LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 July 2017

हे आहेत भारतातील वॉरन बफे...

घरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली.
संघटित रिटेल क्षेत्रातील अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमानी. 'आर के दमानी' नावाने प्रसिद्ध असणार्‍या दमानींनी 2000 साली डी-मार्टची स्थापना केली.
स्वतःभोवती अजिबात प्रसिद्धीचं वलय न बाळगणार्‍या दमानी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांविषयी कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणार्‍या दमानींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. आणि डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.


डी-मार्टचे अनेक स्टोअर्स दुकाने रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना(व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचार्‍यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांना कामाचे पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते.
साधारणपणे 1999 मध्ये दमानी यांनी रिलायन्स रिटेलच मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. दामोदर माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमानी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.


डी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमानी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.
शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमानी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमानी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे!
- गौतमी औंढेकर, सकाळ


Source : http://www.esakal.com/arthavishwa/gautami-aundhekar-writes-about-rk-damani-36543
#शेअर #गुंतवणूकदार #Dmart #RKDamani #डीमार्ट #दमानी

03 July 2017

आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या

तुमचे मन शांत ठेवण्याचे काही उपाय पुढे दिले आहेत. नेहमी तुमच्या वर्तमानाविषयी जागरुक रहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. तुमच्या अंतर्मनातील शांततेचा अनुभव हे क्षण देत असतात त्याचबरोबर वस्तुस्थितीला सामोरे जाण्याची ताकदही.
स्वस्थचित्तासाठी दीर्घश्वसन : श्वसनाच्या व्यायामामुळे तुमचे शरीर स्वस्थचित्त बनते. शरीर आणि मन ताजेतवाने होते. दिर्घ श्वसनामुळे अंतरात्म्याशी संवाद शाधता येतो.


इतरांकडून शिका : शिकणे ही कायमस्वरुपी चालणारी प्रक्रीया आहे. तुमच्या अवती-भवती वावरणार्‍यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा. ते आपले सर्वोत्कृष्ट शिक्षक असतात. त्यांच्याकडून चांगले गुण घ्या. त्यांच्या अनुभवातून शिकत रहा.

निसर्गातील सौंदर्य न्याहळा : निसर्ग ही देवाची सगळ्यात सुंदर निर्मिती आहे. पक्ष्यांचे गाणे, वाहणार्‍या पाण्याचा आवाज, निसर्गाची साद हे सगळे मनुष्याला सुखावणारे असते त्याचा आस्वाद आणि आनंद कसा घ्यायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावे लागते. लवकर उठा, फिरायला जा, सूर्योद्यापूर्वीचा निसर्ग मनात साठवा, लांबवर एकटेच चालत जा. या सगळ्यातून निसर्गातील सौंदर्याची आणि सुप्त ऊर्जेची जाणीव आपल्याला होते.

संगीताची ताकद :  तुमच्या आवडीचे संगीत ऐका. कुणाचीही फिकीर न करता मस्त पैकी नृत्य करा. त्यामुळे तुमचे मन शांत होण्यास मदत होईल. मन आणि शरीराचे सूर जुळण्यासाठी संगीताचा खूपच उपयोग होतो.


स्वतःच्या विचारांबरोबरील लढाई थांबवा : नेहमी एकाचवेळी तुमच्या डोक्यात अनेक विचारांची गर्दी झालेली असते. हे करु का ते करु, पहिल्यांदा काय करु, त्याचे कसे होणार , घाई केली पाहिजे, हा लगेच दारात उभा आहे अशा गोष्टींनी मेंदू चक्रावून गेलेला असतो. अशा गोंधळामुळे अजिबात घाबरुन जाऊ नका. विचारांचे येणेजाणे चालूच राहिले तरी त्याकडे गरजेनुसार दुर्लक्ष करायला शिका.

विसरा आणि माफ करा : भूतकाळात कधी तरी तुम्ही लोकांना दुखावले असेल. त्या खेदजनक आठवणी अजूनही तुमच्या मनात असतील. तुम्हांला वेदना देणार्‍यांना माफ करा आणि त्या आठवणींमधून बाहेर पडा.


सौजन्य: संध्यानंद

23 June 2017

इच्छाशक्तीमुळे तुमचे जग तुम्ही नक्कीच बदलू शकता!

आपण आपली इच्छाशक्ती वाढवून आपल्या रोजच्या जगण्यात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो का? याचे उत्तर होय असे असेच आहे. त्यामुळे तुम्हाला जगताना सहजपणे प्रत्यक्षात आणता येऊ शकतात असे काही उपाय आज सांगणार आहे. हे उपाय तुमच्या जगण्यातील सवय बनून गेले तर आयुष्य बदलून जाईल.
ज्या-ज्यावेळी आपण आपल्या दिवसभराच्या नियोजनात सुधारणा करतो. म्हणजेच आपण स्वनियंत्रण ही संकल्पना प्रत्यक्षात जगत असतो. स्वतःवर जितके जास्त नियंत्रण म्हणजेच प्रबळ इच्छाशक्ती होय. छोटे बदल करण्यात आपण यशस्वी झालो तर मोठे ध्येय ठेवून ते साध्य करण्याची क्षमता आपण विकसित करु शकतो. ब्रश करणे, खाणे, दरवाजा उघडणे आदी कृती तुम्ही ज्या हाताने करता त्याच्या विरुध्द हाताने त्या करुन पाहा. सुरुवातीला अगदी विचित्र वाटेल पण, दिर्घकाळात त्यातून इच्छाशक्ती वाढण्यास मदत होईल.

मेंदूला ऊर्जा मिळणे आवश्यक : जेवणाच्या वेळा कधीही चुकवू नका. आपला मेंदू म्हणजे आपल्यासंदर्भात निर्णय घेणारा महत्त्वाचा अवयव आहे. त्याला अन्नद्रव्यांचा पुरेसा पुरवठा झाला आहे किंवा नाही यावरच त्याने योग्य निर्णय घ्यावा यासाठी आवश्यक ती जबरदस्त इच्छाशक्ती निर्माण होणार आहे. त्यामुळे रोज नियमित आणि वेळच्यावेळी जेवण करा. जेवणात आरोग्यदायी प्रोटीन्स, भाज्या यांचा समावेश असू द्या. पचनाला जड असणारे पदार्थ टाळा.


एकावेळी एकाच बदलावर लक्ष केंद्रीत करा : इच्छाशक्ती वाढवता येऊ शकते. ती दिर्घकालीन प्रक्रीया आहे. एखादे अवघड वाटणारे काम सरावाने आपल्याला सोपे वाटू लागते तसेच इच्छाशक्ती वाढवण्याच्या प्रक्रीयेचे आहे. आपल्याला एकदम एका दिवसात सगळा बदल करता येणार नाही. आपल्याला खरोखर झालेला बदल आणि त्यातील फायदे अनुभवायचे असतील तर सुरुवातीला छोट्या गोष्टीमध्ये बदल करा. एकावेळी एकच ध्येय ठेवा आणि ते साध्य करा.


प्रभावी सवयी आत्मसात करा : संशोधनातून हे सिध्द झाले आहे, की चांगल्या सवयीतून आपली इच्छाशक्ती बळकट होते. साधी गोष्ट आहे. रोज झोपताना बेडशीट बदलायचे आणि उठल्यावर पांघरुण घडी घालून ठेवायचे. यातून आपल्या इच्छाशक्तीवर जबरदस्त सकारात्मक परिणाम होतो. कारण छोट्या सवयींमधून स्वयंशिस्त आणि स्वनियंत्रण वाढते आणि ते शरीरात भिनते.

रोजच्या कामाचे व्यवस्थापन : आपली रोजची कामाची यादी असते. आपण विचार न करता उगाचच लांबलचक यादी बनवली आणि त्यातील अनेक कामे झाली नाहीत तर मग आपले मन आपल्याला खाते. मग प्रत्यक्ष काम करण्या ऐवजी आपण जास्त काळजी करु लागतो. आपला मूड खराब होतो. मग त्यातून आपण भावनिक बनतो आणि नको त्या गोष्टींच्या आहारी जातो. त्यासाठी दिवसअखेर जास्तीत जास्त कामे झालेली असतील अशा बेताने सकाळी कामाची यादि तयार करा.


कामातून ब्रेक घ्या :  स्वतःवर कायमस्वरुपी नियंत्रण ठेवणे अवघड असते. अनेकदा इच्छाशक्ती विसरुन आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण अयोग्य निर्णय घेतो. जर आपण कामाच्या दरम्यान थोडी विश्रांती आणि ब्रेक घेतला तर त्याचा फायदा होतो. बसल्याजागी दोन मिनिट डोळे मिटणे, तोंडात काही तरी टाकणे अर्थातच आरोग्यदायी, एक-दोन मिनिटांसाठी टीव्ही पाहणे आणि परत आपल्या जागेवर येऊन कामाला सुरुवात करण्यातून आपण ताजेतवाने होतो आणि इच्छाशक्तीचा वापर करुन चांगले काम करु शकतो.


आपण हे सगळं का करत आहोत?
आपल्या वागण्यात आपल्याला बदल का घडवून आणायचा आहे? आपल्याला काय साध्य करायचे आहे? आपण आपल्या चुकीच्या सवयी सोडल्या तर आपण काही गमावणार आहोत का? आपण सातत्याने या प्रश्नांच्या उत्तरांची स्वतःला आठवण करुन दिली तर आपण ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहण्याबाबत आपली इच्छाशक्ती निश्चितपणे वाढलेली असेल. हे सगळे माझ्या जगण्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी करायचे आहे याची जाणिव स्वतःला सातत्याने करुन द्या.


सौजन्य: संध्यानंद

16 June 2017

डोळसांनाही थक्क करणारी भावेश भाटिया यांची उत्तुंग झेप

भावेश भाटिया जन्माने अंध नव्हते, मोठे होईपर्यंत त्यांना अंधुकसं दिसत होतं. वयाच्या २३ व्या वर्षीच अपेक्षेपेक्षा लवकर दृष्टी गेली. तेव्हा ते एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत होते. कर्करोगग्रस्त आईच्या उपचारांसाठी पैसा साठवत होते. आईला गमावण्याची भीती असतानाच दृष्टी गमावणं त्यांच्यासाठी मोठा आघात होता. त्यांना नोकरीवरुनही काढून टाकण्यात आलं. या धक्क्यानं लवकरच त्यांच्या आईचं निधन झालं. पण, 'तुला जग नाही पाहता आलं तरी चालेल पण असं काही तरी कर ज्यामुळे जग तुझ्याकडे पाहिल'. आईच्या या शब्दांनी त्यांना हिम्मत दिली. लहानपणापासूनच त्यांना हातांनी वस्तू बनवण्याचा छंद होता. ते पतंग बनवायचे, मातीची खेळणी, छोट्या मूर्ती तयार करायचे. त्यांनी मेणबत्ती तयार करण्याच्या व्यवसायात हात घालण्याचं ठरवलं. १९९९ मध्ये मुंबईच्या राष्ट्रीय अंध प्रशिक्षण केंद्रातून त्यांनी याचे प्रशिक्षण घेतलं. ते मेणबत्त्या तयार करुन महाबळेश्वरच्या बाजारात मोटगाडीवर विक्री करायचे.


एक दिवस एक महिला त्यांच्या गाडीजवळ मेणबत्त्या खरेदी करण्यासाठी थांबली आणि अचानक काही तरी सकारात्मक घडत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांची सौम्य वागणूक आणि त्यांच्या स्मितहास्यानं त्या प्रभावित झाल्या. त्यांची मैत्री झाली आणि ते तासनतास गप्पा मारु लागले. त्यांचं नाव नीता होतं आणि भावेशने त्यांच्याशी लग्नाचा निश्चय करुन टाकला. लवकरच त्यांनी लग्न करुन महाबळेश्वरमध्ये एका छोट्याशा घरात आपल्या संसाराला सुरुवात केली.


पुढे बॅंकेने त्यांना १५ हजार रुपयांचं कर्ज मंजूर केलं आणि हेच त्यांच्या जिवनातलं महत्त्वपूर्ण वळण ठरलं. त्या पैशांच्या सहाय्यानं त्यांनी १५ किलो मेण, दोन साचे आणि पन्नास रुपयात एक हातगाडी विकत घेतली. त्यानंतर त्यांनी यातूनच कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय उभा केला. आज अनेक प्रतिष्ठीत कॉर्पोरेट कंपन्या त्यांच्या ग्राहक आहेत, तसच २०० कर्मचारी त्यांच्याकडे आता काम करत आहेत. आता सनराईज कँडल्स ९ हजार प्रकारच्या साध्या, सुगंधीत मेणबत्त्या बनवण्यासाठी २५ टन मेणाचा वापर करतात, रिलायन्स इंडस्ट्रिज, रनबक्षी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब यांसारखे काही प्रमुख उद्योग त्यांचे ग्राहक आहेत. भाटिया यांच्याकडे आता २०० लोक काम करत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सर्व २०० कर्मचारी अंध आहेत.


सौजन्य: संध्यानंद

09 June 2017

यशस्वी उद्योग सुरु करण्यासाठीच्या ७ टिप्स

प्रत्येकाच्या सूचनांवर विचार करण्यापेक्षा या टिप्सवर विचार करा.
एखादा नवा उद्योग सुरु करणे हे अर्थातच सोपे काम नाही. सुरुवातीला तुम्हाला ओळखणार्‍या प्रत्येकाकडून सल्ला दिला जाईल. प्रत्येक सूचना वा सल्ल्याचे विश्लेषण करणे अवघड असते. प्रत्येक सूचनेचा अतिविचार केल्याने त्याचा एकूण निर्णय प्रक्रियेवरही परिणाम होऊ शकतो. तो टाळण्यासाठी तुम्ही ठळक सूचनांचा वा प्रस्तावांचा विचार करणेच चांगले. तुम्ही उद्योग सुरु करण्यासाठी नक्की काय केले पाहिजे हे सांगणार्‍या काही टिप्स.

१) तपशीलवार योजना तयार करा : तुम्ही सुरु करत असलेला उद्योग कशाशी संबंधित आहे, त्याचे स्वरुप काय असेल याचा सखोल अभ्यास असणे आवश्यक आहे. तुम्हाला काय साध्य करावयाचे आहे, तुमच्या उद्योगाची उद्दिष्टे काय असतील, तुमचे संभाव्य ग्राहक कोण असतील, तुमची वाटचाल नफ्याकडे कशी होईल, या वाटचालीची कालमर्यादा काय असेल. या बाबी तुम्ही नियोजनात समाविष्ट केल्या पाहिजेत, संभाव्य अडचणी आणि अडथळ्यांचाही विचार त्यात असला पाहिजे.

२) तुम्हाला मदत करणार्‍या घटकांची यादी करा : नवा उद्योग सुरु करणे हे धाडसी पाऊल असते. कुटूंब, मित्र, सहकारी वा तुम्हाला ज्यांची मदत होऊ शकेल अशा व्यक्तींची यादी तयार करा. तुम्हाला आर्थिक मदत मिळू शकेल अशा परिसरातील खाजगी संघटनांची, मालमत्तांची निश्चिती करा. शैक्षणिक संस्थाही तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतील.

३) आवश्यक तो निधी मिळवा : तुमच्या उद्योगासाठी भांडवल मिळवणे हे आव्हानात्मक असते. बँकेकडून कर्ज मिळवणे अवघड असते. तुम्हाला जर बँकेकडून कर्ज मिळवायचे असेल तर तुम्ही अर्जाबरोबर तुमच्या उद्योगासाठीची योजना सादर केली पाहिजे. त्यात नफ्याची वा उद्योग किफायतशीरपणे चालण्याची शक्यता स्पष्ट केली पाहिजे. कर्जफेडीबाबत विश्वास वाटला तरच बँका कर्ज देतात. इतरही मार्गांनी कर्ज उभे करता येते. त्यासाठी ऑनलाईन मार्गांनीही गुंतवणूकदारांचा शोध घेतला पाहिजे.

४) नेटवर्क आवश्यक आहे :  कोणताही नवा उद्योग योग्य त्या नेटवर्क वा संपर्क जाळ्यावाचून यशस्वी होऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या संभाव्य ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे आणि त्यांना तुमचा उद्योग कोणते उत्पादन किंवा सेवा देऊ शकेल आणि ती इतर स्पर्धकांपासून कशी वेगळी असेल ते पटवून दिले पाहिजे. प्रदर्शने, व्यापारी मेळावे आणि सोशल मिडियाच्या माध्यमातून तुम्ही नवे व्यावसायिक संबंध प्रस्थापित करु शकता, त्यातून तुम्ही ग्राहकांबरोबरच तज्ज्ञांशीही संवाद साधू शकता. यातून काही व्यावसायिक भागीदारही उपलब्ध होऊ शकतात. तुमचे नेटवर्क ज्या प्रमाणात वाढेल त्या प्रमाणात तुमचा उद्योगही वाढेल.

५) योग्य व्यक्तिंबरोबर राहा : तुमच्या उद्योग क्षेत्राबद्द्ल ज्ञान असणार्‍यांच्या सहवासात तुम्ही राहिले पाहिजे, तुमच्या अडीअडचणीच्या वेळी हे लोक तुम्हाला सल्ला देऊ शकतात. तुम्ही तुमचे कर्मचारी नेमताना ते निष्ठावान असतील आणि तुमच्या उद्दिष्टांशी समरस असतील, याची खबरदारी घेतली पाहिजे.

६) पुढचा विचारही करा : एक उद्योजक म्हणून तुम्ही केवळ तुमच्या दैनंदिन कामात अडकून पडता कामा नये. तुम्ही केवळ भविष्याचाही विचार केला पाहिजे. बाजारपेठेतील ताज्या घडामोडींचे ज्ञान तुम्हाला असले पाहिजे. ग्राहकांच्या दृष्टीने बाजारपेठेत कोणते बदल होताहेत ते तुम्ही पडताळून पाहिले पाहिजे. त्याचा तुम्हाला निर्णय घेण्यासाठी उपयोग होईल.

७) काम आणि जगणे यातील समतोल सांभाळा : नव्या उद्योगासाठी खूप वेळ आणि उर्जा खर्चावी लागते. तुमचे काम आणि तुमचे जगणे यात तुम्हाला समतोल साधावा लागतो यासाठी तुम्ही वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. तुम्ही घरच्यांसाठीही पुरेसा वेळ दिला पाहिजे त्यामुळे तुम्ही तणावमुक्त राहू शकता, घरातील व्यक्तींचा तुमच्या प्रयत्नांमधील सहभाग तुमच्यासाठी नेहमीच प्रोत्साहनकारक ठरु शकतो.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites