मराठी उद्योजकांनो, ग्लोबल व्हा! - दीपक घैसास सर ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 August 2015

मराठी उद्योजकांनो, ग्लोबल व्हा! - दीपक घैसास सर

“कुठल्याही भाषेला तेव्हाच महत्त्व प्राप्त होते, जेव्हा ती भाषा बोलणाऱ्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या बळकट असतात. तेव्हा मराठी उद्योजकांनी एकमेकांना साहाय्य करून आपला उद्योग ग्लोबल प्लॅटफॉर्मवर नेण्यास सज्ज व्हावे,” असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध उद्योजक दीपक घैसास यांनी दिला. महाराष्ट्रातील लघू व मध्यम उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत शिरकाव करण्यास सक्षम करणारी कंपनी मी उद्योजक आणि ट्रेनिंग पार्टनर बॉर्न टू विन संस्थेतर्फे वरळीतील नेहरू तारांगण येथील सभागृहात डेट विथ द ग्रेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात घैसास यांनी जागतिक बाजारपेठेत संधी शोधताना तरुण उद्योजकांनी कुठली तयारी केली पाहिजे, यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक मी मराठी LIVE होते.
“मराठी उद्योजकांनी आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती सर्वप्रथम सोडावी. एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला किंवा लुळ्या-पांगळ्या श्रीमंतीपेक्षा हट्टीकट्टी गरिबी बरी , अशा प्रचलित म्हणींच्या मानसिकतेतून बाहेर या. त्याऐवजी एका तिळाच्या तुकड्याचे सातपट करून ते सर्वांनी खाल्ले, असा सकारात्मक दृष्टिकोन आपण का ठेवू नये? आयुष्यात प्रत्येकाला कधी ना कधी रडायचेच आहे. मग, सायकलवर बसून रडायचे की, मर्सिडीजमध्ये हे प्रत्येकाने ठरावावे,” असे म्हणत घैसास यांनी उद्योजकांना चाकोरीबद्ध दृष्टिकोन बदलण्यास प्रोत्सोहित केले.
कुठलेही यश मिळवायचे झाल्यास उच्चशिक्षणाबरोबरच संधीचा योग्य वापर करता यायला हवा. मी बरेच आयआयटीयन्स अमेरिकेत एकापाठोपाठ जाताना पाहिलेत. त्यावर मागे आम्ही एक सर्वेक्षण केले, जे धक्कादायक होते. सुरुवातीला दोन-चार वर्षे अतिशय गलेलठ्ठ पगार घेऊन हे आयआयटीयन्स एका सामान्य नोकरदारांप्रमाणेच अमेरिकेत कार्यरत होते, तेव्हा त्यांचे समवयस्क सहकारी, मित्र भारतात अत्यंत प्रतिकूल वातावरणात संधी शोधत होते. त्यानंतर हळूहळू का होईना; पण उद्योग विस्ताराच्या आधारे हेच सहकारी अमेरिकेतील आयआयटीयन्सना कमाईच्या बाबतीत टेकओव्हर करू लागले. त्यांना पाहून भारतात क्रिएटिव्ह करण्याची संधी गमावल्याच्या आणि पुन्हा परतण्यास उत्सुक असूनही कौटुंबिक कारणांनी तसे करता न येणाऱ्यांच्या संख्येत भरच पडत गेली. त्यातील बहुतांश आयआयटीयन्स सद्य:स्थितीत निरुत्साहीपणे, समोर कुठलेही ध्येय नसल्याप्रमाणे काम करताना दिसत असल्याचे दाहक वास्तव त्यांनी सर्वांपुढे आणले.


“उद्योगधंद्यात परिस्थितीचे आकलन होणे गरजेचे असते. भविष्याचा वेध घेत, परिस्थितीनुरूप स्वत:मध्ये बदल घडवण्याची क्षमता असेल, तर तुमची वाढ निश्चितच आहे. कमी बोला, मात्र ग्राहकांचा-कर्मचाऱ्यांचा सल्ला कधीही नजरेआड करू नका. उद्योगधंदा करताना अडचणी या येतातच; पण हार न मानता, या अडचणींवर मात करायला शिका,” असा मूलमंत्रही त्यांनी उद्योजकांना दिला.
याअगोदर मी उद्योजक कंपनीचे संस्थापक स्वप्निल दलाल यांनी कंपनीच्या स्थापनेमागचा उद्देश समजावून देत, परस्पर समन्वयाने काम करणाऱ्या उद्योजकांच्या समृद्धी, ऐश्वर्य, वैभव, उत्कर्ष, यश, उन्नती आणि आदित्य या सात चॅप्टरच्या सदस्यांची ओळख करून दिली.तर उद्योगविश्वातील दिग्गजांचे अनुभव त्यांच्या तोंडून ऐकता यावेत, म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे बॉर्न टू विन चे संचालक अतुल राजोळी सांगितले.

पाच रुपयांचे घड्याळ पाचशेला विकले
उद्योग करताना संबंधित क्षेत्रातील अद्ययावत माहिती असावी, या माहितीचा योग्य वेळी वापर करता आला पाहिजे, हे समजावून सांगताना घैसास यांनी पुण्यातील भंगारवालीचे उदाहरण दिले. या भंगारवालीने एका बाईकडून भंगारातील घड्याळ पाच रुपयांना विकत घेऊन पाचशे रुपयांना विकले. हे घड्याळ अँटिक असल्याचे तिने अचूक ओळखले आणि पुण्यातील अँटिक घड्याळ जमवणाऱ्याची माहिती असल्याने त्याला पटकन विकले. यामागचा मथितार्थ असा की, जागतिक स्तरावर व्यापार करताना तुम्हाला कुठल्या बाजारपेठेत किती संधी आहेत, ते ओळखता आले पाहिजे. तसेच इतरांच्या अगोदर आपले प्रॉडक्ट विकता आले पाहिजे. मिरजेत १२ बाय १५ फुटांच्या दुकानात बसून वाद्य बनवणारा विक्रेता वेबसाइटद्वारे परदेशातील ऑर्डर पूर्ण करू शकतो, तर मुंबईत राहून आपल्याला जागतिक स्तरावर झेप घेताच आली पाहिजे. सांघिक प्रयत्नांच्या आधारावर मराठी उद्योजकांना हे ध्येय साध्य करता येईल. तरुणांनी काळाशी सुसंगत वेबसाइट, मीडिया, इंटरनेट अशा माध्यमांची ओळख करून घेण्याचा सल्लाही घैसास यांनी दिला.

या कार्यक्रमाचे प्रमुख प्रायोजक होते 'ग्रेटर बँक'


Source: Mi Marathi Live

1 comment:

general manager said...

This is really a helpful article,.i really like it,.
"content agency"

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites