May 2019 ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

30 May 2019

"नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयातून ✌🏻शिकण्यासारखे ७ उद्योजकीय धडे"



  "नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक विजयातून ✌🏻शिकण्यासारखे ७ उद्योजकीय धडे"

नमस्कार उद्योजक मित्रांनो, भारतामध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुका आणि त्याचे ऐतिहासिक निकाल आपण पाहिले. या वेळच्या निवडणुका म्हणजे 'कांटे की टक्कर' होती. एन.डी.ए. (भाजप आणि मित्र पक्ष) च्या विरोधकांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान बनू न देण्याचा चंग बांधला होता. प्रतिस्पर्धी पक्ष आणि नेते, नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एकत्र आले होते, असं असून सुद्धा नरेंद्र मोदी प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. पुढील पाच वर्षे भारताला स्थिर नेतृत्त्व लाभले. या निवडणुकीमधून एक उद्योजक म्हणून आपण कोणते ७ धडे शिकले पाहिजेत, हे या लेखामध्ये मी आपल्या समोर मांडत आहे.

♦️टीप - या लेखाचा उद्देश उद्योजकांनी, दैनंदिन जीवनातील गोष्टींचा संदर्भ घेऊन आपल्या व्यवसायात काहीतरी नविन शिकावे हा आहे. त्यामुळे कृपया याकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये.

♦️धडा पहिला - बाजारपेठेत आपली व आपल्या व्यवसायाची उत्कृष्ट प्रतिमा म्हणजेच ब्रँड निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे:
मित्रांनो, लोक लॉजिकल विचार करतात, परंतु बहुतांशी महत्वाचे निर्णय आणि कृती भावनांनी प्रभावीत होऊन करतात. भारतीय जनता पक्षाने नरेंद्र मोदी यांची Larger Than Life अशी 'प्रामाणिक, देशभक्त आणि राष्ट्राच्या विकासासाठी समर्पित लिडर' अशी प्रतिमा बनवण्यासाठी जाणीवपूर्वक विशेष प्रयत्न केले आणि त्यात ते यशस्वी झाले. ज्याप्रमाणे मतदान करताना लोक भावनांना प्राधान्य देतात, त्याच प्रमाणे ग्राहक सुद्धा उत्पादन विकत घेताना उत्पादनाच्या भावनिक प्रतिमेला प्राधान्य देतात. उत्पादनाची वेगळी आणि विश्वास्नीय प्रतिमा म्हणजेच ब्रँड..! यावेळच्या निवडणुका एन.डी.ए. ने 'ब्रँड मोदी' च्या जीवावर जिंकल्या असं जर आपण म्हणालो तर ते वावगं ठरणार नाही. त्याच प्रमाणे उद्योजकांनी बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची, उत्पादन आणि सेवेची वेगळी आणि विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

♦️धडा दुसरा - स्पष्ट व्हिजन आणि भक्कम विचारधारा
मित्रांनो, निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आपण सर्वांनी पहिले प्रतिस्पर्धी पक्ष नेते (आणि काही निवडणूक न लढणारे नेते सुद्धा) मोदी सरकारवर फक्त टीका करण्यात गुंग होते. प्रचारसभा दरम्यान एकमेकांवर टीका होणं स्वाभाविक आहे. परंतु देशासाठी आपलं व्हिजन काय? आपल्या पक्षाची नेमकी विचारधारा काय? या बाबत फार कमी खुलासा केला जात होता. सगळे प्रतिस्पर्धी एकत्र येऊन फक्त मोदींना पाडण्याच्या विचारांनी एकत्र आलेले दिसले. ही विचारधारा भक्कम नक्कीच नव्हती. मतदार त्यामुळे प्रतिस्पर्धी पक्षांच्या विचारधारेबद्दल शेवटपर्यंत संभ्रमात राहिला. एवढंच नव्हे तर प्रतिस्पर्धी पक्षांचे नेते आणि समर्थक सुद्धा निरनिराळ्या प्रसार-माध्यमांमध्ये गोंधळलेले आढळले. या उलट भाजपा च्या विचारधारेमध्ये 'राष्ट्रवाद' स्पष्टपणे सर्व प्रचार-मंचांवर व्यक्त झाला. भाजपचे नेते प्रसार-माध्यमांमध्ये आपली राष्ट्रीय विचारधारा प्रभावीपणे मांडताना दिसले, सर्वांच्या संभाषणामध्ये एकसूत्रता होती. त्याच बरोबर भविष्याबद्दलचे व्हिजन सुद्धा परिणामकारकपणे मांडण्यात आले. उद्योजकांना यामधून हे शिकलं पाहिजे की, व्यवसायाची पायाभूत विचारधारा आपल्या संघामध्ये रुजवल्यामुळे, व्यवसायाला दूरगामी यश मिळवून ते टिकवून ठेवण्यासाठी साहाय्यभूत ठरते.

♦️धडा तिसरा - विचारपूर्वक आराखडा (स्ट्रॅटजी) आणि जबरदस्त अंमलबजावणी
मित्रांनो, भाजपने निवडणुकांच्या प्रचारादरम्यान काही विशिष्ट मुद्दे प्रत्येक वेळी ठळकपणे आणि सातत्याने मांडले (आणि काही मुद्दे जाणीवपूर्वक पणे टाळले). गेल्या पाच वर्षामध्ये केलेली विकासाची कामे, नवीन योजनांची यशस्वी अंमलबजावणी, पाकिस्तान आणि आतंकवादाविरुद्ध कठोर लष्करी कारवाई, भारताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण झालेले महत्त्व, इत्यादी गोष्टी प्रत्येक सभेमध्ये आणि प्रसारमाध्यमांमध्ये बोलल्या जात होत्या. गेल्या पाच वर्षात काही निर्णयांना यश आले नाही, परंतु भाजपने चतुराईने ते मुद्दे टाळले. यामागे नक्कीच एक विचारपूर्वक स्ट्रॅटजी तयार केली गेली असावी. प्रचार सभांचे यशस्वी आयोजन, प्रसिद्धी माध्यमांचा योग्य वापर, नेत्यांचा सोशल मिडियाचा प्रभावीआणि सक्रीयसहभाग अश्या विविध पातळ्यांवर जबरदस्त अंमलबजावणी करण्यासाठी पडद्यामागे योग्य टीम कार्यरत होती याबद्दल काहीच शंका नाही. उद्योजकांना यामधून हे शिकलं पाहिजे की, व्यवसायाचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आपली बलस्थाने आणि कमतरता यांबाबत विचारमंथन करून एक योग्य आराखडा तयार केला पाहिजे आणि अंमलबजावणी करण्यासाठी योग्य व्यक्तींना, योग्य पद्धतीने कार्यरत केले पाहिजे.

♦️धडा चौथा - उत्कृष्ट संघबांधणी - मोदी आणि शहा यांची पूरक जोडी
मित्रांनो, नरेंद्र मोदी फ्रंट स्टेजवर मतदारांना प्रभावित करत होते तर, अमित शहा बॅक स्टेजवर प्लानिंग, मॅनेजमेंट आणि ऍडमिन सांभाळत होते. दोन्ही अत्यंत महत्वाच्या आणि एकमेकांना पूरक अशा भूमिका, मोदी आणि शहा यांनी अत्यंत सरसपणे पार पाडल्या. अमित शहा यांनी जर बॅक स्टेज प्रभावीपणे मॅनेज केले नसते तर, मोदींसारखे करिश्माई नेता अशी अलौकिक कामगिरी करू शकले नसते. उद्योजकाचे खरे काम व्यवसायाचा विकास करणं हेच असतं, परंतु बरेच उद्योजक दैनंदिन कामकाजात फसतात आणि त्यांना त्यांच्या खर्या कार्याकडे लक्ष देणं कठीण होऊन बसतं. अमित शहा यांच्या सारखा एक जबरदस्त बॅक स्टेज सांभाळणारा 'ऍडमिनीस्ट्रेटर' म्हणजेच उत्कृष्ट सहकाऱ्यांची दुसरी फळी उद्योजकाच्या जोडीला असेल तर व्यवसायाची सुसाट प्रगती नक्कीच होऊ शकेल.

♦️धडा पाचवा - ग्राहकांच्या हिताला प्रथम प्राधान्य
मित्रांनो, लोकशाही मध्ये मतदार हा राजा असतो. 'सत्ता कोणाची?' हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्याच्याकडे असते. त्याचप्रमाणे कोणते उत्पादन बाजारपेठेमध्ये राज्य करणार? हे ग्राहक ठरवतो. माझ्यामते बहुसंख्य भारतीय जनतेच्या मनात काय आहे? हे मोदींना ओळखण्यात यश आलं, असं म्हणायला हरकत नाही. मोदींनी मतदारांच्या गरजा ओळखून, त्या पूर्ण करण्याचे प्रामाणिक प्रयत्न कायम ठेवले. त्यामध्ये गेल्या पाच वर्षात संपूर्णपणे मोदी यशस्वी झाले, असं मी मुळीच म्हणणार नाही परंतु लोकांना त्या दिशेने होणार्या कार्याबद्दल विश्वास वाटला. उद्योजकांना सुद्धा आपल्या प्रत्येक निर्णयामागे ग्राहकांच्या हिताचा विचार करणं गरजेचं आहे. ग्राहकांच्या सतत संपर्कात राहून त्यांच्या गरजा समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. तरच ग्राहक राजा बाजारपेठेची सत्ता आपल्या हातात देईल.

♦️धडा सहावा - परिणामकारक मार्केटिंग
मित्रांनो, Visibility + Credibility = Profitability हा मार्केटिंग फॉर्म्युला मोदींच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडला. भारतातील १ अब्ज पेक्षा जास्त जनतेपर्यंत मोदींच्या नेतृत्त्वाबाद्द्ल जागरूकता निर्माण करणं. ते सुद्धा अश्या वेळी जेव्हा प्रतिस्पर्धी आणि त्यांचे समर्थक मोदी विरुद्ध संदेश पसरवण्यात भिडलेले आहेत. ही एक मोठी आणि आव्हानात्मक गोष्ट होती, परंतु मोदींचे परिणामकारक मार्केटिंग करण्यात भाजपला यश मिळाले. माझ्या मते तीन पातळीवर हे मार्केटिंग झाले. १. Visibility २. Credibility आणि ३. Outreach. Visibility द्वारे मोदी हे एन.डी.ए. चे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत हा संदेश तमाम भारतीयांपर्यंत पोहोचवणे. Credibility द्वारे त्यांची विशिष्ट आणि विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यात आली. Outreach द्वारे मोदींनी वेळोवेळी मतदारांबरोबर संपर्क डायरेक्ट साधला आणि आपले विचार मांडले. टी.व्ही. चॅनेल, वर्तमानपत्र आणि सोशल मिडिया यांनी या मध्ये प्रमुख भूमिका बजावली. उद्योजकांनी या मधून असं शिकलं पाहिजे कि आपले उत्पादन कितीही चांगले असले तरीही सातत्त्याने निरनिराळ्या माध्यमाद्वारे ग्राहकांच्या संपर्कात राहायला हवे, तरच आपण ग्राहकाच्या लक्षात राहू आणि ग्राहक आपले उत्पादन विकत घेण्यासाठी पुढे सरसावेल.

♦️धडा सातवा - परिश्रमांना पर्याय नाही
मित्रांनो, नरेंद्र मोदी यांना २०१४ निवडणुकांमध्येअभूतपूर्व यश मिळालं होतं. तरी सुद्धा २०१९ च्या निवडणुका दरम्यान त्यांनी २०१४ च्या यशाला गृहीत धरलं नाही. नरेंद्र मोदी यांनी २०१९ च्या प्रचारादरम्यान, दर दिवसाला सरासरी २ प्रचार सभा घेतल्या. इतकंच नव्हे प्रचारादरम्यान काही दिवस तर, त्यांनी एकाच दिवशी तीन सभा, तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रवास करून घेतल्या. २०१९ मध्ये प्रचाराला तशी उशिरा सुरुवात झाली. २८ मार्च ते १७ मे २०१९ या कालावधी दरम्यान मोदींनी एकूण १३० प्रचार सभांना संबोधले. उद्योजकांनी या मधून असं शिकलं पाहिजे की, प्राथमिक यशाने हुरळून न जाता, आपल्या कामावर निष्ठा ठेवा, मनापासून आपल्या ध्येयाच्या दिशेने अथक परिश्रम घ्या आणि त्यात सातत्य ठेवा. स्वतःची शारीरिक आणि मानसिक उर्जा प्रफुल्लीत ठेवा. जर उत्साही असाल तरच परिश्रम घेऊ शकाल. वयाच्या ६८व्या वर्षी जर मोदी इतकं प्रचंड काम करू शकतात तर आपण नक्कीच त्यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतो.
धन्यवाद..!
©️ अतुल राजोळी
व्यवसाय प्रशिक्षक
संचालक, लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट🎯
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites