केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे! Just do it! - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 February 2015

केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे! Just do it! - अतुल राजोळी

नमस्कार मित्रांनो,
माझे गुरू डॉ. डेव्हीड लिंकन, ज्यांच्याकडून मी NLP शिकलो, त्यांनी मला यशाचा एक जबरदस्त कानमंत्र दिला. त्यांनी मला सांगितले की, "To be successful you need to follow a simple formula for success... 'Just do it'...!" हा फॉर्म्युला ऐकून मी सुरुवातीला थोडासा चक्रावलो! मी सरांना म्हटलं की, "Sir, is it really a formula for success? As far as I know it's a tagline of NIKE!" आम्ही दोघेही हसलो. मग सर म्हणाले की, "अतुल, सृष्टी फक्त अशाच माणसांना मदत करते जे कृती करतात. सृष्टीची कृपादृष्टी जे आपण करतो त्यावर असते, जे आपण जाणतो त्यावर नव्हे! हा फंडा समजायला फार सोपा आहे परंतु बरीच माणसं बरंच काही करतात परंतु त्यांना जे खरोखर हवे आहे त्या दिशेने कृती मात्र करत नाही. प्लॅनिंग करणं नक्कीच महत्त्वाचं आहे. परंतु बरीच माणसं फक्त प्लॅनिंग करतात, विचार करण्यात बराच वेळ घालवतात. आणि कोणत्या तरी मुहूर्ताची वाट पाहत बसतात. त्यांना असं वाटतं की, योग्य वेळेवर आपण कृती करू. आणि योग्य वेळ त्यांच्या आयुष्यात कधी येत नाही आणि यशापासून ते वंचित राहतात! या उलट कृती केल्याने आपल्या विचारांना चालना मिळते, आयुष्याला ऊर्जा प्राप्त होते व आपल्या आजूबाजूला  सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला परिणाम प्राप्त होतात." मित्रांनो आजपासून जवळजवळ चार वर्षांपूर्वी सरांनी मला दिलेल्या या मंत्राला मी प्रामाणिकपणे आचरणात आणलं. मी आणि बॉर्न टू विनच्या आमच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत नेहमी जास्तीतजास्त कृतीवर भर दिला. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की, जे परिणाम आम्हाला प्राप्त झाले ते खरोखरच जबरदस्त आहेत. 'Just do it...!' या साध्या व सोप्या मंत्राचा इतका फायदा होईल हे त्या वेळी मला जाणवलं नव्हतं.
मित्रांनो, आज माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की, कृतीमध्ये प्रचंड ताकद आहे. यश मिळवण्यासाठी कृती करणं अत्यावश्यक असतं. आपल्याकडे जगातील सर्व ज्ञान असेल परंतु आपण काही कृतीच केली नाही व त्या ज्ञानाचा वापरच केला नाही तर काय उपयोग? जर आपली स्वप्नं मोठी आहेत, ती स्वप्नं साकार करण्याची क्षमतादेखील आहे. परंतु ती स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक कृतीच आपण केली नाही तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. बर्‍याच वेळा तो असा विचार करतो की, मी त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. परंतु तो काहीच करत नाही. तर त्याला काय प्राप्त होईल? `काहीच नाही`.
BMW ही एक उत्कृष्ट कार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ती कार फक्त शोरूम किंवा गॅरेजमध्ये पडून असेल तर त्या कारचा काय फायदा? जोपर्यंत कोणी तरी त्या कारमध्ये बसून तिचं इंजिन सुरू करत नाही तोपर्यंत त्या कारच्या खर्‍या क्षमतेला काही अर्थ नाही. जेव्हा कारचं इंजिन सुरू असेल आणि ती वेगात पुढे जात असेल तेव्हाच त्या इंजिनचा वापर होईल  व इतर माणसं त्या कारला डोळे विस्फारून पाहतील!

कृतीमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते
बहुतांश माणसं जी आपल्या खर्‍या क्षमतेचा कधीच ठाव घेत नाहीत, त्यांच्याकडे स्वप्नंच नसतं किंवा जर स्वप्नं असेल तर ते साकार करण्यासाठी ते कृतीच करत नाहीत. जगातील प्रत्येक माणसामध्ये प्रचंड क्षमता आहे.
यातील बरीच माणसं आपल्या खर्‍या क्षमतेचा ठाव घेतल्याशिवायच संपूर्ण आयुष्य जगतात. बरीच माणसं संपूर्ण आयुष्यभर असं काही करतात जे त्यांना अजिबात आवडतच नाही. बरीच माणसं आपल्या मनाविरुद्ध आयुष्य जगातत. त्यांना जाणवत असतं की, आपल्यामध्ये काही तरी असामान्य दडलेलं आहे परंतु कोडं कधीच उलगडत नाही. अशा व्यक्तींना वाटत असतं की, "माझ्याकडे खूप पैसे असते तर किती बरं झालं असतं.", "मला चांगली नोकरी मिळाली असती तर फार छान झालं असतं", "माझं शिक्षण जास्त झालं असतं तर मी प्रगती करू शकलो असतो. "अशा व्यक्तींच्या फक्त बर्‍याच इच्छा असतात. परंतु त्या इच्छांचं रूपांतर स्वप्नांमध्ये व ध्येयांमध्ये ते करत नाहीत व त्याला अनुसरुन ते कृती कधीच करत नाहीत. कृतीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कृती केल्याने आपली देहबोली बदलते. आपण उत्साही बनतो. आपली मन:स्थिती टवटवीत होते. एक उदाहरण पाहू या, आपण कधीतरी संध्याकाळी दमून भागून घरी येतो. दिवसभराच्या दगदगीमुळे शारीरिक व मानसिकरीत्या प्रचंड थकवा आपल्याला जाणवत असतो. आपण घरी आल्या आल्या झोपण्यासाठी गादीवर आडवे व्हायच्या मन:स्थितीत असतो आणि अचानक आपल्याला एक फोन येतो आणि आपल्याला सांगण्यात येतं की जो प्रोजेक्ट आपण बर्‍याच दिवसांपासून मिळवण्याच्या प्रयत्नात होतो तो आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी दोन दिवसांत रिपोर्ट सबमीट करावा लागणार आहे. हे कळताच क्षणी आपला आनंद गगनात मावत नाही, आपला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. आपण चटकन फ्रेश होतो, कपडे बदलतो व आपल्या सहकर्मचार्‍यांना फोन करून ही आनंदाची बातमी सांगतो. आपली देहबोली बदलते. आपण पुढच्या दोन दिवसांसाठी आपली कृती योजना बनवतो व रिपोर्ट तयार करण्याच्या तयारीला लागतो. आपण आपोआपच सकारात्मक मन:स्थितीत येतो. नकारात्मक मन:स्थिती व थकवा कुठल्याकुठे उडून जातो!
कृतीमुळे भीती दूर होते!
बरीच माणसं कृती न करण्यामागचं कारण असतं अपयशाची भीती! भीतीला इंग्रजीमध्ये FEAR म्हणतात. FEAR चा माझ्या मते अर्थ पुढील प्रमाणे असला पाहिजे. 'False Enemy Appearing Real' म्हणजेच भीती म्हणजे आपला असा शत्रू तो खरा अस्तित्वातच नसतो परंतु आपल्या मनात त्याचे असे रक्तरंजित चित्र आपण निर्माण करतो की, तो खरा वाटू लागतो. या स्वकल्पित शत्रूला आपण एवढे घाबरतो की, आपण कृती करत नाही. विरोधाभास असा की, भीतीवर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे कृती!
आपल्या मनात कोणतीही भीती ही अजाणतेपणामुळे किंवा भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे निर्माण झालेली असते. आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपण काही ना काही परिणाम साध्य करतो व त्यातून अनुभव निर्माण करतो. या अनुभवमुळे आपला आत्मविश्वास वाढतो व भीतीचा अंत होतो. या उलट आपल्याला एखाद्या गोष्टीच्या भीतीने पछाडले असताना आपण काहीच कृती करत नाही तेव्हा आपला अजाणतेपणा आणखी वाढतो, त्यामुळे आपला आत्मविश्वास आणखी ढासळतो व भीती आणखी वाढते.
मित्रांनो, माझा एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मला पोहता येत नाही. माझ्या पाण्याच्या भीतीमध्ये आणखी भर पडली जेव्हा माझ्या एका चांगल्या मित्राचं तलावात बुडून निधन झालं. माझी पाण्याबद्दलची भीती दिवसेंदिवस वाढू लागली. मी त्यावर काही कृतीदेखील केली नाही. एक दिवस मी मुद्दाम पाण्याची भीती दूर करायचं ठरवलं. लाईफ जॅकेट घालून मित्रांच्या मदतीने तलावात उतरलो व पाण्यात पोहण्याचा अनुभव घेतला. सुरुवातीला अक्षरश: माझी फाफरली होती. परंतु थोड्या वेळानंतर मी एंजॉय करत होतो. आता मला पाण्याची भीती वाटत नाही !
माझ्या अनुभवारून मी ठामपणे सांगू शकतो की, भीती वाटली की बिनधास्तपणे कृती करा.
कृतीमुळेच परिणाम साध्य होतात
कृतीमुळे काही ना काही परिणाम साध्य होतोच मग तो अपेक्षित परिणाम असेल किंवा अनपेक्षित. कृती केल्यावर काहीच परिणाम साध्य झाला नाही असं होणारच नाही. उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याने आपलं प्रेझेंटेशन ग्राहकासमोर केल्यानंतर ग्राहक `हो` तरी म्हणतो किंवा काही तरी कारण सांगून टाळाटाळ करतो.
परंतु सांगायचा मुद्दा हा आहे की, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम साध्य होतोच.
यशस्वी माणसं सतत कृती करतात. त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाल्यानंतर पुढील उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृती करतात. जर त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत तर परिणामांचं आणि कृतीचं विश्लेषण करतात व आपल्या कृतीमध्ये योग्य तो बदल करून पुन्हा कृती करतात. अपेक्षित परिणाम साध्य होईपर्यंत आपल्या कृतीमध्ये सतत बदल करतात !
कृती करण्याची योग्य वेळ कोणती?
आज, आत्ताच मुहूर्त टाळू नका!
कृतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चालढकल करणं!
बर्‍याच माणसांना ठाऊक असतं की, आपण काय केलं पाहिजे परंतु ते कृती करण्यासाठी चालढकल करत असतात. चालढकल करण्यामागची बरीच कारणं आहेत. प्रमुख कारण भीती हेच असलं तरी आळशीपणा हादेखील कृतीच्या आड येत असतो. कृती करण्याच्या आड काहीही येऊ दे, भीती किंवा आळशीपणा, या दोन्ही गोष्टींना झटकण्यासाठी मुहूर्ताच्या शोधात राहू नका! मला विचाराल की कृती करण्याची योग्य वेळ कोणती? मीं म्हणेन की, आत्ता हीच वेळ आहे कृती करण्याची. आत्ता, ह्याच क्षणी आपण ताबडतोब कृती केली पाहिजे. जास्त विचार करू नका. आत्ता तडक उठा आणि कामाला लागा. लक्षात ठेवा, कृती केल्यानेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कृतीमुळेच भिती नाहीशी होते आणि कृतीमुळेच परिणाम साध्य होतात. म्हणूनच आत्ता ह्या क्षणाचा मुहूर्त टाळू नका!
खालील पायर्‍या आपल्याला आत्ता ह्या क्षणी कृती करण्यासाठी प्रेरक ठरतील.
१) एक कागद घ्या आणि पेन घ्या आणि अशा पाच कृती लिहा ज्या बर्‍याच लहानात लहान कृती असेल्या तरी चालेल. एखादा फोन कॉल, ई-मेल, पुस्तक वाचणं, एखादं ताटकळत राहिलेलं काम. काहीही असो. कमीत कमी पाच कृतींची यादी बनवा.
२) उठा, आता एक-एक काम एका मागोमाग एक सरळ करून टाका. आज दिवस संपण्याच्या आत कमीत कमी एक गोष्ट तरी करून टाका. (नाही तर मी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन त्रास देईन !!!)
Just do it!
केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे!

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites