ब्रँडींग - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

26 August 2015

ब्रँडींग - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 'ब्रँड' हा शद्ब जेव्हा एखादा लघुउद्योजक ऐकतो, तेव्हा ही संकल्पना त्याच्या व्यवसायाला लागु पडत नाही असंच त्याला वाटतं. 'ब्रँड' हा राष्ट्रीय किंवा जागतिक पातळीवर कार्यरत असलेल्या व्यवसायांनाच महत्त्वपुर्ण ठरतो, अशी बर्‍याच लघुउद्योजकांची धारणा असते. बहुतांशपणे लघुउद्योजकांना ब्रँडींग बद्दल जास्त आकर्षण वाटत नाही. 'आम्हाला 'ब्रँड' वगैरे बनवण्याची गरज नाही!' अशी त्यांची समजुत असते. लघुउद्योजकांना असं वाटत असतं की 'ब्रँड' ची निर्मिती करणे हा फार खर्चिक प्रकार आहे आणि आपण ज्या पातळीवर सध्या कार्यरत आहोत, ती लक्षात घेता आपल्या 'बजेट' मध्ये हा प्रकार अजिबात बसणार नाही, त्यामुळे आपण ब्रँडच्या भानगडीत न पडलेलं बरं! 'ब्रँड' निर्माण करण्यासाठी महागड्या एजन्सीची सेवा घ्यावी लागेल अशी त्यांची समजूत असते किंवा अपयशाच्या भितीपोटी, सर्वसामान्य लघुउद्योजक 'ब्रँडींग' च्या वाटेला जात नाही.
मित्रांनो, व्यवसाय कोणताही असो आणि तो कितीही लहान किंवा मोठा असो, व्यवसायाचं दुरगामी यश बाजारपेठेत असलेल्या व्यवसायाच्या प्रतिमेवर ठरते. वर्षानुवर्षे काही उत्पादने बाजारपेठेत राज्य करत आहेत, कितीही स्पर्धा असली तरी या उत्पादनांचे स्थान आजही भक्कम आहे. दुपारच्या वेळी आपल्याला तहान लागली असताना, दुकानात किंवा रेस्टॉरंटमध्ये आपण 'एक बिस्लेरी द्या' असं म्हणतो! 'एक बाटली पॅकेज्ड ड्रिंकींग वॉटर द्या' असं म्हणत नाही. आपल्याला काहीतरी चिकटवण्यासाठी गम हवा असतो परंतु आपण दुकानदाराला 'फेविकॉल द्या' असं सांगतो. टुथपेस्टला आजही बरेच जण 'कोलगेट' म्हणतात. एखाद्या कागदाची फोटोकॉपी काढण्यासाठी आपण 'झेरॉक्स' हाच शब्द वापरतो. बिस्लेरी, फेविकॉल, कोलगेट, झेरॉक्स ही नावे काय आहेत? हे सगळे 'ब्रँड' आहेत! 
 
या उत्पादनांनी बाजारपेठेत त्यांच्या ग्राहकवर्गामध्ये अशी प्रतिमा निर्माण केली आहे की ग्राहकांचा या उत्पादनांवर प्रचंड भरोसा आहे. बाजारपेठेत कितीही प्रतिस्पर्धि असले तरी आपल्या ब्रँडच्या जोरावर आजही ही उत्पादने यशस्वीपणे टिकून आहेत. काय वाटतं आपल्याला, या कंपन्या आपल्या उत्पादनांचा ब्रँड निर्माण करण्यासाठी जाणिवपूर्वकपणे प्रयत्न करत असतात की आपोआपच त्यांचा ब्रँड बनतो? साहजिकच या कंपन्या आपल्या उत्पादनाचा ब्रँड निर्माण करण्याला प्रचंड महत्त्व घेतात. परंतु प्रश्नं असा पडतो की तेवेढेच महत्त्व लघुउद्योजकांनी सुध्दा आपल्या उत्पादनांचा ब्रँड बनवण्यासाठी दिले पाहीजे का? मित्रांनो, आधी म्हंटल्याप्रमाणे व्यवसायाचा व्याप कितीही मोठा किंवा लहान असो, दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची बाजारपेठेत असलेली  प्रतिमा कारणीभुत ठरते. बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची उत्पादन अथवा सेवेची 'विश्वसनिय प्रतिमा' निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला 'ब्रँडींग' असं म्हणतात. बाजारपेठेत व्यवसायाची, उत्पादन किंवा सेवेची 'वेगळी व विश्वसनिय ओळख' म्हणजेच त्या व्यवसायाचा 'ब्रँड' होय! या ब्रँड मुळे व्यवसायाला किंवा उत्पादन सेवेला अद्वितीय स्थान प्रात्प होतं. ब्रँड मुळे व्यवसायाला बरेच फायदे प्राप्त होतात. ब्रँड मुळे उत्पादन व सेवा सदैव ग्राहकाच्या लक्षात राहते. प्रतिस्पर्धींपेक्षा उत्पादन व सेवेच वेगळं असं स्थान निर्माण होतं. ब्रँडमुळे ग्राहकांचा उत्पादन व सेवेवर विश्वास बसतो. ग्राहक वर्ग पुन्हा पुन्हा उत्पादन व सेवा विकत घेण्यासाठी प्रेरीत होतो. ब्रँडमुळे उत्पादन व सेवा थेट ग्राहकाच्या भावनांशी जोडले जाते. व्यवसायात दुरगामी यश प्राप्त करण्यासाठी 'ब्रँड' निर्णायक भुमिका बजावतो.
मित्रांनो, ब्रँडचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे 'कोका-कोला'. आपल्याला सर्वांना माहीत आहे की कोला पेय पिणं आरोग्यासाठी पोषक वगैरे नाही किंवा आपल्या रोजच्या जीवनाची गरज सुध्दा नाही. तरी सुध्दा आपण 'कोका-कोला' पितो! 'कोका-कोला' चा संपुर्ण व्यवसाय हा त्यांच्या ब्रँडींग आणि मार्केटींग कृतीयोजनांवर अवलंबुन आहे. ब्रँड शिवाय आज 'कोका-कोला' जगभरात यशस्वी उत्पादन होऊच शकले नसते. 'कोका-कोला' ने घरोघरी कुटुंबामध्ये आपले अप्रत्यक्षपणे स्थान निर्माण केले आहे. ही ब्रँडचीच जादु आहे. 
मित्रांनो या लेखा द्वारे मी आपल्या लघुउद्योगाचा ब्रँड तयार करण्यासाठी सात पायर्‍या सांगणार आहे. कोणत्याही लघुउद्योगासाठी ठरवलेल्या बाजारपेठेमध्ये वेगळा व विश्वसनिय ब्रँड तयार करण्यासाठी या पायर्‍या जबरदस्त फायदेशीर ठरु शकतात.

लघुउद्योगाचा ब्रँड निर्माण करणार्‍याच्या ७ पायर्‍या:
१) USP तयार करा : बाजारात आपल्या उत्पादनाची वेगळी व विश्वसनीय प्रतिमा निर्माण करण्यासाठी सर्व प्रथम मुळतः उत्पादनाचा वेगळा गुणधर्म असणे गरजेचे आहे. उत्पादन किंवा सेवेतच जर काही वेगळेपण नसेल तर ब्रँड निर्माण करणे अशक्य. बाजारपेठेचा आढावा घेऊन, ग्राहकवर्गाच्या गरजा लक्षात घेऊन आपल्या उत्पादन व सेवेमध्ये जाणिवपूर्वकपणे तयार केलेला गुणधर्म म्हणजे USP. USP तयार करण्याच्या टिप्स् मी या सदरातील मागिल लेखात दिल्या होत्या. कृपया त्याचा अभ्यास करा.
२) आपल्या व्यवसायाची किंवा उत्पादन सेवेची बाजारपेठेत कशी प्रतिमा असावी? ते ठरवा : व्यवसायाच्या USP ला अनुसरुन तशी प्रतिमा ग्राहकाच्या मनात निर्माण होणं गरजेचं आहे. म्हणुनच त्याबद्द्ल विचार मंथन करा की, आपल्या उत्पादनाबद्दल जेव्हा ग्राहक विचार करतो तेव्हा नेमक्या कोणत्या भावना त्याच्या मनात आल्या पाहीजेत. उदाहरणार्थ : 'सफोला' कुकींग ऑइल बद्दल जेव्हा आपण विचार करतो त्यावेळी आपल्या मनात त्वरीत ह्रदयाची काळजी, कोलेस्ट्रोल नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त अशी प्रतिमा तयार होते. 'सफोला' ला स्वतःची वेगळी व विश्वसनिय प्रतिमा निर्माण करण्यात नक्कीच यश आले आहे. 
३) कोणत्या माध्यमांद्वारे आपल्याला व्यवसायाची अपेक्षित प्रतिमा निर्माण करता येईल? ते ठरवा : व्यवसायाची प्रतिमा निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या प्रसार माध्यमांचा, जाहीरात माध्यमांचा, मार्केटींग साधनांचा किंवा संभाषण माध्यमांचा वापर आपण केला पाहीजे. जेणे करुन आपल्या उत्पादनाची अद्वितीयता ग्राहक वर्गा समोर व्यक्त करु शकतो. आपल्या 'ब्रँडींग बजेट' मध्ये शक्य असेल त्या माध्यमांना निवडा. उदाहरणार्थ. लोगो, टॅग लाइन, बिझनेस कार्ड, स्टेशनरी, ब्रोशर, वेबसाइट, सोशल मिडीया, भेटवस्तु, गणवेश, कार्यस्थळातील वातावरण, पॅकेजिंग, जाहीरात इ. अनेक साधनांचा उपयोग होऊ शकतो. 
४) ब्रँडींग साधनांची निर्मिती करा : ठरवलेल्या ब्रँडींग साधनांची योग्य प्रकारे निर्मिती करा. प्रोफेशनल व्यक्तींची मदत घ्या. चांगल्या अ‍ॅड एजन्सी ज्या लघुउद्योगांसाठी काम करतात, त्यांची योग्य प्रकारे निवड करा. शक्यतो एकाच एजन्सी बरोबर काम करा जेणे करुन ब्रँडींग मध्ये सातत्य राहील.
५) कायदेविषयक सुरक्षितता मिळवा : ब्रँडींग साधनांमुळे व्यवसाय किंवा उत्पादन-सेवेला एक अस्तित्व प्राप्त होते. त्या अस्तित्वाला आपण सुरक्षित ठेवले पाहीजे. ही एक प्रकारे व्यवसायाची महत्त्वपुर्ण संपत्ती असते. याला IP (Intellectual Property) असं म्हणतात. कॉपी राइट किंवा ट्रेडमार्कं करुन आपण आपल्या ब्रँड ची ओळख सुरक्षित करु शकतो.
६) ब्रँड कृतीयोजना तयार करा : आता येत्या काळात टप्प्या टप्प्याने आपण आपल्या ब्रँडचा बाजारपेठेत कश्या प्रकारे प्रचार कराल त्यासाठी लिखित स्वरुपात कृती योजना तयार करा. या कृतीयोजनेव्दारे आपण ठरवल्याप्रमाणे ग्राहकाच्या मनात विश्वसनीय प्रतिमा निर्माण होणे गरजेचे आहे.
७) ब्रँड कृती योजनेला अनुसरुन सातत्याने अंमलबजावणी करा : ठरवलेल्या कृती योजनेनुसार अंमलबजावणी झाली तरच ब्रँड निर्माण होइल. ब्रँड माध्यमांमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे. अर्धवट अंमलबजावणी मुळे ब्रँडवर विपरीत परिणाम होऊ शकतो.
मित्रांनो, या लेखाव्दारे मी लघुउद्योगांसाठी ब्रँडींग बद्दल थोडक्यात माहीती दिली आहे. ब्रँड निर्माण करण्याच्या सुरुवातीच्या काळात ही माहीती नक्कीच लाभदायक ठरेल. मी आशा करतो की आपण आपल्या व्यवसायाचे बाजारपेठेत वेगळे व विश्वसनीय स्थान निर्माण करण्यासाठी पाऊलं उचलालं.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्क: 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड कराकिंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites