LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

23 February 2012

सिस्टम महत्वाची हे ठसवणारी मुलाखत

बॉर्न२विन ही उद्योजकांना, व्यावसायिकांना व सर्वसामान्यांना प्रशिक्षण देणारी, मुंबईतील एक आघाडीची संस्था आहे. उद्योग-व्यवसायात प्रगती साध्य करणे, तसेच व्यक्तीमत्व विकास साधणे यासाठी ही संस्था प्रशिक्षण देते. लक्ष्यवेध हा त्यांचा प्रशिक्षण कोर्स यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या सहभागी व्यक्तींसाठी संस्था लक्ष्यसिध्दी सोहळा ह्या खास कार्यक्रमाचे नेहमी आयोजन करत असते. यात मान्यवर उद्योजकांना बोलावून त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सन्मानपत्र देण्यात येते. त्याचबरोबर बॉर्न२विनचे तरूण, धडाडीचे संचालक अतुल राजोळी या मान्यवर उद्योजकांची मुलाखत घेतात. त्यातून उपस्थितांना खूप मार्गदर्शन मिळते. उद्योगातील काही महत्वाची सुत्रे हाती गवसतात. आतापर्यंत या सोहळ्यात कॉर्पोरेट लॉयर नितीन पोतदार, एल अॅन्ड टीचे सीएफओ वाय.एम.देवस्थळी, दास ऑफशोअरचे अशोक खाडे, निर्माण रीअलटर्स ग्रुपचे अजित मराठे व राजेंद्र सावंत असे अनेक नामवंत या कार्यक्रमात आले होते. नुकत्याच २१/२/१२ला झालेल्या लक्ष्यवेध सोहळ्यात त्यांनी मुंबईचे डबेवाले या नावाने प्रसिध्द, त्यांचे प्रतिनिधित्व करणारे श्री रघुनाथ मेदगे व श्री गंगाराम तळेकर या दोन मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. 
बॉर्न२विन संस्थेच्या बॉर्न२विनचे प्रमुख अतुल राजोळी यांनी दोघांची मुलाखत घेतली. तिचा हा वृत्तांत:

बॉर्न२विन ही उद्योजकांना प्रशिक्षण देणारी संस्था. मग त्यांच्या कार्यक्रमात डबेवाल्यांना का बोलवायचे? ती तर सेवाभावी वृत्तीने काम करणारी, थोडक्यात संतोष मानणारी वारकरी पंथाची मंडळी अशी कोणाला शंका येऊ शकेल. पण त्यांना बोलावण्यामागे फार महत्वाचे कारण होते, त्यांच्या जगप्रसिध्द – होय- फोर्बसने नावाजलेल्या त्यांच्या सिस्टमविषयी जाणून घेणे. डबेवाले रोज २ लाख डबे लोकांच्या घरातून त्यांच्या कार्यालयात पोचवतात. ह्या कामात चुका होण्यास भरपूर वाव आहे, पण डबेवाल्यांचे चुकांचा रेशिओ आहे, १ कोटी ६० लाख डिलिव्हरीमध्ये फक्त १ चुक. त्यामुळेच त्यांना सिक्स सिग्मा हे मानांकन देण्यात आलेले आहे. जनरल मोटर्स, जीई यांच्याबरोबरीने त्यांना हे मानाचे स्थान मिळाले ते अक्षरश: मेहनतीच्या जोरावर तितकेच एका विचारपूर्वक आखलेल्या अभेद्य सिस्टमच्या जोरावर. मॅनेजमेंट-व्यवस्थापनाची तत्वे याबाबत आता लोकांना खूप माहिती आहे. अनेकजण एमबीए करतात. पण डबेवाल्यांचा व्यवसाय सुरू झाला १८९० साली. मुख्यत: ते अशिक्षित-अर्धशिक्षित. त्यांनी ही आधुनिक व्यवस्थापनाची तत्वे अनुस्यूत असलेली सिस्टम अमलात आणण्याचा त्याकाळी विचार करावा, ती इतकी वर्षे यशस्वीपणे राबवून दाखवावी हे खरेच जागतिक आश्चर्य आहे. म्हणूनच जगभरातून त्यांचे कौतूक होते. ह्या सिस्टमध्ये ते प्रत्येक डब्यावर कोडींग करतात. ह्या कोडींगसाठी खूणा, अक्षर, याबरोबरच त्यांनी त्याला रंगाची जोड दिली. यामुळे डबेवाल्यांसाठी ती सोपी झाली. तसेच चुक होण्यास वाव राहिला नाही. 


यशस्वी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी लक्ष्यसिध्दी पुरस्कार स्विकारताना

मुंबईत सुमारे १२० वर्षांपूर्वी व्हीटी स्टेशन बांधण्यास सुरवात झाली. त्या कामाकरिता खूप मोठ्या संख्येने लोक तिथे येत. त्यावेळेस हॉटेल, कॅंटीन अशा जागोजाग सोयी नव्हत्या. लोकांना घरून डबे पोचवावेत अशी कल्पना सुचली आणि डबेवाला संस्थेचा जन्म झाला. पुढे १९५६साली त्याची संस्था म्हणून नोंदणी झाली. आज या डबेवाल्यांची तिसरी पिढी ह्या कामात आहे. आजचा या कामाचा व्याप बघितला तर रोज २ लाख डबे पोचवले जातात व परत घरी आणून दिले जातात. ५००० डबेवाले रोज ७० किमीचा प्रवास करून हे काम करतात. सेंट्रल व वेस्टर्न व आता नवी मुंबई तिन्ही रेल्वे लाईनवर ते कार्यरत आहेत व ७० स्टेशन ते कव्हर करतात. डबेवाले इयत्ता पाचवी ते सातवी शिकलेले आहेत. एका डबा बास्केटचे वजन सुमारे ६५ किलो असते. इतका मोठा व्याप असूनही यात कोठेही पेपरवर्क नाही आणि २ लाख डबे न चुकता योग्य ठिकाणी पोचवले जातात. वह्या व्यवसायाचे सर्वात वेगळेपण म्हणजे हे डबेवाले त्यात भागीदार आहेत. केवळ पैसे देऊन कामावर ठेवलेले ओझ्याचे हमाल नाहीत. १९८० पासून मालक-नोकर पद्धत बंद करून त्यांनी डबेवाल्यांना भागीदारी दिली. २००८मध्ये जगभर अर्थव्यवस्था कोसळली हे आपल्याला माहीत आहे. भांडवलशाही व्यवस्थेत दोष आहे का यावर विचारमंथन सुरू झाले. आधी पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या बाबतीत शेअरहोल्डर्सचा फायदा, त्यांचेच हित याला सर्वोच्च प्राधान्य होते. आता स्टेकहोल्डर असा शब्द वापरला जातो. म्हणजे यात कंपनीचे कर्मचारी, ग्राहक, समाज सगळ्यांच्या हिताचा विचार झाला पाहिजे हे तत्व आहे. डबेवाल्यांनी ते चक्क १९८०पासून अमलात आणले आहे. ग्राहकहिताला तर त्यांनी नेहमीच सर्वोच्च प्राधान्य दिले.

नवा माणूस जेव्हा त्यांच्याकडे कामाल येतो तेव्हा त्याला सहा महिने प्रशिक्षण दिले जाते, तेही स्टायपेंड देऊन. माणूसही ते अगदी पारखून घेतात. सुदृढ असेल बघतात. त्याला हिंदी बोलता येते हे बघतात. 


कामावर असताना कडक नियमांचे पालन त्यांना करावे लागते. टोपी नसेल तर दंड, विनापरवानगी गैरहजर राहता येणार नाही असे नियम कसोशिने पाळले जातात. मिटींगसुध्दा काकामच्या वेळेनंतरच होतात. नाहीतर सामान्य माणसाचा अनुभव असतो, तो सरकारी कार्यालयात कामासाठी गेला, त्याला सांगण्यात येते, साहेब मिटींगला गेले आहेत! टोपीमुळे त्यांना एक आयडेंटिटी मिळते, त्याचबरोबर खच्चून भरलेल्या रेल्वे स्टेशनमध्ये ते एकमेकांच्या पटकन नजरेस पडतात हाही फायदा आहे. 

दत्ता सामंतांच्या संपानंतर गिरण्या बंद पडल्या, त्यावेलेस १००-२०० डबेवाल्यांचे काम कमी झाले. पण याच मिलच्या जागेवर मॉल आले, तिथे ऑफिसेस आली आणि पुन्हा डबे सुरू झाले. २६जूलैच्या पुरानंतर दुसर्‍या दिवशी त्यांनी पुन्हा डबे पोचवणे सुरू केले. 


'मुंबईचा अन्नदाता' मुलाखत रंगात आली असताना...

आपल्या भारतीयांचे वैशिष्ट्य आहे, परदेशी माणसांनी कौतुक केल्यावर आपण त्याची दखल घेतो. डबेवाल्यांच्याबाबतीतही तेच झाले. ४/११/२००३ला कार्तिकी एकादशीला प्रिन्स चार्ल्सनी डबेवाल्यांची चर्चगेट स्टेशनच्याबाहेर भेट घेतली त्यानंतर देशात त्यांना प्रसिध्दी मिळाली. यात प्रिन्स चार्ल्स यांचे कौतुक करावे तसेच डबेवाल्यांचेही कौतुक करायला पाहिजे. जेव्हा प्रिन्स चार्ल्सनी त्यांना भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली तेव्हा हॉटेलमध्ये भेटायला जाण्यास नकार देऊन त्यांनी चर्चगेट स्टेशनवर भेट घेतली. सकाळी ११.२० ते ११.४० ही ऐन कामाची वेळ, त्यात खोटी व्हायला नको, ही कर्तव्याची भावना त्यांच्या मनात होती. पण सार्वजनिक भेट झाल्याने त्यांना त्या प्रसिध्दीचा लाभ मिळाला. आता बीबीसी, नॅशनल जिओग्राफिकने त्यांच्यावर लघुपट बनवले. दिल्ली, अहमदाबादच्या आयआयएमच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर रिसर्च केला. सप्लाय चेन मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट हे व्यवसायात कसे वापरले जाते ते बघितले. 

२६ जानेवारी २०१०ला दिल्लीतील चित्ररथात डबेवाल्यांचे दृश्य होते, त्याला प्रथम क्रमांचे पारितोषक मिळाले. 

मुलाखतीआधी बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी लिडर, नेता कोणाला म्हणावे याविषयी विचारमंथन केले. ते म्हणाले, नेता तो असतो, ज्याला आपले पॅशन-आपला ध्यास काय आहे ते ओळखता येते. मग तो ध्येनिश्चिती करतो. हे ध्येय साध्य करण्यासाठीचा त्याचा प्रवास हा आनंदाचा असतो. त्यात तो स्वत: शिकतो, त्याचा विकास होतो, कुटुंबाचाही विकास होतो, त्याचा समाज, उद्योग, देश असा सगळ्यांवर प्रभाव होतो व त्यांचाही विकास होतो. लिडर-नेता हा जन्माला यावा लागतो ही चुकीची समजूत आहे तर तो घडवता येतो, किंबहूना त्याच्या कृतीतून तो घडत जातो. 

डबेवाल्यांचे प्रतिनिधी गंगाराम तळेकरही त्यांच्या मुलाखतीच्या शेवटी म्हणाले की माणसाला प्रेरणा देण्याचे वर्ग कुठे नसतात, अशी माझी समजूत होती. पण बॉर्न२विनच्या सहभागींचा जोश बघून त्यांनी आपल्या विचारात खुलेपणाने बदल केला. ते म्हणाले, इथे येऊन खरोखरच माणसाला प्रेरणा मिळते, हे बघायला मिळाले. डबेवाले म्हणजे केवळ भावनिक अंगाने मुलाखत न घेता, त्यांच्या सिस्टमचे रहस्य जाणून घेणारा, तसेच त्यांनाही नवीन दृष्टी देणारा हा एक उपयुक्त कार्यक्रम झाला.


उदय कुलकर्णी ९८६९६ ७२६९६ 

13 February 2012

दहावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'मुंबईचा अन्नदाता'

नमस्कार!

मित्रांनो THE BUSINESS BLUEPRINT सेमिनार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी अगदी दणक्यात पार पडला. येत्या ४ मार्च पासुन लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची आगामी बॅच सुरु होत आहे; व दहावी बॅच आता आपल्या शेवटच्या आठवड्यात येउन ठेपली आहे.
मित्रांनो, लक्ष्यवेधच्या दहाव्या बॅच बद्दल सांगायचं झालं, तर ह्या बॅचचा प्रचंड उत्साह व यशस्वी होण्याची भुक बॉर्न टु विनला प्रेरणा देणारी ठरली. संपुर्ण प्रशिक्षणक्रमाच्या दरम्यान सर्व प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी खुप छान झाली. सर्व प्रशिक्षणार्थी आता त्यांच्या दुरगामी ध्येयाच्या दिशेने पेटुन उठलेले आहेत. आम्हाला खात्री आहे की हे सर्व प्रशिक्षणार्थी आपली ध्येयपुर्ती केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत.


मित्रांनो, नेहमीप्रमाणेच लक्ष्यवेधींना आता वेध लागले आहेत ते आगामी म्हणजेच दहाव्या लक्ष्यसिध्दी सोहळ्याचे!

मित्रांनो, लक्ष्यसिध्दी सोहळा म्हणजेच दर अडिच महिन्याला साजरा होणारा यशाचा महोत्सव व तो आपण सगळे मिळुन एकत्र साजरा करतो. लक्ष्यसिध्दी सोहळ्याची सर्व लक्ष्यवेधी (आजी माजी लक्ष्यवेध प्रशिक्षणार्थी) अगदी आवर्जुन वाट पाहत असतात. यंदाचा लक्ष्यसिध्दी सोहळा पार पडणार आहे दिनांक २१ फेब्रुवारी २०१२ रोजी संध्याकाळी ६:३० वाजता, शिवाजी पार्क, दादर येथील वीर सावरकर सभागृहामध्ये!
आपल्याला उत्सुकता असेल की यावेळेचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक कोण असतील? मित्रांनो, आपणास सांगायला अत्यंत आनंद होत आहे की यावेळेचे आपले प्रमुख पाहुणे असणार आहेत, 'मुंबईचे डबेवाले!' हो मित्रांनो! अंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती प्राप्त असलेले, दर दिवशी लाखो मुंबईकरांना दुपारच्या वेळेचे घरचे जेवण प्राप्त करुन देणारे, प्रबळ व्यवस्थापन यंत्रणा निर्माण करुन आश्चर्यकारकपणे व्यवहार करणारे, गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदवणारे, प्रख्यात मॅनेजमेंट गुरु 'मुंबईचे डबेवाले' यांची LIVE मुलाखत घेणार आहेत बॉर्न टु विनचे संचालक अतुल राजोळी. मुलाखतीच्या कार्यक्रमाचे नाव असणार आहे 'मुंबईचा अन्नदाता'. श्री. मेदगे व श्री. तळेकर उपस्थित प्रेक्षकांना त्यांच्या मुलाखतीद्वारे मार्गदर्शन करतील. या कार्यक्रमामध्ये आपल्याला मुंबईच्या डबेवाल्यांचे अदभुत मॅनेजमेंट तंत्र त्यांच्या मनोरंजक व साध्या शैलीमध्ये जाणुन घेता येईल. मित्रांनो, माझ्यामते आपल्या कुटूंबामधील लहानांपासुन मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने हा कार्यक्रम आवर्जुन पहावा असा असणार आहे.

तर मग विसरु नका आणि नक्की या...

मुंबईच्या डबेवाल्यांबद्दल थोडेसे:

सुरुवात: १८९० साली
सरासरी शिक्षण: ८वी पास
एकुण कर्मचारी: ५०००
एकुण डब्ब्यांची संख्या: २,००,००० डब्बे = ४,००,००० व्यवहार
एकुण वेळ = ३ तास (सकाळी ९ ते दुपारी १२)
चुकांचं प्रमाणः दिड करोड व्यवहारांमध्ये एक चुक
एकुण अंतरः ६० - ७० कि. मी.
उल्लेखनिय प्राप्ती
  • सिक्स सिगमा
  • गिनीज बुक ऑफ वल्ड रेकॉर्डस
  • ISO 9001 - 2000 सर्टिफिकेट
दहावा लक्ष्यसिध्दी सोहळा:
विषय: मुंबईचा अन्नदाता
दिनांक: २१ फेब्रुवारी २०१२
स्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर(प.)
प्रवेश विनामुल्य
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९

09 February 2012

आपल्या उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी - THE BUSINESS BLUEPRINT

बॉर्न टू विन ने आपल्या कारकिर्दीच्या पाचव्या वर्षात पदार्पण केले आहे. गेल्या चार वर्षातील बॉर्न टू विनचा प्रवास व प्रगती आपण सर्वांनीच पाहीलेली आहे. आपल्या सदीच्छांमुळेच आम्ही आजपर्यंत जी काही थोडीफार प्रगती केली आहे ती करू शकलो आहोत व आपले स्नेह व सहकार्य आम्हास नेहमी लाभेल अशी आशा आम्ही बाळगतो.
 
मित्रांनो, गेल्या चार वर्षांमध्ये बॉर्न टू विनच्या लक्ष्यवेध या प्रशिक्षणक्रमामध्ये महाराष्ट्रीय उद्योजकांचा सहभाग जास्त प्रमाणात होता व लक्ष्यवेधला महाराष्ट्रीय उद्योजकांमध्ये आपली विश्वसनियता निर्माण करण्यात नक्कीच यश मिळाले आहे. महाराष्ट्रीय उद्योजकांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न, त्यांच्या समजुती व त्यांना सततचे हवे असणारे मार्गदर्शन या गोष्टींना लक्षात घेता, बॉर्न टू विन ने गेल्या वर्षापासुन लक्ष्यवेध ADVANCE हा उद्योजकता विकास प्रशिक्षणक्रम सुरु केला व त्याला प्रचंड प्रतिसादही लाभत आहे. याच कार्यक्रमावर आधारीत बॉर्न टू विनने येत्या १२ फेब्रुवारी रोजी एक सेमिनार केला आयोजित आहे, जो महाराष्ट्रीय उद्योजकांसाठी अतिशय प्रेरणादायी व मार्गदर्शक असेल. या कार्यक्रमाचे नाव आहे THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR. या कार्यक्रमाच्या मदतीने उद्योजकाला आपला उद्योग, यशस्वी व्यवसायात रुपांतर करण्याबाबतचे मार्गदर्शन लाभेल.
 
या प्रभावशाली कार्यक्रमामध्ये आपणास खालिल गोष्टींचे स्पष्टीकरण होईल:-
  • का बहूतांश व्यवसाय यशस्वी होत नाहीत व त्या बाबतीत काय केले पाहीजे?
  • यशस्वी उद्योजक काय असे जाणतो जे अयशस्वी उद्योजकाला माहीत नसते?
  • सर्वसामान्य उद्योजक असामान्य यश कसे मिळवू शकतो?
  • प्रत्येक यशस्वी उद्योजकाकडे कोणते स्वातंत्र्य असणे गरजेचे आहे?
  • व्यावसायिक दृष्टीकोन म्हणजे काय?
  • सर्वसाधारण उद्योजकाची सर्वात मोठी गैरसमजुत कोणती असते?
  • उत्कृष्ट व्यवसाय उभारण्यासाठी व्यवसायाला कोणत्या टप्प्यांमधुन जावे लागते?
  • लक्ष्यवेध ADVANCE प्रशिक्षणक्रमाद्वारे आपण आपला व व्यवसायाचा विकास कश्याप्रकारे करु शकता?
 
THE BUSINESS BLUEPRINT SEMINAR
  
वक्ते: अतुल राजोळी

दिनांक: १२ फेब्रुवारी २०१२
 
वेळः सायंकाळी ठिक ६ वाजता
 
स्थळः हॉल ऑफ कल्चर, नेहरु सेंटर, डॉ. अ‍ॅनी बेझंट रोड, वरळी
 
गुंतवणुकः रुपये ५००/- फक्त
 
संपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९
 
 

31 January 2012

सोशल नेटवर्कींग - एक आगळी वेगळी क्रांती

जगातील ५०% पेक्षा अधिक लोकांचे सरासरी वय तीस वर्षांहुन कमी आहे आणि त्यापैकी ९६% लोकांनी एकातरी सोशल नेटवर्कवर नोंदणी केली आहे.

युनायटेड स्टेट्स मध्ये दर आठवड्याच्या ऑनलाईन ट्रॅफीकचा अभ्यास केल्यावर असे लक्शात येते की गुगल वापरणार्‍यांपेक्षा फेसबुक वापरणार्‍या नेटीझन्सची संख्या जास्त आहे.

पुर्वी इंटरनेटचा सर्वाधिक वापर सेक्सविषयक वेबसाईट्स (Porn) पाहण्यासाठी केला जात असे मात्र सोशल नेटवर्कींगने त्यावरही मात केली आहे.

i-phone साठी बनविलेल्या अप्लिकेशन्सची संख्या केवळ नऊ महिन्यांच्या कालावधितच १ अब्ज इतकी झाली आहे.

गेल्या वर्षी फेसबुक वापरणार्‍यांच्या संख्येत २०० दशलक्ष वापरकर्त्यांची भर पडली. फेसबुक हा जर एक देश असता आणि फेसबुक वापरकर्ते हे त्या देशाचे नागरीक आहेत असे गृहीत धरले तर फेसबुक हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश झाला असता. म्हणजे फक्त भारत आणि चीन पेक्षा मागे आणि युनायटेड स्टेट्सच्याही पुढे.

जगभरातील ८०% कंपन्या भरतीसाठी (Recruitment) सोशल मिडियाचा वापर करतात आणि त्यापैकी ९५% कंपन्या यासाठी linkedIn या सर्वात मोठ्या प्रोफेशनल सोशल नेटवर्कचा वापर करतात.

मोबाईल द्वारे इंटरनेट वापरापैकी (Mobile internet traffic) ५०% वापर फेसबुक अपडेट्स करण्यासाठी केला जातो. लोक कधीही व कोठुनही फेसबुक अपडेट्स करतात. जर ग्राहकाला एखाद्या उत्पादनाचा किंवा सर्वीसचा वाईट अनुभव आला तर लगेचच फेसबुक किंवा ट्वीटरवर सांगितला जातो. विचार करा कंपन्यांसाठी किती मोठे नुकसान किंवा धोका आहे.

email वापरणे हा प्रकार आता जुनाट मानला जाउ लागला आहे. नव्या पिढीला twitter, Buzz, google wave, BBM हे प्रकार जवळचे वाटतात.

गुगलच्या पाठोपाठ सर्वाधिक वापरले जाणारे सर्च इंजिन कोणते आहे माहित आहे का? ऐकुन कदाचित आश्चर्य वाटेल तुम्हाला ! युट्युब हे जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्च इंजिन आहे. तुम्ही हा लेख वाचत आहात तोपर्यंत युट्युबवर १०० तासांहुन अधिक कालावधीचे व्हीडीओज अपलोड झालेले असतील.

सुमारे २००,०००,००० ब्लॉग्ज आतापर्यंत नेटीझन्सने बनविले आहेत.

विकीपेडीया या जगातील सर्वात मोठ्या मोफत ज्ञानकोषामध्ये १५ दशलक्ष लेख आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी ७८% लेख इंग्रजेतर भाषेतील आहेत. विकीपेडीयावर प्रकाशित झालेल्या प्रत्येक लेखासाठी जर १ डॉलर तुम्हाला दिला तर एका तासात तुम्ही १५६.२३ डॉलर्स कमवाल.



जगातील २० सर्वोत्तम ब्रँड्स बद्दल सर्च केल्यानंतर मिळणार्‍या माहितीपैकी २५% माहिती वाचकांनी लिहिलेली (User generated content) असते. म्हणजेच ब्रँड्सबद्दल वाचकांची सोशल मिडीयामधील मते ही त्या ब्रँडचे यशापयश ठरवण्यात महत्त्वाची भुमिका पार पाडतात.

३४% ब्लॉगर्स त्यांनी वापरलेल्या उत्पादनांबद्दल आणि सेवांबद्दल आपली मते आपल्या ब्लॉग्जमध्ये प्रकट करतात. ७८% ग्राहक एखादे उत्पादन व सेवा विकत घेण्याआधी सोशल नेटवर्क्स्मधील त्यांच्या मित्रांचा सल्ला घेणे पसंत करतात. जाहिराती पाहुन खरेदी करणार्‍यांची संख्या केवळ १४% इतकी आहे.

जगातील २५ मोठ्या वर्तमानपत्रांपैकी २४ वर्तमानपत्रांचा खप गेल्या काही वर्षांपासुन कमी होत चालला आहे. कारण बातम्यांचा मुख्य स्त्रोत म्हणुन इंटरनेटचाच वापर केला जात आहे.

पुर्वी एखादी खरेदी करावयाची असल्यास आपण त्याबद्दल माहिती शोधायचो आता मात्र उत्पादक स्वतःच आपल्याला शोधतात. आपण कोणत्या गोष्टींबद्दल सर्च करतो, इंटरनेटवर काय वाचतो आणि किती वेळ वाचतो, कशाबद्दल चर्चा करतो, कोणत्या जाहिरातींवर क्लिक करतो, सोशल मिडीयामध्ये कशाबद्दल बोलतो या सार्‍यांचा बारकाईने अभ्यास केला जात असतो. आपल्याला दिसणार्‍या जाहिराती, ईमेल्सद्वारे येणारी जाहिरातींची पत्रके हे सारे अशाच अभ्यासाचे फलित आहे.

मित्रांनो, वरील सर्व माहिती वाचुन अचंबीत झालात ना ! मी पण असाच अचंबीत झालो होतो. मात्र इथे ही माहिती देण्याचा उद्देश फक्त काही आश्चर्यचकीत करणारी आकडेवारी देण्याचा नाही आहे. इथे मला सांगायचं आहे की इंटरनेट आता Mature झाला आहे. आणि माहिती मिळवण्याच्या, संवाद साधण्याच्या जुन्या पद्धतींमध्ये एक अमुलाग्र बदल इंटरनेट मुळे होत आहे. सोशल मिडीयाकडे केवळ एक फॅड म्हणुन जर तुम्ही पाहत असाल तर ती घोडचुक आहे हे मला सांगायचं आहे.

इमेल चेक करणे, ePaper वाचणे, सकाळी ऑनलाईन राशीभविष्य वाचणे, झालंच तर ऑनलाईन कथा, कविता किंवा साहित्य वाचणे एवढाच इंटरनेटचा उपयोग जर तुम्ही करत असाल तर तुम्ही एका मोठ्या देणगीला मुकत आहात हे लक्षात असुद्यात. अर्थात आताशा इंटरनेटचा वापर इतक्या मर्यादित स्वरुपात करणार्‍या वाचकांची संख्या जास्त नाही आहे (अशी मला आशा आहे). सोशल नेटवर्कींग, ऑर्कुट, बझ्झ, वेव्ह, ट्वीटर, फेसबुक, linkedin, Hi5 वापरणार्‍यांची संख्या वाढते आहे ही आनंदाची बाब आहे. मात्र मला माझ्या सर्व वाचकमित्रांना सांगावेसे वाटते की एक ग्राहक आणि एक विपणक (Marketing) या दृष्टीकोनातुन सोशल नेटवर्क्सकडे पहायला सुरुवात करा. एक वेगळेच जग या सोशल नेटवर्कींगच्या आड लपलेले आहे हे तुम्हाला दिसू लागेल. आणि हे जग अधिक interesting आहे हे देखिल तुमच्या लक्षात येईल.

ब्लॉग म्हणजे एक जबरद्स्त मार्केटींग टूल आहे, ट्वीटर, ऑर्कुट, फेसबुक या सर्वांचा मार्केटींगसाठी कसा उपयोग केला जातोय?, कंपन्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल नेटवर्क्सचा कसा वापर करत आहेत हे नीट अभ्यासायला सुरुवात करा. युरोपातील औद्योगीक क्रांतीनंतर जग बदलले होतं आता या सोशल नेटवर्कींग क्रांतीमध्येही जग बदलवण्याची ताकद आहे हे लक्षात घ्या. आणि जग बदलताना पाहण्यापेक्षा या बदलाचा भाग बना.

ब्लॉग्जमध्ये विविध उत्पादनांचे paid reviews लिहिले जातात, कंपनीसाठी ट्वीटींग, ब्लॉगींग करणार्‍या Social media experts ना नोकर्‍या दिल्या जात आहेत. डेल कंपनीने केवळ ट्वीटरच्या माध्यमातुन करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. ट्वीटर, फेसबुक, ऑर्कुटमधील आपल्या प्रोफाईलवरील जागा जाहिरातींसाठी विकली जात आहे. आनंद महिंद्रांसारखे प्रथितयश उद्योजक ट्वीटरद्वारे आपल्या ग्राहकांशी थेट संवाद साधत आहेत. बघा आपल्या आजुबाजुची ऑनलाईन दुनिया कशी व्यवसायात रमली आहे. आपण मात्र सोशल नेटवर्कींग एक फॅड किंवा थोडा विरंगुळा म्हणून वापरत आहोत.

मुद्दा हा की इंटरनेट म्हणजे बिझनेस, इंटरनेट म्हणजे पैसा कमावण्याचे एक प्रमुख साधन ही इंटरनेटची नविन व्याख्या आपण लवकरात लवकर आत्मसात केली पाहिजे. इंटरनेटवर चहुबाजुला व्यवसायाच्या अमर्याद संधी आहेत, डोळसपणे त्यांच्याकडे पहायला सुरुवात केली पाहिजे.

जर हा लेख तुम्ही स्वतःच्या घरामधील संगणकावर वाचत असाल तर (म्हणजे तुमच्याकडे घरी संगणक आणि इंटरनेट आहे ) आपण योग्य वेळी योग्य जागी आहोत याबद्दल देवाचे आभार माना. कोणत्याही मोठ्या भांडवलाशिवाय करता येण्याजोग्या ऑनलाईन व्यवसायाच्या संधी शोधायला आजच सुरुवात करा. आतापर्यंत झालं ते झालं, यापुढे इंटरनेट क्रांतीमध्ये आपण कोणत्याही परीस्थीतीत मागे रहायचं नाही.

जाता जाता Gary Hayes ( Personalize Media ) या Social media expert ने बनविलेले हे infographic नजरेखालुन घालण्यास विसरु नका. सोशल मेडीयाचा आवाका जितका जास्त वाढतोय तितकाच त्याचा वेगही जास्त आहे. दर सेकंद, मिनीट, तासाला सोशल मिडीया कमालीचा पुढे जातोय. दहा मिनिटे या लेखाचा tab तसाच ठेवुन परत या आणि पहा गेल्या दहा मिनिटात काय घडले आहे ते.


12 January 2012

तर २०३० साली जग असे असेल


माजी राष्ट्रपती डॉ. . पी. जे. अब्दुल कलाम यांनी हार्वर्ड विद्यापीठात अलीकडेच 'हरीश सी. महिंद व्याख्यान' दिले. त्याचा हा गोषवारा. २०३० साली आपले जग कसे असेल याचे चित्र त्यात डॉ. कलाम यांनी उभे केले आहे ......................
आज जगासमोर गरिबी, निरक्षरता, पिण्याच्या शुद्ध पाण्याचा अभाव, स्वच्छ आणि पर्यावरण संवर्धन साधणारी वीजनिर्मिती, साधनसामग्रीचे न्याय्य वाटप, उच्च जीवनमूल्यांचे संस्कार करणारे दर्जेदार शिक्षण पुरविणे, रोगांचे निवारण, उत्तम दर्जाची आरोग्यसेवा आणि चांगले राहणीमान जनतेसाठी उपलब्ध करणे ही आव्हाने आहेत. या समस्यांच्या कारणांमागे आणि त्यावरील उपायांमागे अनेक आंतरराष्ट्रीय घटक आहेत. म्हणूनच उपाययोजना (सोल्युशन्स) शोधून काढणे ही जगभरातील सर्वच देशांची- 'जागतिक समाजा'ची- सामूहिक जबाबदारी ठरते. आताच्या जगात नवे शोध आणि त्यांचा उपयोग यांना भौगोलिक किंवा राजकीय बंधनांमध्ये जखडून ठेवता येत नाही. आज लागलेला नवा शास्त्रीय शोध पाहता पाहता हजारो मैल दूर असलेल्या देशांमध्ये पोहचून आपली बाजारपेठ तेथे शोधतो. अनेक शैक्षणिक संस्था, नागरिक यांच्याशी झालेल्या विस्तृत चर्चांवर आधारित असे '२०३० साली आपले जग कसे असायला हवे' याचे हे चित्र मी सादर करीत आहे. सन २०३० साली माझ्या कल्पनेतील जग असे असेल... त्यात ग्रामीण आणि शहरी जनता, श्रीमंत आणि गरीब, विकसित आणि विकसनशील यांच्यातील तफावत बरीच कमी झालेली असेल. त्यावेळी वीज आणि शुद्ध पाण्याचे वाटप न्याय्य झालेले असेल. सर्वांना परवडणारी उत्तम दर्जाची आरोग्यसेवा उपलब्ध असेल. प्रत्येक राष्ट्राची बलस्थाने आणि अंगभूत क्षमता सिद्ध आणि स्पष्ट झालेल्या असतील. या क्षमतांच्या सुसूत्रीकरण आणि एकत्रीकरणाच्या मोहिमांतूनच राष्ट्रांना आर्थिक लाभ आणि गतिमान विकासाच्या दिशेने वाटचाल करणे शक्य होणार आहे. प्रशासन जनतेला प्रतिसाद देणारे, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त असेल. महिला आणि मुलांशी संबंधित गुन्हे थांबलेले असतील आणि समाजातील कोणालाही आपण एकटे, वेगळे पडलो आहोत असे वाटणार नाही. ते जग असे असेल, ज्यात प्रत्येक राष्ट्र आपल्या नागरिकांना स्वच्छ, हिरवेगार पर्यावरण देऊ शकेल. प्रत्येक राष्ट्र उत्कर्षशील, सुरक्षित, दहशतवादापासून मुक्त, शांत आणि सुखी असेल. राष्ट्रांचे नेतृत्व सृजनशील असेल त्यामुळे ते राष्ट्रांमधील, समाजांमधील संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी आवश्यक त्या यंत्रणा उभारून, कार्यान्वित करून शांतता आणि उत्कर्ष हेच आपले ध्येय मानतील. सन २०३० मधील जगाच्या अनेक उद्दिष्टांपैकी एक असेल, ग्रामीण आणि शहरी जीवनांतील विषमता कमी करणे. जगभरातील तीनशे कोटींहून अधिक लोक ग्रामीण विभागात राहतात आणि त्यांच्यासाठी सर्वसमावेशक विकास, टिकाऊ शांतता आणि सर्वव्यापी उत्कर्ष साध्य करण्यासाठी या जनतेचे सक्षमीकरण महत्त्वाचे आहे. ग्रामीण-शहरी तफावत दूर करण्याचा प्रश्न हा दारिद्र्यनिवारण आणि विषमतेवर मात करण्याच्या मोहिमेशी जवळून संबंधित आहे. जगभरातील सुमारे ७० टक्के अत्यंत गरीब लोक खेड्यांमध्ये राहतात. शिक्षण, आरोग्यसेवा आणि उत्पन्न मिळविण्याच्या गरजेतून ग्रामीण लोकसंख्या शहरी भागांत स्थलांतर करीत आहे, चांगल्या संधींचा शोध घेण्याची धडपड करीत आहे, पण तिच्या वाट्याला निराशाच येत आहे. यामुळे शहरांतील गरिबीमध्ये भर पडते आणि समाजात विषमतेची दरी, संघर्ष निर्माण होतो. जगभरातील ग्रामीण भागांत अद्यापही उपयोगात आलेली साधनसामग्री, क्षमता, परंपरागत कौशल्ये आहेत. त्यांना त्यांच्या साधनांच्या, कौशल्यांच्या मूल्यवृद्धीसाठी प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. म्हणूनच त्यासाठी काळाच्या ओघात टिकणाऱ्या, चिरस्थायी यंत्रणा विकसित करणे ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागांना शहरी सोयी उपलब्ध करण्याचे उद्दिष्ट अशा टिकाऊ विकास यंत्रणेद्वारे करावयाचे आहे. त्यातून तीन प्रकारच्या जोडण्या- (कनेक्टिव्हिटीज) निर्माण कराव्या लागतील. एक, प्रत्यक्षातील म्हणजे 'फिजिकल', दुसरी इलेक्ट्रॉनिक आणि तिसरी ज्ञानाची ('नॉलेज'). यातून 'आथिर्क जोडणी' निर्माण होईल. गावांचे परस्परांशी आणि शहरांशी उत्तम रस्त्यांद्वारे आणि आवश्यक तेथे रेल्वेमार्गांनी दळणवळण प्रस्थापित झाले पाहिजे. खेड्यांना शाळा, महाविद्यालये, इस्पितळे या पायाभूत सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. ही झाली 'फिजिकल कनेक्टिव्हिटी'. तंत्रज्ञान, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या अद्ययावत साधनांद्वारे स्थानिक ज्ञानपरंपरेचे रक्षण आणि संवर्धन केले गेले पाहिजे. गावांना उत्तम शिक्षकांकडून उत्तम शिक्षण मिळण्या-बरोबरच चांगली वैद्यकीय सेवा, कृषी, मत्स्यव्यवसाय, फलोज्ञान आणि अन्नपदार्थ प्रक्रिया याबाबतची नवनवी माहिती खेड्यांत उपलब्ध झाली पाहिजे. ही झाली 'इलेक्ट्रॉनिक कनेक्टिव्हिटी'. एकदा या दोन जोडण्या अस्तित्वात झाल्या की 'नॉलेज कनेक्टिव्हिटी' अमलात आणली जाऊ शकेल. 'नॉलेज कनेक्टिव्हिटी'तून उत्पादनक्षमता, माहितीचा प्रसार, आरोग्यसेवेतील पारदर्शकता आणि बाजारपेठांशी संपर्क हे साध्य होऊशकेल. या तीन 'कनेक्टिव्हिटीज' साध्य झाल्या की त्यातून उत्पन्न वाढविण्याची क्षमता, त्यातून 'इकॉनॉमिक कनेक्टिव्हिटी'पर्यंत पोहचण्यासाठी गती मिळेल. जेव्हा आपण ग्रामीण भागांना शहरी सुखसोयी पुरवू शकू, तेव्हाच ग्रामीण भागांतील जीवनमान उंचावू शकू, गुंतवणूक आकषिर्त करू शकू. मग त्यावेळी ग्रामीण बीपीओज आणि 'मायक्रोफायनान्स'च्या यंत्रणांचा परिणामकारक वापर करू शकू. हे सर्व करण्यासाठी नेतृत्वाजवळ निर्णय घेण्याचे धाडस असले पाहिजे. नेतृत्वाजवळ उमदे व्यवस्थापन, पारदर्शक व्यवहार आणि कामाची सचोटी असली पाहिजे. 'ग्लोबल व्हिजन २०३०'मध्ये प्रदूषणविरहित स्वच्छ पर्यावरण, गरिबीशिवाय उत्कर्ष, युद्धाच्या भीतीपासून मुक्त शांतता आणि जगभरातील सर्व नागरिकांना राहण्यासाठी हे जग एक सुखाचे ठिकाण बनणे अभिप्रेत आहे. ही समान ध्येये साध्य करण्यासाठीच्या मोहिमेत जगातील अनेकानेक देशांचा, संस्थांचा आणि लोकांचा सहभाग आवश्यक आहे
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites