LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

03 June 2011

"बॉर्न टू विन!" - डॉ. उदय निरगुडकर


बॉर्न२विन ही उद्योगप्रवणतेचे धडे देणारी, त्यासाठी प्रोत्साहित करणारी संस्था. संस्थेचा “लक्ष्यवेध” अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी “लक्ष्यसिध्दी” कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमात कर्तृत्वान व्यक्तींना आमंत्रित करून त्यांचा मार्गदर्शनाचा लाभही दिला जातो. बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी आतापर्यंत कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, एल अॅन्ड टीचे संचालक वाय.एम. देवस्थळी, पितांबरीचे सी.एम.डी. रवींद्र प्रभुदेसाई अशा काही मान्यवरांना या कार्यक्रमात आणले होते. २३ मे २०११ च्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात यावेळेस डॉ. उदय निरगुडकर हे प्रमुख पाहुणे होते. ते आपल्यला माहित आहेत ते बीपीओ- आयटी उद्योगातील तज्ज्ञ, निवडणूक तज्ज्ञ, लेखक म्हणून. लक्ष्यसिध्दी सोहळ्यातील त्यांचे व्याख्यान ऐकून त्यांना आणखी एक उपाधी देता येईल ती म्हणजे, तरूणांना हसत-खेळत मार्गदर्शन करणारे वक्ते!

लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचा लक्ष्यसिध्दी पुरस्कार देउन गौरव करण्यात आला

डॉ. उदय निरगुडकर सुरवात करताना म्हणाले, 'तुम्हाला प्रशिक्षण घ्यावे वाटले हेच खास आहे कारण करवतीला धार करत राहणे आवश्यक असते. आज जग झपाट्याने बदलत आहे, व्यावसायिक कौशल्ये कालबाह्य होत आहेत, स्पर्धा जागतिक आहे. औषधे विकत घेताना जसे आपण एक्सपायरीची तारीख बघून घेतो, तसे शिक्षणावरचीही एक्सपायरीची तारीख बघितली पाहिजे. काहीवेळा तर आपण जे शिकलो आहोत ते “अनलर्न” करावे लागेल. आजचा काळ हा स्ट्रॅटेजिक अॅडव्हान्समेंटचा आहे. याचा लाभ घ्यायला हवा. त्यासाठी नियोजन हवे, चलता है वृत्ती नको. खंबीर मन हवे, घेतलेला निर्णय अंमलात आणता यायला हवा, ज्ञानलालसा हवी!' अशा अनेक बाबी त्यांनी दृष्टांत देत सांगितल्या.


डॉल्फिन युनिसेस प्रायवेट लिमिटेडचे पुष्कर व हंसा मंत्री यांना त्यांच्या उल्लेखनिय कामगिरी बद्दल पुरस्कृत करण्यात आले.

स्वत:चे SWOT analysis म्हणजे इनट्रॉस्पेक्शन - आत्मपरिक्षण करा. आपली शक्तीस्थाने, कमजोरी काय आहेत दोन्ही जाणून घ्या, काय करायचे आहे त्याचा विचार करा. कंपनीला व्हिजन स्टेटमेंट असते, तसे प्रत्येक व्यक्तीलाही व्हिजन स्टेटमेंट हवे. कंपन्यांचा विकास होत असतो, त्या प्रगतीपथावर असतात, कारण त्यांच्याकडे जे प्रॉडक्ट असते, त्याची विक्री दरवर्षी वाढत असते. ही विक्री काहीवेळा अफाट वाढते कारण, त्या प्रॉडक्टमध्ये ते “व्हॅल्यू अॅडिशन” करतात म्हणजे त्याची मूल्यवृध्दी करतात. मूल्यवृध्दी याचा अर्थ किंमत वाढवणे नाही तर त्या प्रॉडक्टपासून ग्राहकांना मिळणार्‍या लाभात वाढ होणे. एक उदाहरण द्यायचे तर आधी साधे मोबाइल फोन होते. आता त्यावर इंटरनेट सर्फींग करता येते. केवढी मोठी सोय. प्रवासात किंवा कोठेही स्टॉक मार्केटची माहिती, रेल्वे आरक्षणाची माहिती मोबाइलवर इंटरनेटद्वारे मिळू शकते. लोक जुना मोबाइल टाकून नवा घेणार. निरगुडकर सांगतात प्रत्येकाचे आयुष्य हाही मूल्यवृध्दीचा प्रवास आहे व असायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत. बेंचमार्किंगची कसोटी लावायला हवी. बेंचमार्क म्हणजे एका स्टॅन्डर्ड प्रमाणकाबरोबर तुलना करणे. तसेच प्रत्येकाकडे व्हिजन हवी, त्याचसह त्यासाठी कृतीही करायला हवी. नाहीतर ठरवलेली ध्येये प्रत्यक्षात उतरणार नाहीत.

डॉ. उदय निरगुडकर उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना


कोणकोणत्या गोष्टी टाळाव्या याबाबत निरगुडकर म्हणाले, नाऊमेद करणार्‍या अनेक गोष्टी घडत असतात, पण त्याला बळी पडू नये. निसर्गाने प्रत्येकाला काही गुण दिलेले आहेत. नैराश्याची शिकार होऊ नका, विफलतेची भावना मनात नको. अयशस्वी झाल्यावर किंवा मागे पडल्यावर पक्षपात झाला - केला गेला अशी भावना मनात येऊ शकते. अन्याय झाला वाटू शकते. अशा भावनांना अजिबात थारा देऊ नका. उलट जिगर दाखवा. यशस्वी व्यक्तीला यश का मिळाले याचा अभ्यास करा. जगातील सर्वोत्तम गोष्टीतून काय घ्यायचे त्याला महत्व आहे. तसेच एकाकीपण हा घातक असतो. त्यापासून दूर राहा. आयुष्यात रीलॅक्स व्हायला शिका. तणावमुक्त असल्याशिवाय काही साध्य करता येणार नाही.   

डॉ. उदय निरगुडकरांचे व्याख्यान भलतेच रंगात आले होते.

देशाला महासत्ता बनवायचे असेल तर फक्त दोनच व्यक्ती ते काम करू शकतात – “तुम्ही आणि मी” हा मुद्दा त्यांनी आकर्षकपणे ठसवला.

भाषणातील मुद्दे उदाहरणे देत, विनोद पेरत, नाट्यपूर्ण रीतीने सांगत, त्यांनी श्रोत्यांची मने जिंकली. त्यांच्या भाषणानंतर उपस्थितांनी ऊभे राहून टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली.

डॉ. उदय निरगुडकर यांच्या "बॉर्न टु विन" या जबरदस्त प्रेरणादायी व्याख्यानाची सिडी आपणास हवी असल्यास कृपया संपर्क साधा: ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

सौजन्यः उदय कुलकर्णी  ९८६९६ ७२६९६


24 May 2011

फ्युचर पाठशाला जोश २०११

नमस्कार!

मित्रांनो आपणास कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे कि यंदाच्या उन्हाळी सुट्टी मध्ये बॉर्न टु विन तर्फे राबविण्यात येणारा फ्युचर पाठशाला - विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम तब्बल ठिकाणी राबविण्यात येत आहे (माटुंगा, बोरीवली, बोईसर, चेंबुर, वाशी, खारघर, व नाशिक)

फ्युचर पाठशालाचे हे चौथे वर्ष! आता पर्यंत फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रम १७०० पेक्षा जास्त शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यशस्वी पणे पुर्ण केला आहे. फ्युचर पाठशालाच्या फ्युचर स्टार्सना (म्हणजेच विद्यार्थ्यांना ) आता ओढ लागली आहे, ती म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०११' ची. मित्रांनो ... जोश एक असा उत्साहवर्धक कार्यक्रम जिथे फ्युचर पाठशालाचे फ्युचर स्टार्स एकत्र येतात व आपल्यातील कलागुणांचे अतिशय मंत्रमुग्ध करणार्‍या पध्दतीने प्रदर्शन करतात.


'फ्युचर पाठशाला जोश' या कार्यक्रमाची खासियत म्हणजे या कार्यक्रमामध्ये १५० ते २०० फ्युचर स्टार्स परफॉर्म करतात व प्रत्येक परफॉरमन्स हा अतिशय प्रेरणा देणारा असा असतो. प्रत्येक परफॉरमन्स मध्ये फ्युचर स्टार्सना काहीतरी संदेश द्यायचा असतो. जोश या कार्यक्रमाचा संपुर्ण अनुभव शब्दात व्यक्त करणे कठीण आहे. जोश २०१० हा कार्यक्रम फ्युचर स्टार्सनी इतक्या अप्रतिम पध्दतीने पार पाडला होता की कार्यक्रमाला उपस्थित प्रत्येक व्यक्तीसाठी तो एक अविस्मरणीय अनुभव ठरला होता. कार्यक्रमाच्या आयोजनाची संपुर्ण जबाबदारी ही फ्युचर स्टार्सनाच सुपुर्त करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्लॅनिंग, परफॉरमन्स, इवेंट मॅनेजमेंट व संपुर्ण कॉऑर्डीनेशन आमचे गुणवंत विद्यार्थ्यांद्वारेच केले गेले होते. विद्यार्थ्यांनी पार पाडलेला हा कार्यक्रम हा इतका प्रोफेशनल व जबरदस्त असु शकतो ह्यावर बर्‍याच पालकांचा विश्वास बसत नव्हता! 


जोश २०१० ची काही क्षणचित्रे...


 








यंदा देखिल बॉर्न टु विनचा जोश २०११ कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. फ्युचर पाठशालाचा हा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला दिनांक २९ मे २०११ रोजी मिळणार आहे. संध्याकाळी ४ ते ८ या कालावधी दरम्यान माटुंगा येथील कर्नाटक संघ हॉल येथे 'फ्युचर पाठशाला जोश २०११' पार पडणार आहे.

टिम बॉर्न टु विन तर्फे आपणा सर्वांना जोश २०११ ह्या कार्यक्रमाला उपस्थित रहाण्याचे आग्रहाचे आमंत्रण! आपली उपस्थिती आमच्यासाठी व आमच्या गुणी फ्युचर स्टार्स साठी खुप मोलाची आहे. जोश २०११ मध्ये आपण फ्युचर स्टार्सचे वेगवेगळ्या विषयांवर शिकवण देणारे परफॉरमन्स पहायला मिळतील ... जर  तुम्हाला 'जोश' म्हणजे काय असतो हे खर्‍या अर्थाने अनुभवायचा असेल, तर २९ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता, माटुंगा येथिल कर्नाटक हॉल येथे नक्की या!

तर विसरु नका...

- दिनाकः २९ मे २०११
- वेळः संध्याकाळी ठिक ४ वाजता
- स्थळ: कर्नाटक संघ हॉल, माटुंगा (प.)
- प्रवेश शुल्कः रु. ५०/- फक्त!

14 May 2011

'बॉर्न टू विन' - सातवा लक्ष्यसिध्दी सोहळा

नमस्कार!

मित्रांनो, लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची सातवी बॅच सध्या शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपली आहे व बॉर्न टू विनच्या टीमला व लक्ष्यवेधच्या सर्व आजी माजी प्रशिक्षणार्थ्यांना म्हणजेच लक्ष्यवेधींना... वेध लागले आहेत, ते सातव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे!

हो मित्रांनो... लक्ष्यसिध्दी सोहळा जिकडे सर्व लक्ष्यवेधचे प्रशिक्षणार्थी एकत्र येतात, एक मेकांना भेटतात, लक्ष्यवेधचे स्पिरीट पुन्हा एकदा अनुभवतात, लक्ष्यवेधच्या पदवीदान सोहळ्यादरम्यान लक्ष्यवेधच्या गुणवान प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करतात व महत्त्वाचे म्हणजे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांचे मौल्यवान विचार आपल्या बरोबर घेऊन जातात.

लक्ष्यसिध्दी सोहळा

आपणा सर्वांना कळवण्यास अतिशय आनंद होत आहे कि येत्या २१ मे रोजी, माटुंगा (पश्चिम) येथिल कर्नाटक संघ हॉल येथे, संध्याकाळी ६:३० ते ९:३० दरम्यान, सातवा लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आपण या कर्यक्रमास उपस्थित रहावे ही नम्र विनंती व तितकाच आग्रह! आपली उपस्थिती बॉर्न टू विनसाठी व लक्ष्यवेधच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांसाठी अतिशय मोलाची आहे.

यंदाचा लक्ष्यसिध्दी सोहळा देखिल नेहमी प्रमाणे आपल्या उदंड प्रतिसादात पार पडेल यात काही शंका नाही.
सातव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डॉ. उदय निरगुडकर. डॉ. उदय निरगुडकर आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत 'बॉर्न टू विन' या विषयावरिल त्यांच्या व्याख्यानाद्वारे!

 डॉ. उदय निरगुडकर यांच्याबद्दल थोडेसे :-
  • पुणे विद्यापिठातून एम. बी ए. आणि त्यानंतर त्याच विद्यापिठातून व्यवस्थापन क्षेत्रातील डॉक्टरेट.
  • मराठी तरुणांनी कॉल सेंटरमध्ये प्रवेश करावा याकरिता शेकडो मार्गदर्शन कार्यक्रम ग्रामिण भागात केले.
  • गेली २० वर्ष माहिती तंत्रज्ञानशिक्षण आणि पायाभूत सोयीसुविधा या क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत.
  • ग्रामीण क्षेत्रामध्ये ५०० हुन अधिक संगणक केंद्राची स्थापन करण्यात पुढाकार.
  • सुमारे ४० पेक्षा अधिक देशांचा प्रवास व तेथे उद्योग यशस्वी करण्याचा अनुभव.
  • जागतीकिकरणातील बदलत्या भारताचे अंतरंग हा अभ्यासाचा विषय.
  • अनेक शिक्षणसंस्था व सामाजिक उपक्रमांशी अत्यंत जवळचा संबंध.
  • चिंतनशील लेखक, उत्तम वक्ता, व्यवस्थापनतज्ञ, माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वाची बारकाईने जाण, नाटक साहित्य अशा चौफेर अंगानी फुलेल व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. उदय निरगुडकर.
  • त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
डॉ. उदय निरगुडकर त्यांच्या 'बॉर्न टू विन' या मार्गदर्शनपर व्याख्यानाद्वारे, आपणास आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात विजयी होण्यासाठी काही महत्त्वाच्या विषयांबद्दल बोलणार आहेत. त्यामध्ये नेत्तृत्व गुण विकसित करणे, उत्कृष्टतेच्या मार्गावर प्रवास करणे, कार्यक्षम संघ बांधणी करणे यांचा सामावेश असेल.
डॉ. उदय निरगुडकर यांच्या सारख्या अष्टपैलु व्यक्तीचे ज्वलंत विचार ऐकण्यासाठी व अनुभवण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहाल यात काही शंका नाहीच, परंतु आपल्या मित्रपरिवाराला देखिल नक्कीच या संधीचा लाभ घेण्यासाठी नक्कीच आमंत्रित करा!

तर, मित्रांनो भेटुया २१ मे रोजी...

लक्ष्यसिध्दी सोहळा

विषयः बॉर्न टू विन
दिनांकः २१ मे २०११
स्थळः कर्नाटक संघ हॉल, ऑफ टी. एच. कररीया मार्ग, माटुंगा (प.)
वेळः संध्याकाळी ठिक ६:३० वाजता
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/८, ७६६६४२६६५४,९६१९४६५६८९




13 April 2011

पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा




जन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.


 
  
 
"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;
एक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो!
Give me some sunshine, give me some rain!
Give me another chance wanna grow up once again!"

नुकत्याच गाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का? बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे? विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत? त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे? विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल? ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे? खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार?



हे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड्-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.


आजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने तीन वर्षापुर्वीच फ्युचर पाठशाला ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे  व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत मुंबईभरातुन १२०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा मुंबईमध्ये दादर, बोरीवली, विरार, बोईसर, चेंबुर, वाशी व खारघर येथे व नाशिकमध्येसुध्दा  राबवण्यात येणार आहे.

फ्युचर पाठशालाची अधिक माहीती देणारे एक खास सेमिनार दिनांक २१, २२, २४, २५, २६ व २७ एप्रिल व ३ मे रोजी अनुक्रमे चेंबुर, खारघर, बोरीवली, बोईसर, विरार, वाशी व नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहेत. बॉर्न टू विनचे संस्थापक व संचालक अतुल राजोळी स्वतः या सेमिनारचे प्रमुख वक्ते असुन ते युवा पिढीच्या समोर असणार्‍या आव्हानांबद्दल व फ्युचर पाठशालाबद्दल सविस्तरपणे माहीती देणार आहेत. ह्या सेमिनारला विद्यार्थी व पालकांना एकत्रितपणे मोफत प्रवेश देण्यात येईल. अधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654, 22939375/6/7/8, http://www.born2win.in/

01 April 2011

जगण्यातील चांगुलपणावरचा विश्वास “सुदृढ” करणारी मुलाखत!

“लोक सतत माझ्यामागे ऊभे राहिले. भांडवल कमी पडायचे तेव्हा पैसे मिळत गेले, जागेसाठी लोकांनी मदत केली. व्यायामाचा प्रसार हाच माझा ध्यास होता, माझा हेतू चांगला होता, मी स्वत: माझ्या स्पर्धकानांही मदत करतो, त्यातून मला आनंद मिळतो. मला जे मिळत गेले, ते मी इतरांना देतो, ते माझे कर्तव्य समजतो”, तळवलकर जिमचे संस्थापक मधुकर तळवलकर यांचे हे उद्गार. “बॉर्न२विन” संस्थेचा लक्ष्यसिध्दी सोहळा २८/२/११ला झोकात साजरा झाला त्याप्रसंगी ते बोलत होते. मागील वर्षी तळवलकर जिमने शेअरबाजारात आपले शेअर विकायला काढले, १०० कोटी रुपयांचा हा छोटा आयपीओ. पण भरणा झाला ४,००० कोटी रुपयांचा आणि दक्षिण-उत्तर भारतातूनही लोकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकांचा हा विश्वास बघून मधुकर सरांचे मन इतके हेलावले, ते भावनाविवश झाले व एका खोलीत जाऊन त्यांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. तळवलकर हा असा मोठा ब्रॅन्ड झाला, त्याची सुरवात झाली, १९६२पासून. हा प्रवास उलगडत गेला बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी मधुकर सरांच्या घेतलेल्या मुलाखतीतून. सरांच्या वडिलांच्या व्यायाम शाळा होत्या. सरांनी जिम काढायचे ठरवले तेव्हा तळवलकर जिम या वेगळ्या नावाने त्या सुरू केल्या. त्याकाळीसुध्दा त्यांच्याकडे धर्मेंद्र, माला सिन्हा असे कलाकार सभासद होतेच, पण दारासिंग हे नावाजलेले कुस्तीवीरही त्यांचे सभासद होते. एक जिम सुरू केल्यावर वडिल सरांना म्हणाले, तुझ्या धाकट्या तीन भावंडांसाठी आणखी जिम सुरू कर. सर स्वत: टेक्सटाईल इंजिनिअर. त्यांनी खटाऊ मिलमध्ये काही काळ नोकरी केली. जिम व्यवसायात त्यांच्या ज्ञानाचा त्यांना लाभ मिळाला. विशेषत: जिमसाठी लागणार्‍या उपकरणांची निर्मीती करताना तर ते ज्ञान फारच कामात आले. आज तळवलकरांची अंगदला उपकरण निर्मीतीची ६००० फुटांची फॅक्टरी आहे.

अनेक वर्षांपूर्वी ते जिमसाठी कर्ज मागायला बॅंकेत गेले तेव्हा मॅनेजर म्हणाले, जिम ही इंडस्ट्री नाही किंवा तुम्ही शेतकरीही नाही आहात. तुम्हाला कर्ज मिळणार नाही. आज मात्र यालाच “फिटनेस इंडस्ट्री” म्हणतात व या उद्योगाचे तळवलकर हे प्रणेते- पायोनिअर. देशात अनेक ठिकाणी त्यांच्या जिम आहेत. त्यात अमृतसर इथे त्यांची जिम ही मला विशेष बाब वाटते. पंजाबी हे लोक धट्टेकट्टे- सुदृढ, तर त्यांच्यासमोर मराठी माणूस दुबळा असा समज गैर आहे, हे दाखवणारी ही बाब. एक मराठी माणूस पंजाबी लोकांना व्यायामचे धडे देतो ही कल्पनाच विशेष वाटते!

शेवटी सरांनी सुत्र सांगितले, कुटुंबावर प्रेम करा, व्यायाम करा व सतत देत राहा, बी अ गिव्हर. चांगुलपणा करा, तुम्हाला त्याचा लाभ मिळेल, असे चांगुलपणावरचा विश्वास सुदृढ करणारी ही मुलाखत.

त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र व चषक देण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते व त्यांनी मुलाखतीला मनमोकळी दाद दिली.


विशेष आभारः श्री. उदय कुलकर्णी

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites