स्टे हंग्री, स्टे फुलिश! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

25 January 2014

स्टे हंग्री, स्टे फुलिश!

स्टे हंग्री, स्टे फुलिश!
प्रा. सुरेश नाखरे, सोमवार, २० जानेवारी २०१४
जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्थांमध्ये तसेच विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांशी हितगुज करण्यासाठी बोलावल्या गेलेल्या मान्यवरांच्या भाषणांचा निवडक अंश या मासिक सदरातून देत आहोत
'जगातील उत्कृष्ट विद्यापीठांत गणल्या गेलेल्या या विद्यापीठाने आयोजित केलेल्या पदवीदान समारंभात तुमच्याबरोबर असण्याने माझा सन्मानच झाला आहे. मी कधीच पदवी प्राप्त करू शकलो नाही. खरे सांगितलेच पाहिजे की कॉलेजच्या पदवीदान समारंभात इतके निकट यायची ही माझी पहिलीच वेळ आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील तीन गोष्टी सांगणार आहे. बस्स. फक्त तीन गोष्टी.
पहिली गोष्ट ही बिंदू-जोडणीसंबंधी आहे (Connecting the Dots):
मी रीड कॉलेजमधून पहिल्या सहा महिन्यांनंतर काढला गेलो. पण पूर्ण काढून टाकण्याआधी पुढचे जवळपास १८ महिने मी आतच राहिलो. मला का बरे काढून टाकले गेले?
त्याची सुरुवात मी जन्मण्याआधी झाली. माझी जन्मदात्री आई ही एक तरुण, अविवाहित अशी पदवीची विद्यार्थीनी होती (कुमारी माता). आणि तिने मला दत्तक देण्याचे आधीच निश्चित केले होते. तिला खूप तीव्रतेने वाटत होते की, मला कोणा पदवीधारक जोडप्याने दत्तक घ्यावे. त्यामुळे तिने एका वकील व त्याच्या पत्नीला माझा जन्म होताच दत्तक देण्याचे ठरवले होते. पण प्रत्यक्षात मी जेव्हा जन्मास आलो तेव्हा त्या जोडप्याने शेवटच्या क्षणी सांगितले की, त्यांना वस्तुत: मुलगी हवी होती. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माझ्या पालकांना मध्यरात्री दूरध्वनी केला गेला. 'आमच्याकडे अनपेक्षितरीत्या एका मुलाचा जन्म झाला आहे. तुम्हाला तो हवाय का?' अशी विचारणा झाली. 'अर्थात हवाय!',त्यांनी उत्तर दिले. माझ्या जन्मदात्री आईला नंतर समजले की माझ्या दत्तक आईने कॉलेजमधून कधीच पदवी प्राप्त केलेली नव्हती आणि वडिलांनी साधी माध्यमिक शाळाही उत्तीर्ण केलेली नव्हती. त्यामुळे तिने दत्तक कागदपत्रांवर सही करण्यास नकार दिला. पण मला भविष्यात कॉलेजला पाठवू असे आश्वासन माझ्या पालकांनी दिल्यानंतर ती अखेर तयार झाली.
आणि १७ वर्षांनतर मी कॉलेजमध्ये दाखल झालो. स्टॅनफोर्डसारख्या अत्यंत खर्चीक असणाऱ्या एका कॉलेजची मी निवड केली. माझ्या कष्टकरी पालकांची सर्व शिल्लक कॉलेजची फी भरण्यात खर्ची पडत असे. सहा महिन्यांनंतर माझ्या लक्षात आले की, हे काही खरे नाही. माझ्या जीवनात मला नेमके काय करायचे आहे, त्याची मला काहीच कल्पना करता येईना, व याबाबतीत कॉलेजचा मला काय उपयोग होणार आहे, हेही कळेना. तरीही मी मात्र माझ्या पालकांनी आयुष्यभर साचवलेली मिळकत खर्च करत होतो. म्हणून मी बाहेर पडायचे ठरवले. मला विश्वास होता की, यातून काहीतरी चांगले निष्पन्न होईल. त्या वेळी तात्पुरती भीती वाटली होती, पण आता मागे वळून बघताना असे वाटते की, तो निर्णय हा मी आत्तापर्यंत घेतलेल्या सर्व निर्णयांमधला सर्वोत्कृष्ट निर्णय होता. बाहेर पडताक्षणी मी वर्गात जाणे बंद केले, आणि मला ज्यातून आनंद मिळेल तिकडे जायला सुरुवात केली.
हे सारे तितकेसे अद्भुत वा सुखावह नव्हते. मला झोपायला जागा नव्हती, त्यामुळे मी मित्रांच्या खोलीत जमिनीवर झोपत असे. कोक बाटल्या परत करून अनामत रकमेचे ५ सेंट मिळवून मी माझे अन्न विकत घ्यायचो. दर रविवारी रात्रीचे उत्तम जेवण मिळावे, म्हणून मी ७ मैल पायी चालत हरे कृष्ण मंदिरात जायचो. मला ते जेवण खूप आवडायचे. माझी जिज्ञासा व आंतरिक इच्छा यांच्या मागे जाताना ज्या सगळ्या अडथळ्यांतून, अडचणीतून ठेचकाळत मला जावे लागले त्या अंतिमत: अमूल्य ठरल्या. वानगीसाठी मी एकच उदाहरण देतो.
त्या काळी देशात सर्वात उत्तम असे अक्षर-सुलेखन (Calligraphy)  रीड कॉलेजमध्ये शिकवले जायचे. कॉलेजच्या संपूर्ण परिसरात प्रत्येक पोस्टर, प्रत्येक ड्रॉवरवरचे लेबल हे अत्यंत सुबक हस्ताक्षरात लिहिलेले असायचे. माझ्या नेहमीच्या वर्गातून मी बाहेर पडल्याने मला त्या वर्गात यापुढे जायचे कारण नव्हते. त्यामुळे मी ठरवले की, हा सुलेखनाचा वर्ग लावायचा आणि जे शिकता येईल ते शिकून घ्यायचे. मी सेरीफ आणि सॅन सेरीफ हे टाइपफेसेस शिकून घेतले, वेगवेगळ्या शब्द-समुच्चयांमधील रिक्त जागा (स्पेसेस) समजावून घेतल्या, कोणती गोष्ट उत्कृष्ट छपाई देऊ शकते, हे जाणून घेतले. हे सर्व सुंदर, ऐतिहासिक व कलेच्या दृष्टीने सूक्ष्म असे होते, जे विज्ञान पकडू शकत नव्हते आणि मला ते फारच आकर्षक वाटले.
यातले काहीतरी माझ्या भावी आयुष्यात प्रत्यक्षात उपयोगी पडेल अशी कुठलीच आशा मला त्या वेळी वाटली नव्हती. पण नंतर १० वर्षांनी आम्ही जेव्हा पहिला मॅकिंटॉश संगणकाचा आराखडा तयार करत होतो, त्या वेळी हे सारे मला उपयोगी पडले. आणि आम्ही ते मॅकमध्ये प्रत्यक्ष वापरलेही. सुंदर टायपोग्राफी असलेला तो पहिला संगणक होता. जर मी ते कॉलेजमधले पहिले वर्ष ही गोष्ट शिकण्यात घालवले नसते तर मॅकमध्ये विविध टायपोफेसेस किंवा योग्य प्रमाणात अंतर राखलेले फॉन्ट्स कधीच घालता आले नसते. आणि मला जर पहिल्या वर्षी ड्रॉप लागला नसता तर मी सुलेखनाचा वर्ग कधीच लावू शकलो नसतो, आणि मग पर्सनल कॉम्प्युटरला अशी सुंदर टायपोग्राफी कधी मिळालीच नसती. अर्थात कॉलेजमध्ये असताना भविष्यातल्या या बिंदू-जोडणीचा विचार करणे मला अशक्यच होते. पण १० वर्षांनी मागे वळून पाहताना ही जोडणी स्पष्टपणे प्रतीत झाली, हे सत्य.
तेव्हा, तुम्हीसुद्धा भविष्याचा विचार करीत बिंदू-जोडणी करू शकणार नाही; पण मागे वळून पाहताना ती अवश्य करू शकाल. म्हणून तुमची त्या बिंदूंवर श्रद्धा हवी की, भविष्यात त्यांना परस्परांना तुम्ही जोडू शकाल. मात्र तुमच्यातील धैर्य, नियती, जीवन, कर्म यातील कशावर तरी तुमची श्रद्धा हवी. या दृष्टिकोनाने मला आयुष्यात कधीच अपयश दिले नाही आणि केवळ यामुळेच माझ्या जीवनात हा वेगळेपणा राहिला गेला.
माझी दुसरी गोष्ट आहे प्रेम व हानी यासंबंधीची (Love and Loss):
मी नशीबवान होतो, कारण मला सुरुवातीच्या जीवनात जे जे आवडत होते, ते ते मिळत गेले.
मी २० वर्षांचा असताना वॉझ आणि मी मिळून माझ्या आईवडिलांच्या गॅरेजमध्ये अ‍ॅपल कंपनी सुरू केली. आम्ही खूप कष्ट घेतले आणि दोघांनीच गॅरेजमध्ये सुरू केलेली ही कंपनी १० वर्षांत २ अब्ज डॉलर्स आणि ४ हजार कर्मचारी यांनी युक्त झाली. एक वर्षांपूर्वी आम्ही आमची पहिली निर्मिती - मॅकिंटॉश संगणक - बाजारात आणली, आणि त्या वेळी माझे वय होते ३०. आणि नेमकी त्याच वेळी माझी अ‍ॅपलमधून हकालपट्टी झाली. तुम्हीच सुरू केलेल्या कंपनीतून तुम्हालाच कसे काढले जाऊ शकते? त्याचे असे झाले, अ‍ॅपल वाढू लागली तशी आम्ही एकाला अ‍ॅपलमध्ये नियुक्त केले. मला वाटले होते की, तो अत्यंत बुद्धिमान असल्याने माझ्याबरोबर कंपनी चालवू शकतो. पहिले वर्ष तसे चांगले गेलेही. पण त्यानंतर मात्र भविष्याबद्दलचे आमचे दृष्टिकोन फारच भिन्न होऊ लागले आणि प्रसंगवशात आम्ही तोटय़ात गेलो. त्या वेळी संचालक मंडळाने त्याची बाजू घेतली. त्यामुळे वयाच्या ३० व्या वर्षी मला बाहेर पडावे लागले. आणि तेही जाहीररीत्या. माझ्या आयुष्याचा केंद्रबिंदूच नाहीसा झाला. माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले.
काही महिने मला काही कळेना, की काय करावे? आधीच्या उद्योजक पिढीला आपण खाली ढकलून दिले आहे, असे मला वाटू लागले, जणू काही माझ्या हातात सोपवलेला झेंडा मी खाली टाकून दिला. डेव्हिड पॅकार्ड आणि बॉब नुईस यांना मी भेटलो व इतक्या कठोर शिक्षेबाबत क्षमाही मागितली. मी एक जाहीर पराभूत व्यक्ती होतो. आणि त्या प्रदेशातून (व्हॅली) पळून जावे असेही मला वाटून गेले. पण हळूहळू मी सावरलो. माझ्या लक्षात आले की मी जे काही करत होतो, ते आजही मला आवडते आहे. अ‍ॅपलमधल्या विपरीत घटना ही आवड अंशानेही बदलू शकलेल्या नाहीत. मला काढून टाकले, तरीही ती आवड कायमच राहिली होती. आणि त्यामुळे पुन्हा एकदा सुरुवात करायचा मी निश्चय केला.
त्या वेळी मला कळले नाही, पण नंतर हे सिद्ध झाले की, अ‍ॅपलमधून झालेली हकालपट्टी ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट ठरली. यशस्वी असण्याचे जड ओझे दूर झाले व त्याची जागा नवशिक्याच्या हलकेपणाने घेतली, कारण त्याला प्रत्येक बाबतीत कशाचीच खात्री नसते ना.
पुढच्या पाच वर्षांत मी नेक्स्ट (NeXT) नावाची एक कंपनी सुरू केली, पिक्सार नावाची दुसरी कंपनी काढली आणि मी एका अद्भुत अशा स्त्रीच्या प्रेमात पडलो, जी माझी पुढे पत्नी झाली. पिक्सारने पुढे संगणकाचा वापर करून जगातील पहिली अ‍ॅनिमेशन फिल्म बनवली, तिचे नाव 'टॉय स्टोरी'. आज ही कंपनी जगातील सर्वात यशस्वी स्टुडिओ बनली आहे. विशेष कलाटणी देणारी घटना म्हणजे पुढे अ‍ॅपलने नेक्स्ट कंपनी विकत घेतली व मी अ‍ॅपलमध्ये परत आलो. मी जे तंत्रज्ञान नेक्स्टमध्ये विकसित केले होते ते आता अ‍ॅपलच्या सध्याच्या नवजीवनाच्या हृदयस्थानी आहे. आणि लॉरेन्स आणि मी आमच्या संसारात मजेत आहोत.
मला पक्की खात्री आहे की अ‍ॅपलने मला काढून टाकले नसते तर यातली कोणतीही गोष्ट घडली नसती. हे तसे जरा भयंकर असे औषध होते, पण ते रुग्णासाठी आवश्यक होते. कधीतरी आयुष्य तुमच्या डोक्यावर वीट फेकून मारते. पण श्रद्धा-विश्वास सोडू नका. माझी खात्री आहे की, मी जे काही केले ते आवडीने / प्रेमाने केले. तुम्हांला तुमची आवड कशात आहे, ते शोधलेच पाहिजे. हे तुमच्या कामाच्या बाबतीत आणि तुमच्या प्रेमपात्राबाबतदेखील खरे आहे. तुमचे काम हे तुमच्या जीवनातील मोठा भाग व्यापून टाकते आणि खरे समाधान मिळवायचा एकमेव मार्ग म्हणजे तुमच्या आवडीचे व श्रद्धेचे काम करीत राहणे. आणि असे श्रेष्ठ काम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जे काम कराल त्या कामावर प्रेम करणे. जर ते तुम्हाला अजून सापडले नसेल तर ते तुम्ही शोधायला लागा. स्वस्थ बसू नका. हृदयाशी निगडित अशा इतर सर्व गोष्टींप्रमाणे तुम्हाला ते जेव्हा सापडेल तेव्हा ते लगेच माहीत पडेल. आणि जसजशी वर्षे उलटतील तसतसे ते नाते इतर महान नात्यांप्रमाणे दृढ होत जाईल. तेव्हा ते काम मिळेपर्यंत शोधत राहा. स्वस्थ बसू नका.
माझी तिसरी गोष्ट आहे ती मृत्यूसंबंधी (Death):
मी जेव्हा १७ वर्षांचा होतो तेव्हा माझ्या वाचनात एक वाक्य आले ते काहीसे असे, 'जर प्रत्येक दिवस हा तुमचा अखेरचा दिवस आहे, असे जगू लागलात तर एक दिवस तुम्ही निश्चितपणे खरे ठराल'. या वाक्याचा माझ्यावर खोल परिणाम झाला आणि गेली ३३ वर्षे- प्रत्येक सकाळी आरशासमोर उभे राहून मी मलाच विचारतो की, 'जर आज माझा अखेरचा दिवस असेल तर मला जे आज करायचे आहे ते आज करता येईल का?' आणि जेव्हा सलग अनेक दिवस उत्तर नकारार्थी मिळायचे, तेव्हा मला हे कळायचे की मला माझ्यात काहीतरी बदल करणे गरजेचे आहे.
आपण लवकरच मरणार आहोत हे स्मरण, मला जीवनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन ठरले. कारण सर्व बाह्य अपेक्षा, सर्व अभिमान, अडचणी वा अपयशाची सर्व प्रकारची भीती, इ. गोष्टी मृत्यूच्या समोर गळून पडतात. मृत्यूचे स्मरण हे तुम्ही काहीतरी गमावणार आहात, अशा विचारांच्या सापळ्यात न अडकण्याचा एक प्रभावी मार्ग आहे, हे मला ठाऊक झाले आहे. तुम्ही आधीच मुक्त झालेले असता. तुमच्या हृदयाला न अनुसरायला तुम्हाला काहीच कारण नसते.
एक वर्षांपूर्वी मला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. सकाळी साडेसात वाजता माझे स्कॅनिंग झाले आणि स्वादुपिंडावर गाठ असल्याचे स्पष्ट दिसून आले. मला त्या वेळी स्वादुपिंड म्हणजे काय तेही माहीत नव्हते. डॉक्टरांनी मला सांगितले की, साधारण कधीही बरा न होण्यातला हा कॅन्सर आहे आणि मी जास्तीतजास्त तीन ते सहा महिने जगण्याची आशा करू शकतो. डॉक्टरांनी मला घरी जायला सांगितले आणि व्यावहारिक निरवानिरव करायला सांगितली, त्यात डॉक्टरांचा संकेत होता की मी मरणाच्या तयारीला लागावे. याचा अर्थ होता की माझ्या मुलांना पुढच्या १० वर्षांत जे सर्व काही सांगता आले असते ते काही महिन्यांतच मला सांगायला पाहिजे आहे. त्याचा अर्थ होता की, सारे काही ठप्प झाले आहे, याचा स्वीकार करावयाचा आहे, जेणेकरून हे कुटुंबालाही सोपे जाईल. थोडक्यात सर्वांना तुम्हाला अंतिम निरोप द्यायचा आहे.
तो पूर्ण दिवस मी त्या निदानाच्या सहवासात काढला. त्या संध्याकाळी माझी बायोप्सी झाली ज्यात त्यांनी माझ्या घशातून एक एन्डोस्कोप घातला. पोटातून तो आतडय़ात गेला. तिथून माझ्या स्वादुपिंडात एक सुई टोचली आणि त्या गाठीतून काही पेशी काढल्या गेल्या. मला भूल देण्यात आली होती. पण माझी पत्नी तिथे होती. तिने मला नंतर सांगितले की, जेव्हा डॉक्टरांनी सूक्ष्मदर्शकाखाली त्या पेशी बघितल्या तेव्हा ते अक्षरश: रडले, कारण त्यांच्या लक्षात आले की हा कॅन्सर स्वादुपिंडाच्या दुर्मिळ अशा कॅन्सरपैकी होता की, जो शस्त्रक्रियेद्वारे बरा होऊ शकत होता. माझ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि आता मी एकदम उत्तम आहे.
या वेळी मी मृत्यूच्या अगदी समीप होतो. आणि ही जवळीक पुढची काही दशके माझ्याजवळ टिकली. यातून बाहेर आल्यानंतर मी हे तुम्हाला आता थोड्याफार निश्चिततेने सांगू शकतो की मृत्यू ही उपयोगी, पण शुद्ध अशी एक बौद्धिक संकल्पना आहे.
मृत्यू कुणालाच नको असतो. ज्यांना स्वर्गात जाण्याची इच्छा असते त्यांनासुद्धा तिथे जाण्यासाठी मरण येणे नको असते. आणि तरीही आपणा सर्वांसाठी मृत्यू हेच अंतिम गंतव्यस्थान आहे. यातून कोणीही सुटलेला नाही. आणि दुसरे असे की मृत्यू हा जीवनातला एकमेव सुंदर असा शोध आहे. हा जीवनातील परिवर्तन-प्रतिनिधी आहे (Change Agent) जुने निकालात काढून नव्याला जागा देण्याचे काम तो करतो. आज आत्ता तुम्ही नवीन आहात, पण कालांतराने तुम्ही जुने होणार आहात आणि निकाली निघणार आहात. माझ्या या सत्यवक्तेपणाबद्दल क्षमा करा, पण हे पूर्णसत्य आहे.
तुमचा वेळ मर्यादित आहे, तेव्हा दुसऱ्याचे जीवन जगण्यात तो वाया घालवू नका. इतरांच्या वैचारिक निष्कर्षांच्या सापळ्यात सापडू नका. इतरांच्या मतांच्या कोलाहलात तुमचा आतला आवाज बुडू देऊ नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे हृदय व तुमचे अंतरज्ञान काय सांगते, त्याचेच अनुसरण करा. यांनाच हे पूर्ण माहीत असते की, तुम्हाला नेमके काय व्हायचे आहे. बाकी सर्व काही दुय्यम आहे.
मी जेव्हा तरुण होतो तेव्हा एक छान प्रकाशन होते, ज्याचे नाव होते 'दी होल वर्ल्ड कॅटलॉग'  (The Whole World Catalog). आमच्या पिढीचे ते बायबल होते. इथून जवळच असणाऱ्या मेन्लो पार्क येथील स्टेवार्ट ब्रँड याने ते सुरू केले, आणि आपला काव्यात्मक स्पर्श देऊन त्याला जिवंतपणाही आणला. ही गोष्ट साधारण १९६० च्या दशकाच्या अखेरीची होती; जेव्हा पर्सनल संगणक आणि डेस्कटॉप संगणक याद्वारे छपाई होत नव्हती. तेव्हा सर्वत्र टाइपराइटर्स, कात्र्या व पोलराइड कॅमेरे यांचा वापर होत असे. म्हणजे गुगलची पुस्तकी आवृत्ती असावी, अशासारखे ते असायचे. (गुगल त्यानंतर ३५ वर्षांनी अस्तित्वात आले.) ते आदर्श होते आणि योग्य साधने व महान कल्पना यांनी ते ओतप्रोत भरलेले असे.
स्टेवार्ट व त्याच्या चमूने 'दी होल वर्ल्ड कॅटलॉग'चे बरेच अंक काढले. आणि १९७० च्या मध्यात त्यांनी एक शेवटचा अंक काढला. त्या वेळी मी तुमच्या वयाचा होतो. त्या अंकाच्या मुलपृष्ठावर एक फोटो होता, विषय होता ग्रामीण भागातली एक सकाळ. तुम्ही पदभ्रमण वगैरे करत असाल तर तुम्हीही पाहिली असेल अशी सकाळ. त्या फोटोच्या खाली एक वाक्य होते 'भुकेले राहा. मूर्ख राहा.' (Stay Hungry. Stay Foolish) तो त्यांचा अंतिम संदेश होता- स्टे हंग्री, स्टे फुलिश. आणि मी तो संदेश कायम लक्षात ठेवला. आणि तुम्ही पदवीधारक होताना तुम्हीही तो संदेश लक्षात ठेवावा व आचरणात आणावा, अशी अपेक्षा करतो.
स्टे हंग्री, स्टे फुलिश. (भुकेले राहा. मूर्ख राहा.)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites