थिक मदतही करत.
शब्दरंजन स्पर्धेची ही भरधाव निघालेली गाडी ब्रेक लागावा तशी १९६४ पासून मंदीच्या वावटळीत सापडली. १९६९ मध्ये सरकारने लॉटरी सुरू केली. शब्दकोडी भरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक लॉटरीची तिकिटे विकत घ्यायला लागले. कोडी चालेनात. कोडय़ांची बक्षिसं देणं, छपाई, कागदवाल्यांची बिलं देणं सगळं हाताबाहेर जायला लागलं. अनेकजण कोर्टात गेले. अशा वेळी खरं तर कुणीही डगमगला असता. पण बाबा डगमगले नाहीत. आज त्या सगळ्याकडे बघताना असं वाटतं की एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, तसं एका कामातून दुसऱ्या कामात, दुसऱ्या क्षेत्रात हे जसं काही सहजपणे घडत गेलं. तसं ते घडलं नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण बाबांची जिद्द, संकटातून वाट शोधायची, नव्या वाटेने तितक्याच उत्साहाने चालायची वृत्तीच अशी होती की ते त्या सगळ्यातून सहजपणे वाट काढत गेले. त्यामुळे शब्दरंजन स्पर्धा बंद झाल्यानंतर दिनदर्शिकेचं प्रकाशन करायचं ही कल्पना त्यांना सुचली. त्या काळात खरं तर इतरही दिनदर्शिका होत्या. पण बाबांनी १९७२ मध्ये तिला एक रूप दिलं आणि आज घरोघरी भिंतीवर असणारं कालनिर्णय त्यातूनच आलं. पहिल्या वर्षी कालनिर्णयची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप झाला नव्वद हजार. आधी फक्त मराठीत निघणारे कालनिर्णय आता आठ भारतीय भाषांमध्ये निघते आणि त्याचा खप आहे, साधारणपणे दीड कोटी. कालनिर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांग तर आहेच, शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत. रेल्वेचं, एसटीचं टाइम टेबल घ्या, वेगवेगळ्या रेसिपी घ्या, वेगवेगळ्या टिप्स घ्या.. दिनदर्शिकेच्या उरलेल्या जागेत माहितीपूर्ण लेख इतरजणही प्रसिद्ध करत, पण तिथे पुलंपासून कुसुमाग्रजांपर्यंत मोठमोठय़ा साहित्यिकांचे लेख प्रसिद्ध करून बाबांनी त्या जागेचं आकर्षणमूल्यच एकदम वाढवलं. वर्षभर भिंतीवर असणाऱ्या कालनिर्णयच्या पाठीमागे असलेल्या रेल्वेच्या टाइम टेबलने तर त्याची उपयुक्तता एकदम वाढवली. आता कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे समीकरणच लोकांच्या मनात फिट्टं बसलं आहे. सुरुवातीला मराठी भाषकांमध्ये स्थान मिळवलेल्या कालनिर्णयचा नंतर इतर भाषांमध्ये जो पसारा वाढला तो पाहता कॅलेंडर कसं असावं, याबद्दलचा बाबांचा विचार हा फक्त मराठी मनापुरता सीमित नव्हता, तर तो एकूणच सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना सामावून घेणारा होता हेच स्पष्ट होतं. कालनिर्णयचा जम बसल्यानंतर त्यांनी स्वत:चं मुद्रणालय सुरू केलं. जर्मनीहून मोठं मशीन आणलं. पुढे आणखी मशिन्स वाढवली. हळूहळू सुमंगल प्रेसचं नाव मुंबईतलं एक मोठं मुद्रणालय असं घेतलं जाऊ लागलं. बाबांनी कालनिर्णय सुरू केलं तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे एखादा उद्योग कसा उभा राहतो ते मी जवळून बघू शकलो, समजून घेऊ शकलो. बाबांचा दांडगा लोकसंग्रह त्यांच्या या उद्योजकतेला कसा पूरक ठरला हे मी जवळून बघितलं आहे. त्यांनी जोडलेली माणसं त्यांच्या अशा प्रत्येक उपक्रमात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

अनेकविध प्रकारची माणसं बाबांच्या आयुष्यात आली. त्यात अनेक मोठमोठी माणसं होती. त्यातल्या अनेकांवर बाबांचा आणि अनेकांचा बाबांवर लोभ होता. या माणसांनी, त्यांच्या सहवासाने, त्यातल्या अनुभवांनी बाबांचं आयुष्य खरोखरच श्रीमंत केलं आहे.  पण या सगळ्यापलीकडे जाऊन बाबांचं श्रद्धास्थान होत ते गणपती. १९८९च्या कालनिर्णयमध्ये त्यांनी गणपतीबद्दल लिहिलं आहे, ‘‘भारतीय भूमीत जन्मलेले आणि इथंच लोकोत्तर कर्तृत्व गाजवून अमरत्व पावलेले आपले विविध देव अवतारी पुरुष हे आपलं पारंपरिक वैभव आहे. आपले देव नीतिधर्माचे उद्धारक आहेत. महत्कार्याचे कारक आहेत. दीनदुबळ्यांचे तारक आहेत. अडलेल्या नाडलेल्यांचे साहाय्यक आहेत आणि म्हणूनच महाकाव्याचे नायक आहेत. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये त्रिखंडात मान्य झाली आहेत ती त्यांचे नायक असे लोकोत्तर महापुरुष आहेत म्हणून. अशीच एक लोकोत्तर विभूती म्हणजे श्रीगणेश. परमेश्वर- पार्वतीचा हा पराक्रमी पुत्र दुष्टदुर्जनांचा निर्दालन करून विश्ववंद्य झाला. गजानन गणेश हा देवांचा सेनापती. केवळ रणक्षेत्रातच नव्हे तर कलाक्षेत्रातही अग्रस्थानाचा अधिकारी. संगीत, नृत्य, नाटय़ इत्यादी सर्व कलांचा प्रथमपदाचा मानकरी. आपण त्याला पूजतो ते तो असा गुणाधीश आहे म्हणून!’’
विद्याधर गोखले हे बाबांचे दैनिक लोकसत्तामधले सहकारी. बाबांवरच्या एका लेखात ते म्हणतात, ‘‘साळगावकरांच्या शब्दरंजन कोडय़ांच्या अत्यंत चलतीच्या काळात मी त्यांचे नाव स्वप्नरंजन साळगावकरअसेच ठेवले होते. कारण स्वप्नरंजनहा त्यांचा स्वभावच आहे. पहा ना, अवघा २५० रुपये पगार असताना १९५५ साली या गृहस्थाच्या डोक्यात मुंबईहून सिंधुदुर्ग विशेषांककाढण्याचे स्वप्न जागृत झाले.  ते पु. भा. भाव्यांना म्हणाले होते, ‘पाहिजे तेवढे लिहा. पृष्ठसंख्येची मर्यादा तुम्हाला नाही.त्यासाठी त्यांनी मुखपृष्ठासाठी मोठे चित्रही काढून घेतले होते. ग्लॉसी पेपरवर त्यांना हा अंक काढायचा होता. सिंधुदुर्गात दणक्यात प्रकाशन समारंभ करायचा होता. पण ते स्वप्न अधुरंच राहिलं.’’
बाबांना साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा काढलेल्या विशेषांकात ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचा एक मोठा लेख आहे. त्यात दळवी लिहितात, ‘‘जयंतरावांनी पैसा जवळ केला. पण अनेकदा पैशाबरोबर येणारा गर्व, मिजास, अहंभाव, उधळपट्टी, श्रीमंतीचं प्रदर्शन अशांसारख्या गोष्टी जवळ येऊन दिल्या नाहीत. मध्यम गरिबी, बेकारी, बरे दिवस, सुरळीत आयुष्य, पुन्हा जीवघेणी गरिबी आणि त्यानंतर उदंड श्रीमंती अशा विविध अवस्थांमधून गेल्यानंतर आता श्रीमंती असतानाही साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वात एक आध्यात्मिक श्रीमंती निर्माण होत आहे असं दिसतं. त्यांच्या वृत्तीत एक प्रकारची तटस्थता निर्माण होत आहे. आपला धर्म, आपला समाज यांचा ते अधिक विचार करत आहेत असं वाटतं. हिंदू धर्मात झपाटय़ाने सुधारणा व्हाव्यात यावर त्यांचा कटाक्ष आहे. हिंदू धर्माकडे ते मानवधर्म म्हणून पाहतात. अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं पाहिजे असं ते मानतात. पण ते करताना डोळस श्रद्धेवरही त्यांचा भर आहे. जगाचं सूत्रसंचालन करणारी शक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. त्या शक्तीची भक्ती हवी, ती शक्ती तुम्हाला योग्य रस्त्यावर ठेवते असं ते मनापासून मानतात.’’
याच अंकात बाबांवर लिहिलेल्या लेखात दत्तप्रसाद दाभोळकर लिहितात, ‘‘भविष्यावर विश्वास नसलेल्या माझ्या मनाला जयंतरावांनी अनेक झटके दिलेत. अजून माझा अविश्वास अभेद्य आहे. पण ते त्याला कधीतरी जमीनदोस्त करणार अशी मला भीती वाटते. पण तरीही ज्योतिर्भास्कर जयंतराव मला आवडतात आणि मी त्यांच्या प्रेमात पडलोय, त्याचे कारण त्यांची भविष्य ही विद्या नव्हे. मी त्यांच्या प्रेमात पडलोय ते समोरच्या माणसाला समजावून घेऊन त्याला आपल्याला पटलेली व आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे. जयंतराव माणसात गुंततात. त्यांना माणसे एकदम आवडतात किंवा आवडत नाहीत आणि मग आवडलेली माणसे संपूर्णपणे त्यांची असतात. जयंतरावांना आवडणाऱ्या माणसांत छोटा-मोठा असा भेदभाव नसतो. त्या यादीत त्यांच्या घरातील इतर कोणाशीच न पटणारा त्यांचा ड्रायव्हर असतो, नाहीतर माझ्यासारखा एखादा मित्र!’’
त्यांनी वडील या नात्याने मला काय दिलं, याचा मी विचार करतो तेव्हा जे जाणवतं ते मला आजही थक्क करणारं आहे. कारण मुळात त्यांनी लहानपणापासून मला जे दिलं, ज्याचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला ते सगळं अगदी नकळत आहे. म्हणजे एखादा संस्कार करायचा म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षाही त्यांच्या सहज वागण्यातून मला जे काही मिळत गेलं त्याची किंमत कशाशीच होऊ शकत नाही. मला आठवतं, पहिलीमध्ये असताना परळमधल्या एका शाळेत मी जायचो. एकदा तिथल्या हेडमास्तरांनी मला भिंत आणि दार यांच्यामध्ये उभं करून, दाराची उघडझाप करायची शिक्षा दिली. बाबांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मला विचारलं, तुला बालमोहनमध्ये जायचं आहे की किंग जॉर्जमध्ये? आता पहिलीतल्या मुलाला तेही शाळा कोणती हवी याबाबतचे दोन पर्याय देऊन त्यातून निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देण्याचा तो काळ नव्हता. पण ते स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. त्याचा माझ्यावर नकळत का होईना खूप परिणाम झाला. अशीच एक आठवण आहे, पुढच्याच वर्षीची. मी दुसरीत असतानाची. एकदा ते मला ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेले. तुला हवी आहेत ती पुस्तकं घे, असं त्यांनी मला सांगितलं. त्या वयातदेखील मी २५-३० पुस्तकं निवडली. घरी नेऊन सगळी वाचली. तिथून मला वाचनाची गोडी लागली. नकळतपणे त्यांनी केलेला हा वाचनसंस्कार माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. बाबा त्या वेळी शब्दरंजन स्पर्धेसाठी शब्दकोडी तयार करत आणि त्यात मराठी पुस्तकांमधली अवतरणं असत. ही अवतरणं वाचकांना सहज मिळणारी नसावीत यासाठी बाबा दुर्मीळ पुस्तकं धुंडाळत. त्यामुळे लहानपणापासूनच मला कितीतरी दुर्मीळ पुस्तकंही वाचायला मिळाली. ती तेव्हा किती समजली माहीत नाही, पण पुस्तक हाताला लागलं की ते वाचूनच संपवायचं ही सवय लागली ती तिथूनच. बाबा खूपदा निर्णयसागरच्या प्रेसमध्ये जात. त्यामुळे छपाईचं मशीन, छपाई खिळे, रंग हे सगळं बघत, ऐकतच मी मोठा झालो. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे कामासाठी ते ज्यांच्या ज्यांच्याकडे जात तिकडे त्यांच्याबरोबर कधी कधी मलाही घेऊन जात. बाबांमुळे साहित्य, पत्रकारिता, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतली अनेक मोठी माणसं आमच्या घरी येत. त्यामुळे त्या काळातल्या मोठय़ा माणसांना मला अगदी लहानपणीच भेटता आलं. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा हे खरं तर एक प्रकारचं शिक्षणच होतं. त्या काळात मला जे शिकायला मिळालं ते कुणालाही, कधीही कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळालं नसेल. मला नेहमी वाटतं की वातावरणातच मी खऱ्या अर्थाने घडलो.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites