LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 February 2013

प्रगतीच्या मार्गावरील न संपणारा प्रवास

लक्ष्यवेध हा बॉर्न२विन संस्थेचा अत्यंत महत्वाचा प्रशिक्षण कार्यक्रम. तो पूर्ण केलेल्या आपल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यासाठी संस्था लक्ष्यसिध्दी सोहळा आयोजित करते. याप्रसंगी उद्योगक्षेत्रातील मान्यवर व्यक्तीस बोलावून, त्यांच्या मुलाखतीतून नव-उद्योजकांना प्रेरित करते, शिवाय त्यातून त्या उद्योगक्षेत्राची खूप माहितीही मिळते.

७ फ्रेबुवारी १३ला झालेल्या १४ व्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात ह्यावेळेस प्रमुख पाहुणे होते टुरिझम क्षेत्रातील महर्षी, केसरी टूर्सचे संस्थापक केसरी पाटील. प्रथम त्यांच्या हस्ते लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, ट्रॉफीज प्रदान करण्यात आल्या. नंतर बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी केसरी पाटील यांची मुलाखत घेतली. केसरीभाऊंचे वय ७८ आणि त्यांनी अक्षरश: शुन्यातून सुरवात करून इतके उत्तुंग यश मिळवले. आपल्याला वाटेल ते स्वत:च्या जुन्या आठवणीत फक्त रमून जातील आणि त्यांचे विचार असतील, मी सगळे जग पाहिलेले आहे (शब्दश:, कारण अगदी अंटार्क्टीकालाही ते जाऊन आलेले आहेत, तेही वयाच्या पंचाहत्तरीत!) आणि ७८ पावसाळे पाहिलेले आहेत, मी अधिकारवाणीने सांगतो ते तेवढे ऐका. खरोखर त्यांचा तितका अधिकार नक्कीच आहे. पण त्यांनी सुरवातीलाच स्पष्ट केले, त्यांचे तत्व आहे, ते कधीही मी इतके पावसाळे पाहिले आहेत असे म्हणत नाहीत. ते म्हणतात, असं म्हणणं म्हणजे नवीन गोष्टी शिकणे बंद करणे. माणूस आयुष्यभराचा विद्यार्थी असतो, त्याने आपल्या नातवंडांकडूनही शिकायला हवे. केसरीभाऊंचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कडक शिस्त. काही गोष्टींबाबत ते अतिशय काटेकोर आहेत. ते दहा वर्षे बोर्डी येथील विद्याभवन शाळेत शिक्षक होते, त्याचा हा परिणाम किंवा आणखी मागे जायचे तर विद्यार्थीदशेत झालेले राष्ट्रसेवा दलाचे संस्कार. मथाणे या आडवळणाच्या खेडेगावात त्यांचे बालपण गेले. त्यांच्या वडिलांत नेतृत्वगुण होते. अनेकवेळा वडिलांना प्रवास करावा लागे, त्यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकांच्या पुस्तिका घरी असत. या पुस्तिका नंतर आपल्या आयुष्याच्या इतक्या अविभाज्य भाग बनणार आहेत याची केसरीभाऊंना मात्र कल्पनाही नसावी! लहानपणाच्या संस्कारांबाबत वाचनप्रियता, शिस्त, कष्ट या ठळक आठवणार्‍या गोष्टी. तसेच वाचस्पती प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वाचाही प्रभाव त्यांच्यावर झाला. भूगोल व इतिहास हे केसरीभाऊंचे मित्र झाले ते केसरी टूर्स सुरू करण्याच्या आधीपासूनच. आणि हा भूगोल व इतिहासही केवळ आपल्या देशाचा नाही तर संपूर्ण जगाचा. हे दोन्ही त्यांना अजूनही मुखोदगत आहेत. पण आपण केसरी टूर्सचा इतिहास बघू! 


केसरीभाऊंचे मोठे बंधू राजाभाऊ पाटील यांनी राजाराणी ट्रॅव्हल्स कंपनी सुरू केली होती. आधी केवळ सुट्टीत केसरीभाऊं त्यांना मदत करत, सहलींबरोबर जात. ६७ नंतर मात्र केसरीभाऊं नोकरी सोडली आणि ते पूर्णवेळासाठी राजाराणी ट्रॅव्हल्सचे काम करू लागले. त्यावेळेस नोकरी सोडणे हे आव्हान होते, पण त्यांनी ते स्वीकारले. राजाभाऊंबरोबर त्यांनी वीस वर्षे काम केले. सहल संचालक म्हणून काम करताना जबाबदारी घ्या, सबबी सांगू नका आणि पर्यटक काय सांगत आहे ते केवळ कानाने ऐकू नका, तर त्याचे मनन करा, असे ते सांगतात. राजाराणी ट्रॅव्हल्सच्या काश्मीरच्या सहली प्रसिध्द होत्या. केसरीभाऊ हमखास या सहलींना जात. प्रेक्षणीय स्थळे दाखवण्याबरोबरच पर्यटकांना आपल्या जोशपूर्ण शैलीत काश्मीरचा इतिहास सांगत. त्याबाबत ते पर्यटकांमध्ये मशहूर होते. शिवाय ते पर्यटकांना सांभाळून घेत, त्यांच्याबरोबर भाऊंचे सूर जुळत. भाऊ म्हणतात, मराठी माणूस मुखदुर्बळ. त्याला बोलके करावे लागते. सहल म्हणजे मोठा ग्रुप असतो. प्रत्येकजण धीटपणे चारचौघात बोलू शकेल असे नाही. अशी माणसे मग मागे राहिली तर ती इतरांइतकी सहल एंजॉय करू शकणार नाहीत. केसरीभाऊ अशा लोकांबरोबर आपुलकीने वागत, त्यांचा संकोच दूर करत. हे पर्यटकही मग तितक्याच उत्साहाने सहलीत रममाण होत.  


अपरिहार्यपणे त्यांचे बंधूबरोबर मतभेद झाले. विचार करून त्यांनी बाहेर पडून स्वत:ची कंपनी सुरू करण्याचे ठरवले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी असा निर्णय घेणे धाडसाचे होते. पैशाचे पाठबळ नव्हते, पण लोकांचा भक्कम पाठिंबा होता. विचार सुधारकी होते, पुढे जाण्याची प्रवृत्ती होती. टूरिझम हा सेवाक्षेत्रातील व्यवसाय. १९८४ साली आर्थिक सुधारणांचे वारे वाहणे अजून सुरू झालेले नव्हते. या क्षेत्रासाठी बॅंका कर्ज देत नसत. केसरीभाऊंना आपल्या पत्नीचे – सुनिताबाईंचे – दागिने गहाण टाकून भांडवल उभे करावे लागले. आज मात्र बॅंकाच कर्ज घ्या म्हणून धोशा पुरवतात ती गोष्ट वेगळी! १९८४ ते १९९७ या काळात केसरीभाऊ आणि त्यांचे कुटुंबिय खूप राबले, जीव तोडून मेहनत केली. त्यावेळेस रेल्वेचे ऑनलाईन आरक्षण वगैरे सुविधा नव्हत्या. चर्चगेट स्टेशनवर जाऊन ते झोपत, म्हणजे सकाळी खिडकी उघडल्याबरोबर नंबर लावता येईल. वर्क लाईक अ कूली अॅन्ड लीव्ह लाईक अ प्रीन्स हा त्यांचा खाक्या. शैलेश व हिमांशू ही मुले व वीणा व झेलम ह्या मुली. त्याचबरोबर सुना व जावई या तरूण पिढीच्या साथीने मग केसरी टूर्सचा रथ भरधाव निघाला. त्याने मागे वळून पाहिलेच नाही. सतत यशाचे नवे नवे टप्पे पार करत हा या क्षेत्रातील एक अत्यंत नावाजलेला ब्रॅन्ड झाला. एक सहल नेली, बस्स, पुन्हा दुसरी सहल न्यायची, तेव्हाच काही विचार करायचा असा तोकडा विचार केसरीभाऊं आणि त्यांच्या कुटुंबियांनी कधीच केला नाही. नावीन्यपूर्ण कल्पना आणल्या व त्या यशस्वीपणे राबवल्या. माय फेअर लेडी ही टूर बघा. अनेक स्त्रियांना परदेशात सहलीला जायचे असते, पैसे असतात, पण बरोबर येण्यास कुटुंबातील कोणी व्यक्ती नसते. अशा स्त्रियांसाठी ही टूर किती चांगली. फक्त स्त्रियाच या सहलीत असतात. माय फेअर लेडी ही म्हणूनच एकट्या जावे लागणार्‍या स्त्रियांसाठी सहलीची सोय करणारी संकल्पना राहात नाही तर त्यांना मोकळीक देणारी, त्यांना आत्मविश्वास देणारी, स्वत:साठी वेळ काढायला शिकवणारी सहल बनते. आपल्या गौरी शिंदेंचा इंग्लिशविंग्लिश चित्रपट २०१२ मध्ये आला, त्यातही स्त्रियांनी संसारात राहूनही सन्मानाने जगावे, स्वत:साठी वेळ काढावा, अशी संकल्पना आहे. फरक इतकाच माय फेअर लेडी टूर सुरू होऊन दहा वर्षे झाली! माय फेअर लेडीत अपवाद म्हणून एक पुरूष पर्यटक असतो. तोही बघा कसा नेमका निवडलेला आहे. या टूरवर स्त्रियांच्या बरोबर असतात, होम मिनिस्टरमुळे घरोघरी पोचलेले सर्व स्त्रियांचे लाडके भावजी अर्थात आदेश बांदेकर

याशिवाय हनिमून कपल्स, विद्यार्थ्यांसाठी नासाच्या टूर्स, ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सहली, धार्मिक स्थळांच्या सहली अशा विविध प्रकारच्या त्यांच्या सहली आहेत. त्या सर्वच लोकप्रिय आहेत. फक्त मराठी लोकच केसरीचे पर्यटक नसतात तर सर्व भाषिक असतात. सर्वांमध्ये ते लोकप्रिय आहेत. कॉर्पोरेट टूर्स हा त्यांचा विभागही जोरात कार्यरत आहे. पर्यटक देवो भव हा मंत्र केसरीभाऊंनी आपल्या टीमला दिलेला आहे. माझे मायबाप पर्यटक हो असा ते उल्लेख करतात. ग्राहकसेवा याला ते खूप महत्व देतात. तसेच आपल्या कर्मचार्‍यांना ते आपल्या उद्योगातील भागीदार मानतात, त्यांना सहकारी म्हणतात. कंपनीत आज १००० कर्मचारी असून ५०० टूर मॅनेजर्स आहेत.

स्पर्धेबाबत ते म्हणतात, स्पर्धा हवीच, त्याला तोंड देता आले पाहिजे. तथापि स्पर्धा ही सकारात्मक विचारसरणीची बैठक असलेली हवी. स्पर्धेमुळे विचलीत होऊ नये व आपल्या ध्येयावरचे लक्ष ढळू देऊ नये. तसेच व्यवसायायबाबत विस्तार करण्याचे धोरण हवे, पुढे जात राहणे हे ध्येय आहे असे ते म्हणतात.

केसरीभाऊंना सामाजिक भान आहे. एक मुद्दा त्यांनी लक्षात आणून दिला, मराठी म्हणून आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान हवा, पण इंग्लीश भाषेवरही प्रभुत्व अगदी हवेच कारण ती आता ग्लोबल भाषा झाली आहे. तसेच बिल गेट्सच्या एका वचनाची त्यांनी आठवण करून दिली, तुम्ही गरीब म्हणून जन्मला तर तो तुमचा दोष नाही, पण गरीब म्हणूनच मराल तर तो तुमचा दोष आहे. अर्थात माणसाने सतत प्रयत्न करत राहून प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे, हे त्यांचे सांगणे आहे. केसरी पाटील यांची ही मुलाखत ऐकताना श्रोतृवर्ग उत्साहात दाद देत होता. ते जे बोलत होते मनापासून.

याच कार्यक्रमात अतुल राजोळींनी लिहिलेल्या माझा मोटीव्हेटर मित्र या पुस्तकावर आधारित एका पर्मनंट कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. या कॅलेंडरमध्ये रोज एक सुविचार वाचायला मिळेल.


बॉर्न२विनने ध्येयनिश्चिती ते ध्येयपूर्ती हे त्रैमासिक सुरू केले असून त्याच्या पहिल्या अंकांचे प्रकाशन केसरीभाऊंच्या हस्ते करण्यात आले. हा अंक अतिशय देखणा झाल्याचे मत अनेकांनी बघताक्षणीच जाहीर केले!
 

बीग आयडीयाचे जान्हवी राऊळ व मंगेश राऊळ यांनी केसरी टूर्सचा संदर्भ देत, जगभरातील महत्वाची स्थळे दाखवणारा एक भव्य व देखणा बॅकड्रॉप बनवला होता, त्याचे सर्वांनी कौतूक केलेच, केसरीभाऊंनी स्वत: त्यांना मंचावर बोलावून त्यांना दाद दिली.
 

15 February 2013

ग्रेट आयडियाज : द्रष्टा एन. आर. नारायण मूर्ती

ग्रेट आयडियाज : द्रष्टा एन. आर. नारायण मूर्ती
अनघा दिघे, लोकसत्ता, सोमवार, २८ जानेवारी २०१३

'आनंददायी घडामोडींनी भरगच्च, पारितोषिकांचा आणि हर्षोल्हासित असा हा एकंदरीत २५ वर्षांचा प्रवास होता..' सुविख्यात इन्फोसिस टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मूर्ती यांनी सेवानिवृत्तीच्या भाषणाच्या वेळी काढलेले हे उद्गार आहेत. इन्फोसिस या माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रांतील जगविख्यात भारतीय कंपनीचे नागवर रामराव (एन. आर) नारायण मूर्ती हे सहसंस्थापक. ध्येयवादाच्या परिपूर्णतेच्या त्यांच्या या उद्गारांमागे असीम आंतरिक तृप्ती झळकते.
१९८१ मध्ये सिलिकॉन व्हॅलीच्या धर्तीची सुरुवात त्यांनी भारतामध्ये केली. आपापल्या सुविद्य पत्नीकडून १० हजार रुपये उसने घेऊन सात व्यावसायिकांनी एकत्रितपणे सुरू केलेली ही नवी कंपनी होती. व्यावसायिक जगतामध्ये इन्फोसिसने अनेक नवे पायंडे रोवले, अनेक रेकॉर्डस् केले. कॉर्पोरेट प्रशासन आणि पारदर्शकता यांच्या निकषांवर इन्फोसिस कंपनी योग्य कॉर्पोरेट व्यवहाराची आणि स्वच्छ कारभाराचे एक उदाहरण बनले आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रातील संधी हेरणे हे त्यांचे पहिले श्रेय. कसलेल्या जव्हे
र्‍याप्रमाणे नेमकी माणसे हेरणे हे दुसरे श्रेय. त्यापेक्षाही अर्थपूर्ण, सयुक्तिकता म्हणजे, ही बांधलेली मोट टिकवणे. सर्वाना एकत्रित बांधून ठेवणे.. सर्व संस्थापक हे मध्यमवर्गीय पाश्र्वभूमीतून आलेले होते. केवळ आपली बुद्धिमत्ता आणि परिश्रम यांच्या बळावर त्यांनी इन्फोसिसचे स्वप्न साकार केले. क्षितिजापल्याड जाणार्‍या भारतीय बिझनेसच्या आलेखाचे हे विद्यमान शतकातील अनुकरणीय मॉडेल ठरले आहे.
जाणून घेऊ या, या बिझनेस गुरूचे तसेच जीवन-गुरूचे मौलिक विचार - 
'इन्फोसिसच्या सुरुवातीच्या काळात साधी फोन लाइन मिळवणे किंवा पहिला संगणक मिळवणे हादेखील एक अवघड, प्रदीर्घ असा प्रवास झाला असताना.. सुरुवातीपासून आम्हाला हे फार स्पष्ट होते की, इन्फोसिसचे कार्य हे भारतातर्फे या क्षेत्रामध्ये मौलिक योगदान करण्याचे आहे. १९९० च्या दरम्यान आमची स्थिती डळमळीत झाली होती. तेव्हा इतर देशांमधून आमची कंपनी विकत घेण्याच्या ऑफर्स येत होत्या. आणि आम्ही सहसंस्थापक चर्चा करीत होतो. चार-पाच तासांच्या प्रदीर्घ च
र्चेनंतर एक प्रकारचा विषाद आणि नराश्य यांनी मन भरून गेले. तत्क्षणी निर्णय घेऊन मी माझ्या सहकार्‍यांना सांगितले की, 'काळजी करू नका, मीच ही कंपनी विकत घेतो. मला हे ठाऊक आहे की, या देशात हे सगळं अवघड आहे परंतु पुढे जाऊन आपल्याला नक्कीच प्रकाश सापडेल.' काही मिनिटांतच सर्व जण मला म्हणाले, ' आम्ही तुमच्या बरोबर आहोत. यानंतर कधीही आपण ही कंपनी विकण्याचा, थकण्याचा, प्रयत्न सोडण्याचा किंवा तत्सम दुसरा कुठलाही विचार करायचाच नाही.. आपली घोडदौड पुन्हा एकवार नव्याने सुरू करूया..'
'.. अशक्य वाटते तेच शक्य करणे म्हणजेच नेतृत्व होय. प्रतीत होणा
र्‍या वास्तवाच्या चित्राचे पुनर्आकलन ही लायक नेतृत्वाची खुबी असते. खराब रस्ते, प्रदूषण, वाईट ट्रॅफिक इत्यादी गोष्टी या भारताचे वास्तव असतीलही.. आपण जसे घडवतो, तसे वास्तव घडते. बदल हा आपल्या हातात असतो. तुम्ही लोकांना केवळ आत्मविश्वास दिलात तर ते अचाट गोष्टी साध्य करू शकतात. 
तत्पर मनोभूमिका असली की, सुसंधीदेखील पुरेपूर माप पदरात टाकते. आमच्या टिकाव धरण्याच्या ठाम निश्चयानंतर लगेचच उदारीकरणाचा ठराव आला आणि त्याचा पुरेपूर फायदा इन्फोसिसला झाला. 
वैयक्तिक सोयी-सुविधांसाठी कॉर्पोरेट संसाधनांचा वापर कधीही न करणे, प्रत्येक व्यावसायिकाचा उचित आदर ठेवणे इत्यादी कठोर कॉर्पोरेट प्रशासकीय तत्त्वांच्या आधारे, अत्यंत व्यावसायिक दृष्टी ठेवून जगातील इतर कुठल्याही कॉर्पोरेटसारखी, आम्ही ही कंपनी चालवली.
मी बुद्धीने भांडवलशहा आणि हृदयाने साम्यवादी आहे. बिझनेस व्यवस्थापनामध्ये आदर कमावणे हे नफा वाढवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे असते. परिश्रमांच्या राजयोगावर मी कायमच जास्त भर देईन. मी कायमच सांगत आलो की, शंका असेल त्या वेळी नेहमीच ती व्यक्त करा. विचारक्षमता आणि मनोभूमिका किंवा धारणा (mind and mindset) यांच्यातील फरक हा प्रगतीचे मानांकन निर्देशित करीत असतो.
ग्रामीण लोकांची प्रगती साध्य करून त्यांना चांगले जीवनमान, योग्य वेतन, आरोग्य, आहार आणि शिक्षण मिळवून देण्यासाठी आपल्याला कमी स्तरावरील तंत्रज्ञानापासून उत्पादनाची सुरुवात करून नंतर चीनसारखेच मोठय़ा प्रमाणावर हायटेक (उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून) उत्पादन करावे लागेल, असे मला वाटते. सहृदयता बाळगून भांडवलशाही तत्त्वांचे उपयोजन करणारा मी एक व्यापारी आहे.
आर्थिक उलाढाली करताना, आहे ती स्थिती धरून ठेवण्यावर मी विश्वास ठेवत असलो तरी सामाजिक बाबतीत मोकळ्या मनोवृत्तीचा मी स्वीकार करतो. एवढे असूनही साम्यवादाच्या, समाजवादाच्या गुंगीत राहणे मला मान्य नाही. लोकांसाठी एक आकर्षक पर्याय म्हणून भांडवलशाही जर उपलब्ध करून द्यायची असेल तर दारिद्रय़ात पिचत पडलेल्यांबद्दल कमालीची सहृदयता-करुणा बाळगणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचा अर्थ असा नाही की, लायकी नसलेल्यांना नोकर्‍या द्या किंवा कमी नफा काढा परंतु, जिथे, जेव्हा आणि जसे शक्य आहे, तसे करुणामय आर्थिक -सामाजिक वर्तन ठेवणे हे गरजेचे आहे. पशांचे खरे सामर्थ्य हे देऊ करण्यातले सामर्थ्य असते. 
कामे करताना कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये संतुलन साधणे आवश्यक आहे. यासाठी एक मार्गदर्शक कार्यसूत्री मी देतो- 
* सकाळी उठा. चांगली न्याहारी घ्या आणि कामाला जा.
* आठ ते नऊ तास चलाखीने, हुशारीने, परंतु जीव तोडून मेहनत करा. 
* घरी जा.
* कॉमिक्स वाचा. मजेशीर चित्रपट पाहा. चिखलात-मातीत काम करा किंवा मुलांशी खेळा.
* पुन्हा योग्य आहार घ्या आणि पुरेशी झोप घ्या. 
मी याला पुन
निर्माण असे म्हणतो. वरीलपकी १, ३, ४ आणि ५ या पायर्‍यांच्या काटेकोर पालनामुळे पायरी क्रमांक २ ही सार्थरीत्या साध्य होते. नियमित तास कामे करणे आणि दररोज पुननिर्माण करणे या सोप्या संकल्पना आहेत. आपल्यातील काही जणांना त्या फार कठीण वाटतील कारण, त्यासाठी व्यक्तिगत बदल करण्याची त्यांना गरज आहे. या पर्यायांची निवड करण्याचे सामथ्र्य आपल्यापाशी असल्यामुळे हे करणे शक्य आहे. आपल्या अनुपस्थितीत बरेच काही 'घडणारे' हातातून निसटण्याची भीती कर्मचाऱ्यांना असते. तुम्ही झोपी गेलेले असताना काही ना काही घडेलच, परंतु, त्याच्याशी जुळवून घेण्याची आणि घडलेल्याच्या तालात पुन्हा कसरत करण्याची कृती अनुसरावी लागते. त्यासाठी लागणारी पुरेशी ऊर्जा ही जागे झाल्यानंतर तुमच्यापाशी असते.  
कंपनीची शाश्वत मालमत्ता ही रोज संध्याकाळी कंपनीच्या दरवाजातून बाहेर पडते. ती सर्वच्या सर्व संपत्ती पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी परत येत आहे ना, याची आपण पुरेशी खातरजमा केली पाहिजे.
परमेश्वरावर आमची प्रगाढ श्रद्धा आहे. इतरांनी मात्र कामकाजाचे सर्व तपशील (टेबलवर) नीटपणे सादर करावेत. हे कायम ध्यानात असू द्या की, अत्यंत स्वच्छ, पारदर्शी सत्-असत्विवेक ही जगातील अत्यंत मऊशार उशी आहे. कामगिरी ही ओळख मिळवून देते. ओळख आदर मिळवून देते. आदर आणखी जास्त बळकटी तसेच सामथ्र्य देतो, सामथ्र्यवान कारकिर्दीच्या प्रत्येक क्षणामध्ये माणुसकीची चाड आणि दैवी अस्तित्वाचे भान हे संस्थेला नावलौकिक, प्रतिष्ठा मिळवून देते. 
सरतेशेवटी सर्व काही वैयक्तिक मूल्ये आणि नीतिमत्तेपाशी येऊन ठेपते. दीर्घ कालखंडाचा विचार करता, उत्तम कार्य आणि कार्यवाही करणाऱ्यांची फौज निर्माण करण्यासाठी आपण कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांनी सजग राहिले पाहिजे. आजच्या तरुण पिढीने पशाला प्राधान्य देऊन सामथ्र्यवान वाटून घेण्यापेक्षा सौजन्य, प्रामाणिकपणा आणि आदर ही अक्षय संपत्ती जवळ बाळगली पाहिजे.'नारायण मूर्ती यांच्या व्यवसायविषयक अभिनव दृष्टीचा आजच्या तरुण पिढीने कित्ता गिरवला पाहिजे.

30 January 2013

चौदावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'न संपणारा प्रवास...'

नमस्कार!
मित्रांनो, आपल्याला हे कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की दिनांक १९ जानेवारी २०१३ रोजी बॉर्न टू विनची स्थापना होऊन ५ वर्षे पुर्ण झाली. या पाच वर्षामध्ये बॉर्न टू विनने केलेल्या प्रगतीचा आलेख हा सतत उंचावत गेला. 'सामान्य माणसांना, असामान्य यश मिळवण्यास मदत करणे' या एकमेव उद्देशामुळे बॉर्न टू विनने हा केलेला आतापर्यंतचा प्रवास...
मित्रांनो, लक्ष्यवेधची चौदावी बॅच खुप छान पार पडली, आणि आता वेळ आली आहे या बॅचच्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्याची, त्यांच्या जबरदस्त कमगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहन देण्याची... म्हणजेच चौदाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याची...!
 
मित्रांनो, चौदाव्या लक्ष्यसिध्दी सोहळा, हा आता पर्यंतचा सर्वात मोठा लक्ष्यसिध्दी सोहळा असणार आहे! त्याची कारणे म्हणजे.
१. बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांची संख्या आता एवढी वाढली आहे की ४०० - ५०० लोकांच्या कॅपेसाटीचा छोटा हॉल आता पुरणार नाही.
२. बॉर्न टू विनच्या ५ वर्षाच्या यशस्वी कामगिरीचे सेलीब्रेशन..!
३. बॉर्न टू विनच्या त्रैमासिकाचे व मोटिव्हेटर मित्र कॅलेंडरचे प्रकाशन.!


मित्रांनो, असा हा आपल्या लक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचा स्नेहमेळावा... १४ वा लक्ष्यसिध्दी सोहळा येत्या ७ फेब्रुवारी २०१३ रोजी, सायंकाळी ६ वाजता, माटुंगा (प.) येथील यशवंत नाट्यमंदीर येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमाला बॉर्न टू विनचे आजी-माजी प्रशिक्षणार्थी आपल्या स्नेहींबरोबर उपस्थित राहतील व जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवतील यात काहीच शंका नाही. हा एक खुप छान असा क्षण असणार आहे जिथे त्यांना आपले सर्व सहप्रशिक्षणार्थी भेटतीलच, त्याच बरोबर नवीन ओळखी आणि मित्र देखील बनतील!

मित्रांनो, १४ वा लक्ष्यसिध्दी सोहळा हा किती स्पेशल असणार आहे हे तर आपल्याला कळलेच असेल! जर हा कार्यक्रम इतका स्पेशल असणार आहे तर मग आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे देखील तेवढेच स्पेशल असलेच पाहीजेत... आणि म्हणुनच मित्रांनो या वेळी आपल्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे प्रमुख पाहूणे आणि मार्गदर्शक असणार आहेत, देशविदेशातील पर्यटन क्षेत्रातील सुप्रसिध्द ब्रँड केसरी टूर्सचे संस्थापक श्री. केसरी पाटील सर...!!!

हो मित्रांनो! चौदाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये श्री. केसरी पाटील सर आपल्याला त्यांच्या यशस्वी व्यवसायिक प्रवासाबद्दल सांगणार आहेत, त्यांच्या मुलाखतीद्वारे मुलाखतीचा विषय: 'न संपणारा प्रवास...' मुलाखतकारः बॉर्न टू विनचे संचालक: अतुल राजोळी.


मित्रांनो, १९८४ साली श्री. केसरी पाटील यांनी वयाच्या ५० व्या वर्षी केसरी टूर्सची स्थापना केली ती एका १० X १० च्या जागेत. त्यांची पत्नी व मुलांच्या मदतीने सुरु झालेला हा व्यवसाय, आज केसरी टूर्स Pvt. Ltd. या संस्थेमध्ये १००० लोकांपेक्षा जास्त माणसे कार्यरत आहेत. व कंपनीची वार्षिक आर्थिक उलाढाल ५०० कोटींपेक्षा जास्त आहे. इतके प्रचंड यश गेल्या २९ वर्षांमध्ये साध्य केलेल्या या व्यक्तीचा व संस्थेचा प्रवास नेमका कसा होता? हे उलगडणार आहे. चौदाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यामध्ये!

मित्रांनो, आपण या कार्यक्रमाला का उपस्थित असले पाहिजे हे आणखी नव्याने सांगायची गरज नक्कीच नाही... आपण आपल्या संपुर्ण कुटुंबासह या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल अशी आशा करतो.

श्री. केसरी पाटील सर यांच्याबद्दल थोडेसे:
पुरस्कारः
  • इंडियन एक्स्प्रेसचे चीफ एडिटर शेखर गुप्ता यांच्या हस्ते बर्ड ट्रॅव्हल एक्स्प्रेसचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान.
  • सुप्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते 'उद्योग श्री जीवनगौरव' पुरस्कार प्रदान.
  • सलग दोन वर्षे पर्यटन क्षेत्रातील महत्त्वाच्या 'गॅलिलिओ' पुरस्काराचे मानकरी.
  • लोकसत्ताचे माजी संपादक श्री. अरुण टिकेकर यांच्या हस्ते 'उद्योग श्री' पुरस्कार प्रदान.
  • माजी उर्जामंत्री श्री. सुरेश प्रभू यांच्या हस्ते 'मराठी व्यापारी मित्रमंडळ' पर्यटन उद्योग विकसन पुरस्कार.
  • नागपूर येथे 'ट्रॅव्हल अ‍ॅण्ड टुरिझम एक्स्पो २००१' मध्ये सक्रिय सहभागाकरिता 'मोस्ट अ‍ॅग्रेसिव्ह मार्केटिंग अ‍ॅवॉर्ड' प्रदान.
  • आय. आय. टी. सी. कडून 'महाराष्ट्र रत्न' पुरस्कार प्रदान. 

केसरीचा इतिहासः
८ जून १९८४ साली केसरी रा. पाटील यांनी १०० चौरस फूट जागेत फक्त एक कारकून टंक लेखनिकाच्या सहकार्याने 'केसरी टूर्स' या सहल कंपनीची स्थापना केली. सोबत पत्नी सुनीता पाटील यांची मोठी मेहनतीची साथ होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेले नाही. आज या कंपनीला २५ वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्यातर्फे मोठ्या संख्येने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहली आयोजीत केल्या जातात. आपल्या ध्येयांना आणि उद्देशांना पूर्ण करण्याकरिता त्यांना त्यांच्या पत्नी सुनीता यांचे संस्थापनेपासूनच बहुमोल सहकार्य लाभले तसेच मुली वीणा आणि झेलम आणि मुलं शैलेश आणि हिमांशू, जावई सुधीर व अमित आणि सुना संगीता - सुनीला हा संपूर्ण केसरी परिवार त्यांना व्यवसायात मदत करत आहे.


'केसरी टूर्स' ची पहिली सहल राजस्थानला गेली होती, ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. आज या संख्येने अडीच लाखांचा आकडा पार केला आहे. केसरीचा हा 'परिवार' आता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत. त्यात आता भर पडली आहे ती केसरीला मिळालेल्या ISO 9001:2000 आणि OHSAS 18000:2007 या प्रमाणपत्रांची. दोन्ही प्रमाणपत्रं मिळवणारी केसरी ही जगातील पहिलीच पर्यटन कंपनी ठरली आहे.

केसरीचे ध्येय आणि उद्दिष्टः
पर्यटन क्षेत्रात नवनवीन पायंडे घालून कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रीय दृष्टिकोन आणि तत्त्वांच्या बळावर संपूर्ण दर्जात्मक पर्यटन आणि विविधांगी सेवा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी आम्ही सदैव कटीबध्द आहोत.

चौदावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
 विषय: 'न संपणारा प्रवास...'
दिनांक: ०७ फेब्रुवारी २०१३
वेळः संध्याकाळी ६ वाजता
स्थळः यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites