शिकण्यासारखं बरंच काही.. डॉ. प्रकाश बाबा आमटे... या प्रेरणादायी जीवनपटातून... - अतुल राजोळी (बॉर्न टू विन) ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

05 November 2014

शिकण्यासारखं बरंच काही.. डॉ. प्रकाश बाबा आमटे... या प्रेरणादायी जीवनपटातून... - अतुल राजोळी (बॉर्न टू विन)

नमस्कार मित्रांनो...

डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपट पाहिला, आणि न राहवून लिहायला बसलो. असे फार कमी चित्रपट असतात जे पाहिल्यानंतर मन सुन्न होतं आणि जीवनाकडे वेगळ्या दृष्टीकोनाने पाहण्यासाठी प्रेरणा मिळते.
डॉ. प्रकाश बाबा आमटे हा चित्रपटापेक्षा जास्त डॉ. प्रकाश आमटे यांच्या जीवनातील काही रोमहर्षक प्रसंगांवर आधारीत एक स्फुर्तीदायक जीवनपट आहे. हा चित्रपट पाहत असताना मला बर्‍याच गोष्टी डॉ. आमटे यांच्या कडून शिकायला मिळल्या त्या मी थोडक्यात मांडत आहे.
१. ज्याला 'का' जगायचं कळलं... त्याला 'कसं' जगायचं? हा प्रश्न कधीच पडत नाही.
डॉ. प्रकाश आमटे यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे 'हेमलकसा' या आदीवासी भागात जाऊन स्थायिक होऊन तिथल्या आदीवासी समाजाची वैद्यकीय सेवा करायची. आपल्या पत्नीबरोबर त्यांनी तिकडे स्थलांतर केल. आपलं सर्वस्व त्यांनी या एका उद्देशासाठी समर्पित केलं. जवळजवळ कोणत्याच प्रकारची मदत व साधन सामुग्री उपलब्ध नसताना त्यांनी हेमलकसा भागातील आदीवासी लोकांसाठी वर्षानुवर्षे सेवा केली. त्यांचा जगायचा उद्देश साध्य केला व खर्‍या अर्थाने ते अर्थपूर्ण जीवन जगले.
अर्थपूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्या जगण्याचा उद्देश आपण ठरवला पाहीजे व दृढनिश्चय करुन त्या मार्गावर कार्यरत राहीले पाहीजे.

२. अडचणी म्हणजे अडथळे नाहीत, अडचणींमध्येच लपलेल्या असतात संधी!
मित्रांनो 'हेमलकसा' ला गेल्यानंतर डॉ. आमटे यांच्या टीमने लगेच तयारी सुरु केली. परंतु आदीवासी लोकांना वैद्यकीय शास्त्र म्हणजे काय माहीत नव्हतं त्यामुळे त्यांच्याकडे उपचारासाठी आदीवासी लोक येतच नसत. जवळ जवळ दोन वर्ष कोणीही आदीवासी उपचारांसाठी आला नाही. ही दोन वर्षे बर्‍याच अडचणींना त्यांना तोंड द्यावी लागत होती. आदीवासी लोकांना पटवून देण्याचे निरनिराळे प्रयत्न सुरु होते. या अडचणीमध्येच आदीवासी लोकांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास निर्माण करण्याच्या संधीचा डॉ. आमटे शोध घेत राहीले व दोन वर्षानंतर त्यांना पहीला पेशंट सापडला! तो बरा झाला आणि मग आदीवासी लोक उपचारासाठी त्यांच्याकडे येऊ लागले.
Every Obstacle is an Opportunity!

३. प्रेम ही एक अशी भाषा आहे जी जगातील प्रत्येक माणसाला व प्राण्याला देखिल काळते.
मित्रांनो, डॉ. आमटे व त्यांच्या टीमला आदीवासी लोकांचा इलाज करत असताना भेडसावणारा मोठा प्रश्न असायचा 'भाषा'. दोघांनाही एकमेकांची भाषा कळायचीच नाही. परंतु प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या भावना त्यांच्या पर्यंत पोहोचत असत आणि त्यामुळे त्यांचा इलाज होणं सोइस्कर झालं. बरेच आदीवासी डॉक्टरांकडे त्यांना सापडलेल्या जनावरांची पिल्ल भेट म्हणून आणून देत असत. खरेतर ही पिल्ल अनाथ पिल्ल असायची. ह्यामध्ये वाघ, बिबट्या, अस्वल, हरण असे वन्य प्राणी असायचे परंतु ह्या सर्व प्राण्यांना डॉक्टरांनी आपले कुटुंबातील सदस्य असल्यासारखे लहानाचे मोठे केले.
माणसे आणि प्राणी... पैसा, अन्न व ऐश्वर्य पेक्षा प्रेमाची जास्त भुकेली आहेत.

४. ताबा क्षेत्राबाहेरील आपत्तीचा अथवा अडचणींचा विरोध करु नका.. त्यांचा आनंदाने स्विकार करा...
डॉ. आमटे व त्यांच्या तीम समोर काही असे प्रसंग अले तेव्हा ते अक्षरशः हतबल झाले. त्यांच्याकडे काही करण्यासारखचं नव्हते. सर्व सामान्य माणूस अश्या परिस्थितीमध्ये विचलीत होतो आणि खचून जातो. परंतु डॉक्टर आमटे अश्या परिस्थितीत आपल्या टीमला धीर द्यायचे व बर्‍याच वेळा अश्या परिस्थितीत असताना देखिल ते छोटा विनोद करायचे, ज्यामुळे वातावरण हलकं होऊन सगळे काम करण्यासाठी सकारात्मक मनस्थितीमध्ये यायचे. 
माझ्यामते कठीण प्रसंगांना हसतपणे सामोरे जाणे हा डॉ. आमटे यांचा गुणधर्म खरोखर आपण आत्मसात करण्यासारखा आहे.

५. खरा आनंदाचा क्षण जेव्हा आपल्याला एखादा मोठा पुरस्कार मिळतो तो नसून जेव्हा आपल्या प्रयत्नांमुळे दुसर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य येते तो असतो.
डॉ. आमटे यांना कित्येक मोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात मॅगेसेसे पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार इत्यादींचा समावेश आहे. परंतु डॉ. आमटे व त्यांच्या टीमसाठी सर्वात आनंद देणारा क्षण असायचा. जेव्हा एखादा रोगी त्यांच्या दवाखान्यातून बरा होऊन जाताना हसत-हसत जायचा. असे काही क्षण चित्रपटात आहेत जे एक प्रेक्षक म्हणून आपल्याला भावूक करतात व आपले आनंदाश्रू अनावर होतात. 

६. महान व्यक्तींच्या चारित्र्याचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'विनम्रता'
डॉ. आमटे यांच्यातील एक प्रकर्षाने जाणवणारा गुणधर्म म्हणजे त्यांची विनम्रता व साधेपण. हेमलकसा येथील लोकांना घालायला कपडे नाहीत त्यामुळे आपल्याला पँट शर्ट घालून त्यांची सेवा करण्याचा हक्क नाही असे त्यांचे विचार असल्यामुळे त्यांनी पँटशर्टचा त्याग केला. उच्च आणि स्वतंत्र्य विचार सरणी परंतु साधं राहणीमान त्यामुळे ते लोकांच्या मनात घर करुन बसले. हेमलकसाच्या लोकांसाठी डॉ. प्रकाश आमटे हे जणू देवच आहेत.

७. आपल्या कामावर संपूर्ण श्रध्दा 
इतक्या बिकट परिस्थितीमध्ये काम करण्याची शक्ती एखाद्या माणसामध्ये तेव्हाच येऊ शकते. त्या माणसाची आपण करत असलेल्या कामावर प्रचंड श्रध्दा आहे. डॉ. आमटे देवाला मानत नाहीत. त्यांची श्रध्दा निसर्गावर आहे. त्यांची श्रध्दा माणसामधल्या आणि प्राण्यांमधल्या देवावर आहे. डॉ. प्रकाश आमटे यांची नितांत श्रध्दा त्यांच्या कामावर आहे. जिथे श्रध्दा आहे तिथेच आपण स्वतःला समर्पित करु शकतो. आणि जिकडे आपण स्वतःला समर्पित करतो तिकडेच आपण असाध्य किंवा अलौकीक गोष्टी साध्य करु शकतो. काही असाध्य... अलौकीक गोष्टी डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी साध्य केल्या. माझ्यामते त्या ते करु शकले कारण त्यांच ते करत असलेल्या कामावर नितांत श्रध्दा आहे त्यामुळेच!

मित्रांनो, मी आपणा सर्वांना मनापासून सल्ला देऊ इच्छितो की नक्कीच हा चित्रपट पहा... थिएटरमध्ये जाऊन पहा... एक थरारक... प्रेरणादयी... अविस्मरणीय... अविश्वसनीय अनुभव तुम्ही घ्याल याची मी नक्कीच गॅरेंटी देतो.
(लेख आवडल्यास शेअर करा)

अतुल राजोळी (बॉर्न टू विन)

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites