LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

02 September 2013

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस

स्वप्नं प्रत्यक्षात आणणारा माणूस
‘कालनिर्णय’च्या रूपात मराठी घराघरात, मनामनात पोहोचलेल्या ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांचे नुकतेच निधन झाले. दैनिक ‘लोकसत्ता’तील शब्दकोडय़ांपासून सुरू झालेली त्यांची कारकीर्द, त्यांच्या आयुष्यात आलेली वेगवेगळी वळणं, चढउतार, त्या सगळ्यांतून बावनकशी सोन्यासारखे तावून सुलाखून बाहेर पडलेले जयंत साळगावकर म्हणजे एक आश्चर्याचा प्रवास आहे.

(वडिलांबद्दलचे जयराज साळगांवकर यांचे अनुभव)
बाबांनी १९५१ मध्ये ‘लोकसत्ता’ दैनिकामध्ये शब्दकोडे विभागात रचनाकार आणि सहसंपादक म्हणून कामाला सुरुवात केली. त्याआधी त्यांनी मालवणमध्ये ‘ज्योती’ नावाचे एक नियतकालिक चालवलं होतं. प्रचलित तसंच संत साहित्याच्या वाचनामुळे त्यांना शब्द, त्यांचे अर्थ, त्यातले बारकावे यांचं चांगलं ज्ञान होतं. ‘लोकसत्ता’च्या शब्दकोडे विभागात नोकरी करताना त्याचा त्यांना चांगलाच उपयोग झाला. ‘लोकसत्ता’तील शब्दकोडय़ांना तेव्हा अमाप लोकप्रियता होती. शब्दकोडे विभागात तीस-बत्तीस माणसं काम करत. एका चौकोनाला आठ आणे अशी शब्दकोडे स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश फी होती. सुरुवातीला शब्दकोडय़ांवर सरकारी बंधनं नव्हती, पण नंतर तीस हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेची बक्षिसं नसावीत आणि वर्षभरातून सतराच शब्दकोडी प्रकाशित करावीत अशी बंधनं आली. प्रत्येक स्पर्धेत एक लाखाच्या आसपास रक्कम जमा होत असे. बक्षिसं देऊनही चांगली रक्कम उरत असे. शब्दकोडय़ांमध्ये जितकी विविधता तितकं लोकांचं त्याबद्दलचं आकर्षण वाढे. ‘लोकसत्ता’चा खपही वाढे. त्यामुळे बाबा आणि विद्याधर गोखले शब्दकोडय़ांमध्ये नावीन्य आणण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करून बघत. ‘लोकसत्ता’तली शब्दकोडी इतकी लोकप्रिय होती की या वर्तमानपत्राचा उल्लेखच लोक ‘कोडय़ाची लोकसत्ता’ असा करत आणि असा उल्लेख केलेला तेव्हाचे संपादक ह. रा. महाजनी यांना अजिबात आवडत नसे, अशी आठवण बाबा सांगत. शब्दकोडे विभागात काम करताना विद्याधर गोखले यांच्यावर महिन्यातून एक तर बाबांवर महिन्यातून एक शब्दकोडे करण्याची जबाबदारी असे. त्याशिवाय त्या शब्दकोडय़ाच्या जाहिराती करायच्या आणि थोडेफार इतर व्यवस्थापकीय काम असे. ही कामं करूनही त्यांच्याकडे भरपूर वेळ उरायचा. त्या वेळात त्यांनी फलज्योतिषाचा आणि हस्तसामुद्रिकाचा अभ्यास केला. अगणित लोकांच्या कुंडल्या आणि हात त्यांनी त्या काळात बघितला. या अभ्यासाचा त्यांना लगेचच उपयोग झाला तो अत्यंत लोकप्रिय अशी ‘लोकसत्ता’तली शब्दकोडी १९५६ मध्ये बंद पडली तेव्हा.
शब्दकोडे विभाग बंद झाल्यानंतर बाबा मात्र ‘लोकसत्ता’तून बाहेर पडले. नोकरी सोडताना मिळालेल्या १५-१६ हजारांच्या रकमेतून त्यांनी ‘लोकमित्र’ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. पण सहा महिन्यांतच ते पैसेही संपले आणि साप्ताहिकही बंद पडलं. पण या ‘लोकमित्र’च्या अंकात बाबा साहित्याच्या अंगाने, संतवचनांवर आधारित राशिभविष्य लिहीत असत. त्यांचं या पद्धतीचं राशिभविष्य त्या काळात लोकप्रिय झालं होतं. ‘लोकमित्र’ बंद पडल्यानंतर ‘लोकसत्ता’चे संपादक ह. रा. महाजनी यांनी बाबांना, त्याच प्रकारचं भविष्य ‘लोकसत्ता’त लिहावं असं बाबांना सुचवलं. त्यांचा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासही त्यांना अशा प्रकारे कामात आला. त्यानंतर १९५६ ते १९६२ या काळात ते ‘लोकसत्ता’च्या रविवारच्या अंकात राशिभविष्य लिहीत. बाबांनी त्या काळात इतर नियतकालिकांमध्ये कथा, लेख असं भरपूर लिखाण केलं. त्यांचं राशिभविष्य वाचायला लोकांना फार आवडायचं. त्यामुळे नंतरही इतर अनेक दैनिकांमध्ये त्यांनी राशिभविष्य लिहिलं.
१९५६ साली त्यांनी ‘लोकसत्ता’तली शब्दकोडं विभागातली नोकरी सोडली, पण शब्दकोडय़ाची त्यांच्यात निर्माण झालेली आवड मात्र त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यातूनच १९५८ साली शब्दरंजन स्पर्धा सुरू झाली. त्यात प्रामुख्याने भर होता साहित्य क्षेत्रावर. सुप्रसिद्ध असलेल्या तसंच फारसा माहीत नसलेल्या साहित्यिकांच्या अवतरणांवर आधारित शब्दकोडं हा अगदी नावीन्यपूर्ण प्रकार होता. ते खरोखरचं शब्दरंजनच होतं. मराठी वाचकांनी शब्दरंजन स्पर्धा अक्षरश: डोक्यावर घेतली आणि बाबांना एक नवीनच मार्ग सापडला. शब्दरंजन म्हणजे जयंत साळगावकर हे समीकरणच पुढे रूढ होऊन गेलं. या शब्दरंजन स्पर्धेने बाबांना यश, पैसा सगळं मिळवून दिलं. पण त्यांचा स्वभावच असा होता की त्यातून त्यांना पुढचं काहीतरी दिसत असायचं. त्यातूनच पुढच्या कल्पना सुचायच्या आणि मग त्या प्रत्यक्षात उतरवायच्या मागे ते लागायचे.

साहजिकच शब्दरंजन स्पर्धेतून मिळालेल्या आर्थिक समृद्धीतून त्यांना वेध लागले ते संतवाङ्मय लोकांना स्वस्तात उपलब्ध करून देण्याचे. दासबोधातला विचार लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी त्या वेळी सव्वा रुपया किमतीत दासबोध उपलब्ध करून दिला. त्याशिवाय १९६० साली त्यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर ‘स्वरगंगा’ नावाचा एक भक्तिगीतांचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. अडीच लाखांहून अधिक लोक या कार्यक्रमाला आले आणि त्या काळातल्या अव्वल गायकांनी गायलेल्या भक्तिरसात डुंबले. ‘शब्दरंजन’ नावानेच त्यांनी एक मासिकही सुरू केलं होतं. त्याचे संपादक होते ग. दि. माडगूळकर. शब्दरंजनमधून जसजसा फायदा होत होता, त्यातून आर्थिक पाठबळ उभं राहात होतं, तसतशा बाबांच्या डोक्यातून नवनवीन कल्पना बाहेर येत होत्या. त्या तर ते प्रत्यक्षात आणतच, शिवाय त्या काळातल्या वेगवेगळ्या संस्थांना, समाजोपयोगी कामांना भरघोस आर्थिक मदतही करत.
शब्दरंजन स्पर्धेची ही भरधाव निघालेली गाडी ब्रेक लागावा तशी १९६४ पासून मंदीच्या वावटळीत सापडली. १९६९ मध्ये सरकारने लॉटरी सुरू केली. शब्दकोडी भरून पैसे मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा लोक लॉटरीची तिकिटे विकत घ्यायला लागले. कोडी चालेनात. कोडय़ांची बक्षिसं देणं, छपाई, कागदवाल्यांची बिलं देणं सगळं हाताबाहेर जायला लागलं. अनेकजण कोर्टात गेले. अशा वेळी खरं तर कुणीही डगमगला असता. पण बाबा डगमगले नाहीत. आज त्या सगळ्याकडे बघताना असं वाटतं की एका गोष्टीतून दुसरी गोष्ट, तसं एका कामातून दुसऱ्या कामात, दुसऱ्या क्षेत्रात हे जसं काही सहजपणे घडत गेलं. तसं ते घडलं नाही हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण बाबांची जिद्द, संकटातून वाट शोधायची, नव्या वाटेने तितक्याच उत्साहाने चालायची वृत्तीच अशी होती की ते त्या सगळ्यातून सहजपणे वाट काढत गेले. त्यामुळे शब्दरंजन स्पर्धा बंद झाल्यानंतर दिनदर्शिकेचं प्रकाशन करायचं ही कल्पना त्यांना सुचली. त्या काळात खरं तर इतरही दिनदर्शिका होत्या. पण बाबांनी १९७२ मध्ये तिला एक रूप दिलं आणि आज घरोघरी भिंतीवर असणारं कालनिर्णय त्यातूनच आलं. पहिल्या वर्षी कालनिर्णयची किंमत होती सव्वा रुपया आणि त्याचा खप झाला नव्वद हजार. आधी फक्त मराठीत निघणारे कालनिर्णय आता आठ भारतीय भाषांमध्ये निघते आणि त्याचा खप आहे, साधारणपणे दीड कोटी. कालनिर्णय हे सुटसुटीतपणे पाहायचं पंचांग तर आहेच, शिवाय आजच्या काळातल्या रोजच्या जगण्यात लागणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत. रेल्वेचं, एसटीचं टाइम टेबल घ्या, वेगवेगळ्या रेसिपी घ्या, वेगवेगळ्या टिप्स घ्या.. दिनदर्शिकेच्या उरलेल्या जागेत माहितीपूर्ण लेख इतरजणही प्रसिद्ध करत, पण तिथे पुलंपासून कुसुमाग्रजांपर्यंत मोठमोठय़ा साहित्यिकांचे लेख प्रसिद्ध करून बाबांनी त्या जागेचं आकर्षणमूल्यच एकदम वाढवलं. वर्षभर भिंतीवर असणाऱ्या कालनिर्णयच्या पाठीमागे असलेल्या रेल्वेच्या टाइम टेबलने तर त्याची उपयुक्तता एकदम वाढवली. आता कॅलेंडर म्हणजे कालनिर्णय हे समीकरणच लोकांच्या मनात फिट्टं बसलं आहे. सुरुवातीला मराठी भाषकांमध्ये स्थान मिळवलेल्या कालनिर्णयचा नंतर इतर भाषांमध्ये जो पसारा वाढला तो पाहता कॅलेंडर कसं असावं, याबद्दलचा बाबांचा विचार हा फक्त मराठी मनापुरता सीमित नव्हता, तर तो एकूणच सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजांना सामावून घेणारा होता हेच स्पष्ट होतं. कालनिर्णयचा जम बसल्यानंतर त्यांनी स्वत:चं मुद्रणालय सुरू केलं. जर्मनीहून मोठं मशीन आणलं. पुढे आणखी मशिन्स वाढवली. हळूहळू सुमंगल प्रेसचं नाव मुंबईतलं एक मोठं मुद्रणालय असं घेतलं जाऊ लागलं. बाबांनी कालनिर्णय सुरू केलं तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. त्यामुळे एखादा उद्योग कसा उभा राहतो ते मी जवळून बघू शकलो, समजून घेऊ शकलो. बाबांचा दांडगा लोकसंग्रह त्यांच्या या उद्योजकतेला कसा पूरक ठरला हे मी जवळून बघितलं आहे. त्यांनी जोडलेली माणसं त्यांच्या अशा प्रत्येक उपक्रमात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.

अनेकविध प्रकारची माणसं बाबांच्या आयुष्यात आली. त्यात अनेक मोठमोठी माणसं होती. त्यातल्या अनेकांवर बाबांचा आणि अनेकांचा बाबांवर लोभ होता. या माणसांनी, त्यांच्या सहवासाने, त्यातल्या अनुभवांनी बाबांचं आयुष्य खरोखरच श्रीमंत केलं आहे.  पण या सगळ्यापलीकडे जाऊन बाबांचं श्रद्धास्थान होत ते गणपती. १९८९च्या कालनिर्णयमध्ये त्यांनी गणपतीबद्दल लिहिलं आहे, ‘‘भारतीय भूमीत जन्मलेले आणि इथंच लोकोत्तर कर्तृत्व गाजवून अमरत्व पावलेले आपले विविध देव अवतारी पुरुष हे आपलं पारंपरिक वैभव आहे. आपले देव नीतिधर्माचे उद्धारक आहेत. महत्कार्याचे कारक आहेत. दीनदुबळ्यांचे तारक आहेत. अडलेल्या नाडलेल्यांचे साहाय्यक आहेत आणि म्हणूनच महाकाव्याचे नायक आहेत. रामायण, महाभारतासारखी महाकाव्ये त्रिखंडात मान्य झाली आहेत ती त्यांचे नायक असे लोकोत्तर महापुरुष आहेत म्हणून. अशीच एक लोकोत्तर विभूती म्हणजे श्रीगणेश. परमेश्वर- पार्वतीचा हा पराक्रमी पुत्र दुष्टदुर्जनांचा निर्दालन करून विश्ववंद्य झाला. गजानन गणेश हा देवांचा सेनापती. केवळ रणक्षेत्रातच नव्हे तर कलाक्षेत्रातही अग्रस्थानाचा अधिकारी. संगीत, नृत्य, नाटय़ इत्यादी सर्व कलांचा प्रथमपदाचा मानकरी. आपण त्याला पूजतो ते तो असा गुणाधीश आहे म्हणून!’’
विद्याधर गोखले हे बाबांचे दैनिक ‘लोकसत्ता’मधले सहकारी. बाबांवरच्या एका लेखात ते म्हणतात, ‘‘साळगावकरांच्या शब्दरंजन कोडय़ांच्या अत्यंत चलतीच्या काळात मी त्यांचे नाव ‘स्वप्नरंजन साळगावकर’ असेच ठेवले होते. कारण ‘स्वप्नरंजन’ हा त्यांचा स्वभावच आहे. पहा ना, अवघा २५० रुपये पगार असताना १९५५ साली या गृहस्थाच्या डोक्यात मुंबईहून ‘सिंधुदुर्ग विशेषांक’ काढण्याचे स्वप्न जागृत झाले.  ते पु. भा. भाव्यांना म्हणाले होते, ‘पाहिजे तेवढे लिहा. पृष्ठसंख्येची मर्यादा तुम्हाला नाही.’ त्यासाठी त्यांनी मुखपृष्ठासाठी मोठे चित्रही काढून घेतले होते. ग्लॉसी पेपरवर त्यांना हा अंक काढायचा होता. सिंधुदुर्गात दणक्यात प्रकाशन समारंभ करायचा होता. पण ते स्वप्न अधुरंच राहिलं.’’
बाबांना साठ वर्षे पूर्ण झाली तेव्हा काढलेल्या विशेषांकात ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांचा एक मोठा लेख आहे. त्यात दळवी लिहितात, ‘‘जयंतरावांनी पैसा जवळ केला. पण अनेकदा पैशाबरोबर येणारा गर्व, मिजास, अहंभाव, उधळपट्टी, श्रीमंतीचं प्रदर्शन अशांसारख्या गोष्टी जवळ येऊन दिल्या नाहीत. मध्यम गरिबी, बेकारी, बरे दिवस, सुरळीत आयुष्य, पुन्हा जीवघेणी गरिबी आणि त्यानंतर उदंड श्रीमंती अशा विविध अवस्थांमधून गेल्यानंतर आता श्रीमंती असतानाही साळगावकरांच्या व्यक्तिमत्त्वात एक आध्यात्मिक श्रीमंती निर्माण होत आहे असं दिसतं. त्यांच्या वृत्तीत एक प्रकारची तटस्थता निर्माण होत आहे. आपला धर्म, आपला समाज यांचा ते अधिक विचार करत आहेत असं वाटतं. हिंदू धर्मात झपाटय़ाने सुधारणा व्हाव्यात यावर त्यांचा कटाक्ष आहे. हिंदू धर्माकडे ते मानवधर्म म्हणून पाहतात. अंधश्रद्धांचं निर्मूलन झालं पाहिजे असं ते मानतात. पण ते करताना डोळस श्रद्धेवरही त्यांचा भर आहे. जगाचं सूत्रसंचालन करणारी शक्ती आहे अशी त्यांची श्रद्धा आहे. त्या शक्तीची भक्ती हवी, ती शक्ती तुम्हाला योग्य रस्त्यावर ठेवते असं ते मनापासून मानतात.’’
याच अंकात बाबांवर लिहिलेल्या लेखात दत्तप्रसाद दाभोळकर लिहितात, ‘‘भविष्यावर विश्वास नसलेल्या माझ्या मनाला जयंतरावांनी अनेक झटके दिलेत. अजून माझा अविश्वास अभेद्य आहे. पण ते त्याला कधीतरी जमीनदोस्त करणार अशी मला भीती वाटते. पण तरीही ज्योतिर्भास्कर जयंतराव मला आवडतात आणि मी त्यांच्या प्रेमात पडलोय, त्याचे कारण त्यांची भविष्य ही विद्या नव्हे. मी त्यांच्या प्रेमात पडलोय ते समोरच्या माणसाला समजावून घेऊन त्याला आपल्याला पटलेली व आपल्याकडून होईल तेवढी मदत करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे. जयंतराव माणसात गुंततात. त्यांना माणसे एकदम आवडतात किंवा आवडत नाहीत आणि मग आवडलेली माणसे संपूर्णपणे त्यांची असतात. जयंतरावांना आवडणाऱ्या माणसांत छोटा-मोठा असा भेदभाव नसतो. त्या यादीत त्यांच्या घरातील इतर कोणाशीच न पटणारा त्यांचा ड्रायव्हर असतो, नाहीतर माझ्यासारखा एखादा मित्र!’’
त्यांनी वडील या नात्याने मला काय दिलं, याचा मी विचार करतो तेव्हा जे जाणवतं ते मला आजही थक्क करणारं आहे. कारण मुळात त्यांनी लहानपणापासून मला जे दिलं, ज्याचा माझ्यावर खूप सखोल परिणाम झाला ते सगळं अगदी नकळत आहे. म्हणजे एखादा संस्कार करायचा म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षाही त्यांच्या सहज वागण्यातून मला जे काही मिळत गेलं त्याची किंमत कशाशीच होऊ शकत नाही. मला आठवतं, पहिलीमध्ये असताना परळमधल्या एका शाळेत मी जायचो. एकदा तिथल्या हेडमास्तरांनी मला भिंत आणि दार यांच्यामध्ये उभं करून, दाराची उघडझाप करायची शिक्षा दिली. बाबांना हा प्रकार समजल्यावर त्यांनी मला विचारलं, तुला बालमोहनमध्ये जायचं आहे की किंग जॉर्जमध्ये? आता पहिलीतल्या मुलाला तेही शाळा कोणती हवी याबाबतचे दोन पर्याय देऊन त्यातून निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य देण्याचा तो काळ नव्हता. पण ते स्वातंत्र्य त्यांनी मला दिलं. त्याचा माझ्यावर नकळत का होईना खूप परिणाम झाला. अशीच एक आठवण आहे, पुढच्याच वर्षीची. मी दुसरीत असतानाची. एकदा ते मला ढवळे प्रकाशनाच्या पुस्तकांच्या दुकानात घेऊन गेले. तुला हवी आहेत ती पुस्तकं घे, असं त्यांनी मला सांगितलं. त्या वयातदेखील मी २५-३० पुस्तकं निवडली. घरी नेऊन सगळी वाचली. तिथून मला वाचनाची गोडी लागली. नकळतपणे त्यांनी केलेला हा वाचनसंस्कार माझ्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते मी शब्दात सांगू शकत नाही. बाबा त्या वेळी शब्दरंजन स्पर्धेसाठी शब्दकोडी तयार करत आणि त्यात मराठी पुस्तकांमधली अवतरणं असत. ही अवतरणं वाचकांना सहज मिळणारी नसावीत यासाठी बाबा दुर्मीळ पुस्तकं धुंडाळत. त्यामुळे लहानपणापासूनच मला कितीतरी दुर्मीळ पुस्तकंही वाचायला मिळाली. ती तेव्हा किती समजली माहीत नाही, पण पुस्तक हाताला लागलं की ते वाचूनच संपवायचं ही सवय लागली ती तिथूनच. बाबा खूपदा निर्णयसागरच्या प्रेसमध्ये जात. त्यामुळे छपाईचं मशीन, छपाई खिळे, रंग हे सगळं बघत, ऐकतच मी मोठा झालो. त्यांचा एक विशेष गुण म्हणजे कामासाठी ते ज्यांच्या ज्यांच्याकडे जात तिकडे त्यांच्याबरोबर कधी कधी मलाही घेऊन जात. बाबांमुळे साहित्य, पत्रकारिता, नाटक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतली अनेक मोठी माणसं आमच्या घरी येत. त्यामुळे त्या काळातल्या मोठय़ा माणसांना मला अगदी लहानपणीच भेटता आलं. या सगळ्यांच्या वेगवेगळ्या विषयांवरच्या चर्चा हे खरं तर एक प्रकारचं शिक्षणच होतं. त्या काळात मला जे शिकायला मिळालं ते कुणालाही, कधीही कुठल्याही विद्यापीठात शिकायला मिळालं नसेल. मला नेहमी वाटतं की वातावरणातच मी खऱ्या अर्थाने घडलो.

21 August 2013

छायाचित्रकारांचा बाप माणूस

छायाचित्रकारांचा बाप माणूस
प्रा. श्रीकांत मलुष्टे, रविवार, १८ ऑगस्ट २०१३.
येत्या सोमवारी १९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक छायाचित्र’ दिन साजरा करण्यात येतो. छायाचित्रणातील बापमाणूस असणारं एक अफलातून व्यक्तिमत्त्व जॉर्ज इस्टमन यांच्या कार्यावर प्रकाशझोत...
अवेळी शाळेतून नाव काढून टाकलेला जॉर्ज इस्टमन हा मुलगा पुढे फोटोग्राफी क्षेत्रात जगात खूप नाव कमावून अमेरिकेतला खूप श्रीमंत माणूस म्हणून ओळखला जाईल याची सुरुवातीला कुणाला कल्पना तरी करता आली असती का?

आई मारिया किलबार्न व वडील वॉशिंग्टन इस्टमन यांचा दोन मुलींनंतर १२ जुलै १८५४ दिवशी जन्माला आलेला जॉर्ज सर्वात धाकटा मुलगा. वडिलांचं छत्र जॉर्ज आठ वर्षांचा असतानाच हरपलं. सोळा वर्षांचा असताना पोलिओने आजारी असलेली धाकटी बहीण काटिया गेली. त्याच्या आईनं अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्याला वाढविलं. चौदा वर्षांचा असताना जॉर्ज मेसेंजर बॉय(शिपाई) म्हणून रॉचेस्टर इन्श्युरन्स कंपनीत नोकरीला लागला. चांगली नोकरी मिळावी म्हणून अकाऊंटिंगचा अभ्यास संध्याकाळच्या वेळात त्यानं सुरू केला आणि पुढे एका स्थानिक बँकेत क्लार्क म्हणून काम करू लागला.

चोवीस वर्षांचा असताना सुट्टीत तो सान्टो डोमिंगो या पर्यटनस्थळी जाणार होता तेव्हा त्याच्या मित्राने तेथील निसर्गरम्य दृश्ये टिपण्यास कॅमेर्‍याचं साहित्य नेण्यास सांगितलं. त्यावेळी कॅमेर्‍याचं साहित्य म्हणजे मायक्रोओवनइतका मोठा कॅमेरा, त्याकरिता मोठा टायपॉड, फोटो काढण्यापूर्वी रसायन प्लेटवर पसरविण्याकरिता एक तंबू. त्याचबरोबर केमिकल्स, ग्लास टँक, पलेट पकडण्याकरिता जड पलेट होल्डर, पाण्याची बादली वगैरे वस्तू घोड्याच्या पाठीवर टाकून वाहून नेण्याइतक्या असत. ओल्या पलेटवर ही चित्रं टिपावी लागत. एवढं करून जॉर्ज इस्टमन सान्टो डोमिंगोला जाऊ शकला नाही, पण या तयारीमुळे जगाला फोटोग्राफी क्षेत्रातला एक हरहुन्नरी क्रांतिकारक मिळाला. इस्टमनमध्ये फोटोग्राफीची कमालीची आवड निर्माण झाली. त्यानं फोटोग्राफीत स्वत:ला संपूर्ण झोकून दिलं. फोटो टिपण्याची गुंतागुंतीची पद्धत सोपी करण्याच्या पाठीमागे तो लागला. ओल्या पलेटच्या पद्धतीत पलेट सुकण्याअगोदरच फोटो काढावा लागे. एका ब्रिटिश मासिकात त्यानं वाचलं होतं की, पलेटवर थर टाकण्याचं इमल्शन आपल्याला स्वत:लाच तयार करता येतं. ते पलेटवर टाकून सुकल्यानंतरही त्याची प्रकाशाची संवेदना राहते. त्या मासिकातील फॉर्म्युल्याप्रमाणं तो इमल्शन तयार करू लागला. दिवसभर बँकेत काम केल्यानंतर रात्री आईच्या स्वयंपाकघरात तो प्रयोग करीत राहिला. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार कित्येक वेळा हे प्रयोग करताना इतका दमून जात असे की, घातलेल्या कपड्यांनिशी जमिनीवर ब्लँकेट टाकून झोपत असे.


तीन वर्षांच्या सतत प्रयत्नांनी १८८० साली इस्टमननं स्वत:चा फॉर्म्युला तयार केला. डायपलेट फॉर्म्युल्यानंतर त्यानं अशा पलेट बनविण्याचं मशीन तयार करून पेटंट मिळविलं. रॉचेस्टर येथील स्ट्रीट बिल्डिंगवर तिसर्‍या मजल्यावर त्यानं पलेट विकण्याचं ऑफिस काढलं. तेथून तो पलेटस् विकायला लागला. इस्टमन विचार करू लागला की, काचेच्या पलेटपेक्षा पेपरासारख्या जर हलक्या व लवचिक माध्यमावर हे इमल्शन ठेवलं तर ते जास्त सोयिस्कर होईल. पेपर हा जरी सोयिस्कर असला तरी ते योग्य माध्यम नव्हतं. कारण पेपरावरचे ग्रेन्स दिसणं हे प्रतिमेला त्रासदायक होतं. १८८५ साली संवेदनशील फिल्म वापरण्याची व आपल्याकडं मिळण्याची जाहिरात त्यानं प्रसिद्ध करून टाकली. या पद्धतीत प्रथम विरघळणारं जिलेटिन पेपरवर घेऊन नंतर ते न विरघळणार्‍या संवेदनशील जिलेटिनवर ठेवायचं आणि एक्सपोझर दिल्यानंतर व जिलेटिनवर प्रतिमा उमटल्यानंतर पेपरच काढून घ्यायचा. अशा तर्‍हेनं लवचिक, पण घट्ट पृष्ठभागावर प्रतिमा दिसू लागली, पण ओल्या पलेट वापरायची सवय असलेल्यांना त्यानं काढलेल्या रोलफिल्मचे आकर्षण त्यावेळी वाटलं नाही. लोकांना खेचण्याकरिता त्यानं स्वत:चा कॅमेरा काढायचं ठरविलं. १८८८साली त्यानं जगात पहिला रोलफिल्म कॅमेरा बाहेर काढला. या कॅमेर्‍याला नाव देण्याकरिता दोन गोष्टी त्याने मनाशी धरल्या होत्या. कॅमेर्‍याचं नाव क अक्षरानं सुरू होणारं व त्याच अक्षरानं संपणारं हवं. शिवाय ते उच्चारायला सोपं हवं आणि मग कोडॅक कॅमेराचा जन्म झाला. हा जगातला विक्रीला आलेला पहिला कॅमेरा आणि त्याचा मानकरी ठरला तो जॉर्ज इस्टमन. १८९२ साली इस्टमन फोटोग्राफी कंपनीचं अगोदरचं नाव आता इस्टमन कोडॅक कंपनी असं झालं. स्वत: इस्टमन कॅमेर्‍याच्या जाहिरातीचे मसुदे तयार करीत असे. कोडॅक कॅमेर्‍याच्या जाहिरातीचं घोषवाक्य त्यानं तयार केलं होतं. you press the button, we do the rest’’ अल्पावधीत या जाहिराती जगभर पसरल्या व शंभर फोटो टिपणारा रोल संपल्यानंतर लोक त्यावर रासायनिक क्रिया करून प्रिंट घेण्यास रॉचेस्टरला कोडॅक कंपनीत आणून देत व पुन्हा शंभर फोटो टिपणारा रोल भरून घेत. पेपर निगेटिव्हवर प्रतिमा चांगली स्पष्ट येत नसल्यानं त्यानं इमल्शनचा पातळ थर दिलेली पारदर्शक फिल्म तयार केली. Eastman Dry Plate and Film Company  काढून तो ही फिल्म विकू लागला. कोडॅकचं नाव जगात पसरलं. लंडनला मोठमोठे बॅनर्स लागले. वर्तमानपत्रं, मासिकं, डिस्पले बोर्ड, पत्रकं वगैरेनं जगात जिथे तिथे कोडॅक कॅमेर्‍याच्या जाहिराती पोचल्या.


इस्टमननं मग मागे वळून पाहिलंच नाही. फोटोग्राफीचे कॅमेरे, फिल्म, रसायने व तत्सम साहित्य करण्यात त्याने स्वत:ला झोकून दिलं. अनेक तर्‍हेचे कॅमेरे त्याने लोकांसमोर आणले. सर्वसामान्य लोकांना वापरता येणारा व पुढे अतिशय लोकप्रिय झालेला ब्राऊनीकॅमेरा, फोल्डिंग कोडॅक कॅमेरा, पॉकेट कोडॅक कॅमेरा, होम मूव्ही कॅमेरा, सिने-कोडॅक मोशन पिक्चर कॅमेरा, एक्स-रे फिल्म व त्याकरिता लागणारा कॅमेरा, जागतिक युद्धात वापरता येणारा एरियल फोटोग्राफी करणारा कॅमेरा, खगोलशास्त्रात अंतराळात निरीक्षण करणारा कॅमेरा असे अनेक तर्‍हेचे कॅमेरे कोडॅक कंपनीनं बाजारात आणले. जगाच्या कानाकोपर्‍यात कोडॅक कंपनीचं नाव गेलं. कंपनीनं भरपूर पैसा मिळविला व अमेरिकेतल्या श्रीमंत व्यक्तींच्या पंक्तीत इस्टमनचं नाव गेलं.
पहिल्यापासूनच तो परोपकारी वृत्तीचा होता. १९१९ साली कंपनीचा आपल्या उत्पन्नातला एक तृतीयांश हिस्सा म्हणजे दहा कोटी डॉलर्स कामगारांना वाटले. तो लोकोपकारी म्हणूनच ओळखला जाई. अगदी सुरुवातीला त्याचा पगार केवळ ६० डॉलर्स होता तेव्हा तो त्यातले ५० डॉलर्स रॉचेस्टर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या मेकॅनिक्सच्या विद्यार्थ्यांना देत असे. इस्टमननं फोटोग्राफी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करण्यात आपला जीव ओतला आणि एवढा पैसा मिळविला की, अमेरिकेच्या श्रीमंत लोकांत त्याचं नाव गेलं. सर्वात मजेची गोष्ट म्हणजे तो स्वत:ला फोटोग्राफी क्षेत्रातला छांदिष्ट म्हणवून घेत असे. फोटोग्राफी क्षेत्रातला गडगंज संपत्ती मिळविलेला हा गृहस्थ स्वतला हौशी फोटोग्राफरच समजायचा. त्याच्या दृष्टीने जो केवळ प्रेमाने, श्रद्धेनं एखाद्या गोष्टीत जीव ओततो तो ऍम्युचरच राहतो. मग त्याने कितीही पैसा मिळविला तरीही. केवळ पैसे मिळविण्याकरिता जो आयुष्यभर धडपडत असतो तो व्यावसायिक होतो. इस्टमननं जे काही केलं ते फोटोग्राफीच्या प्रेमाखातर. पैसा मिळणं ही गोष्ट दुय्यम आहे. तो मेहनतीने आपोआपच मिळतो. सर्वसाधारण लोकांना त्याचा एक सल्ला असे की, तुम्ही जी नोकरी करता किंवा व्यवसाय करता तेव्हा लोकांना तुम्ही काय करीत आहात हे दाखविता, पण तुम्ही एखादा छंद बाळगून त्यात जीव ओतता व काम करता तेव्हा तुम्ही काय आहात हे लोकांना दाखविता आणि मग त्या नावाने लोक तुम्हाला ओळखतात. आज आपल्याकडे दोनचार वर्षे काम करणार्‍या कलावंतांना आपण ऍम्युचर आहोत हे बोलायला लाज वाटते व स्वत:ला व्यावसायिक म्हणवून घेण्यात धन्यता वाटते. त्यानी अमेरिकेच्या जॉर्ज इस्टमन या स्वत:ला ऍम्युचर म्हणवून घेणार्‍या श्रीमंत माणसाचा संदेश अंगी बाळगावा आणि आयुष्यात बरंच काही करण्याची मनीषा ठेवावी. इस्टमनला चांगली पेंटिग्स संग्रही ठेवण्याचा नाद होता व त्याचं घर म्हणजे अप्रतिम पेंटिग्सचा अनमोल साठा होता. तो म्हणायचा ज्या पेंटिंगद्वारे माझ्या घरात मी जगू शकेन अशाच पेंटिंग्स मी संग्रही ठेवतो.


जॉर्ज इस्टमन शेवटपर्यंत अविवाहितच राहिला. जे काही मिळविलं ते दुसर्‍यांना देण्याकरिताच मिळविलं. जॉर्ज इस्टमनने वयाच्या ७७ वर्षी १४ मार्च १९३२ साली आपल्या काही खास मित्रांना आपल्या बंगल्यावर बोलावलं. आपल्या संपत्तीचा मृत्युपत्रातला बहुतांशी हिस्सा रॉचेस्टर युनिव्हर्सिटीला त्यांच्या समक्ष देणगी दिला. कागदपत्रांवर सही करून तो वरच्या मजल्यावरील आपल्या खोलीत गेला व पिस्तुलाने आपल्या छातीत गोळी मारून घेतली. एकच वाक्य लिहिलेली चिठ्ठी मागे ठेवली. ‘‘My work is done. Why wait?’’ (मला जे काही करता येणं शक्य झालं ते मी केलं. आता मी कशाला थांबू?)अशा तर्‍हेनं फोटोग्राफी क्षेत्रातल्या उद्योग जगतात प्रथम कॅमेरा आणणार्‍या या अफलातून व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला, पण कोडॅक व इस्टमन ही नावं मात्र फोटोग्राफी क्षेत्रात अजरामर झाली. जॉर्ज इस्टमनचं अमेरिकेतलं घर आज International Museum of Photography and Film ओळखलं जात आहे व त्याला राष्ट्रीय पातळीवरचा दर्जा दिला गेला आहे.

01 August 2013

सोळावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची'

नमस्कार!
मित्रांनो बॉर्न टू विन च्या परिवारास, आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या सर्वांच्या शुभेच्छांनी हे वर्ष अगदी दणक्यात सुरु झालं. खूप आनंदाचे क्षण आपण सर्वांनी मिळून या वर्षी अनुभवले. वर्षाच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत तुमच्या समवेत हा आनंद आपण साजरा करीत आहोत. 
या वर्षी प्रथमच १४ वा आणि १५ वा लक्ष्यसिद्धी सोहळा यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुल, माटुंगा (प.) येथे पार पडला. आपल्या त्रैमासिकाच्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या. १९ मे २०१३ रोजी लक्ष्यवेध Advance ची ५ वी बॅच दणक्यात सुरु झाली. तसेच २६  मे २०१३ रोजी  आपल्या सर्वांचा लाडका विषय म्हणजेच ‘फ्युचर पाठशाला जोश २०१३’ हा कार्यक्रम षण्मुखानंद या सभागृहात २७०० मंडळींच्या उपस्थितीत धूम-धडाक्यात पार पडला. त्याच दिवशी माझा मोटिव्हेटर मित्र या पुस्तकाची तिसरी आवृत्ती व याच पुस्तकाची इंग्रजीची पहिली आवृती, My Motivator Mitra याचे प्रकाशन श्री मधुकर तळवळकर सर,  (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd.). यांच्या हस्ते झाले. १४ जून २०१३ रोजी लक्ष्यवेध Advance च्या तिसऱ्या  बॅचचा पदवीदान सोहळा श्री. वाय. एम. देवस्थळी, चेअरमन, L & T. यांच्या उपस्थितीत पार पडला. 
आपणा  सर्वांच्या आग्रहास्तव आपण दुसर्‍यांदा वीर सावरकर सभागृह येथे ३ जुलै २०१३ रोजी ‘सुसज्ज व्हा, यशस्वी व्हा’ ही कार्यशाळा घेतली. व आपल्या  हाउसफुल प्रतिसादात ती यशस्वीपणे पार पडली. आणि सर्वात जास्त आनंदाची गोष्ट जी बॉर्न टू विन च्या परिवारात झाली  ती म्हणजे २८ जुलै २०१३ रोजी आपण आपल्या नवीन ऑफीस मध्ये आलो. 
तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने व शुभेच्छामुळेच हे सगळ शक्य होऊ शकलं. यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. 
सध्या लक्ष्यवेधची १६ वी  बॅच शेवटच्या टप्प्यात आहे व ११ ऑगस्ट २०१३ ला यशस्वीपणे पूर्ण होत आहे. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची  कामगिरी जबरदस्त सुरु आहे. आता सर्वांना ओढ लागलीय ती १६ व्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची. मित्रांनो आपला आगामी लक्ष्यसिद्धी सोहळा पार पडणार आहे १३ ऑगस्ट २०१३ रोजी, प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, दादर (पू.) येथे संध्याकाळी ६ वाजता. 
मित्रांनो नेहमीप्रमाणेच  या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख आकर्षण असणार आहेत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक! लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातला मैलाचा दगड म्हणजे या वेळी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे! ते म्हणजे श्री. प्रदीप लोखंडे, Founder, Rural Relations. 
'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची' या विषयावर सरांची खास मुलाखत  बॉर्न टू विन चे संचालक व संस्थापक श्री. अतुल राजोळी हे घेणार आहेत. १५ वर्षांपूर्वी सुरु केलेल्या त्यांच्या ग्रामीण भारतासाठीच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त करण्यापर्यंतचा प्रवास ते या मुलाखतीतून उलगडणार आहेत.   

श्री. प्रदीप लोखंडे सर व त्यांच्या कार्याविषयी थोडेसे:
श्री. प्रदीप लोखंडे सर हे रुरल रिलेशन या संस्थेचे संस्थापक आहेत. ग्रामीण भारताच्या प्रगतीसाठी योगदान करणे या ध्यासाने १५ वर्षांपूर्वी सरांनी सुरुवात केली. आज भारतामध्ये १० पैकी ७ माणसे हि गावामध्ये वसलेली आहेत. आत्तापर्यंत संपूर्ण भारतातील ५०००० खेड्यांचा त्यांनी अभ्यास केला आहे. व ४००० गावांना त्यांनी स्वतः भेट दिली आहे. तसेच तेथील कार्यपद्धत त्यांनी समजून घेतली आणि अमुल्य असं योगदान  त्यांनी खेड्यांना दिलं. 
रुरल रिलेशन हि संस्था भारतातील सर्वात मोठी संस्था आहे. हि संस्था ९ राज्यांमध्ये विस्तारलेली आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये रुरल रिलेशन या संस्थेच अस्तित्व आहे. रिलायंस मनी, एच. एल. एल., टेल्को, टाटा  टी., एच. पी., एशियन पेंट अशा मोठ-मोठ्या कंपन्या आता व्हिलेज डेवेलोपर्स या उपक्रमांच्या माध्यमातून रुरल रिलेशनचे संस्थापकीय भागीदार बनले आहेत. Social  Entrepreneurship, Rural Marketing, Future of  Rural India या विषयांवर सरांकडून आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.

अशा या स्फुर्तीदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा…

सोळावा लक्ष्यसिध्दी सोहळा
विषय: 'रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची' 
दिनांक: १३ ऑगस्ट २०१३
वेळः संध्याकाळी ठिक ६ वाजता
स्थळः प्रा. बी. एन. वैद्य सभागृह, किंग जॉर्ज शाळेसमोर,  दादर (पू.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९


Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites