प्रथम दर्शनी छाप - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

11 March 2015

प्रथम दर्शनी छाप - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील दिनांक ९ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो! 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या माझ्या सदरा अंतर्गत मी आपल्या बरोबर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. लोकांशी संवाद साधून त्यांच्याशी उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासून व त्यांचं सहकार्य मिळवून आपण नेमकी कश्या प्रकारे प्रगती करु शकतो हे आपण या सदराद्वारे समजुन घेऊ शकाल. त्याच बरोबर नक्की कोणती कृती केल्यामुळे मांडण्यात आलेल्या विचारांची आपल्याला अंमलबजावणी करता येईल यावर माझा भर असेल, आणि निश्चितच अगदी साध्या व सोप्या भाषेत मी माझे विचार व्यक्त करेन. चला तर मग 'माणसे जोडूया जग जिंकुया!'
मित्रांनो, लोकांशी नेमकं कसं वागावं आणि कसं बोलावं? हा खुप मोठा प्रश्न बहूतांश व्यक्तींना सतावत असतो. विशेषतः जर आपण व्यावसायिक वर्तुळात वावरत असाल तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला जाणवत असेल. त्याच प्रमाणे जर आपण गृहीणी असाल, विद्यार्थी असाल किंवा निवृत्त व्यक्ती असाल तरीसुध्दा ती तितकीच महत्त्वाची बाब आहे. 'कार्नेगी फाउंडेशन' या संस्थेने या विषयावर रिसर्च केला, त्या दरम्यान असे निष्पन्न काढण्यात आले की, व्यक्तींची आर्थिक प्रगती ही १५% त्याच्या तांत्रिक ज्ञानावर अवलंबून असते आणि ८५% प्रगती ही परस्पर व्यवहारावर कौशल्यावर अवलंबून असते.
मित्रांनो, मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षणक्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. हजारो व्यक्ती माझ्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेत असतात. बर्‍याच व्यक्तींशी माझा वैयक्तिक संपर्क देखिल होतो. बहुतांश व्यक्तींना परस्पर व्यवहार कौशल्याबद्दल औपचारीक शिक्षणादरम्यान मार्गदर्शन मिळालेलेच नसते व त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी मदतीची गरज असते. 'माणसे जोडूया जग जिंकुया!' या सदरा अंतर्गत याच महत्त्वाच्या विषयाला अनुसरुन मी निरनिराळ्या संकल्पना मांडेन. आज पासुन त्याची आपण सुरुवात करुया, 'प्रथमदर्शनी छाप' कशी पाडावी या समकल्पनेपासुन!
मित्रांनो, आपली प्रथम दर्शनी छाप म्हणजे आपलं 'फर्स्ट इंप्रेशन'! असं म्हंटलं जात की 'Your first impression is your last impression.' खरं आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो, तेव्हा कळतनकळत त्या व्यक्तिवर आपला प्रभाव हां पडतच असतो. मग तो प्रभाव सकारात्मक असेल तर त्या व्यक्तीबरोबर आपण चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करु शकतो व भविष्यात नक्कीच त्या व्यक्तीचे सहकार्य मिळणे आपल्याला सोपे जाईल. नकारात्मक प्रभावामुळे ते शक्य होणार नाही. आपण आपली प्रथमदर्शनी छाप प्रभावशाली नक्कीच करु शकतो. प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळही नसतो. फक्त काही सेकंद असतात तर मग एवढ्या कमी वेळेत हे शक्य आहे का? हो मित्रांनो! हे शक्य आहे! आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर पहिल्या 'चार सेकंदात' प्रभाव पाडू शकतो! प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी, चार सेकंद पुरेशी आहेत. या चार सेकंदांमध्ये, खालिल चार गोष्टी जाणीवपुर्वकपणे करा...
१. पहिला सेकंद-
डोळ्यात डोळे घालुन पाहा: मित्रांनो, सर्व प्रथम आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी आपण त्या व्यक्तीशी 'आय कॉन्टॅक्ट' करायला हवा. आपली नजर थेट त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असली पाहिजे. जर आपली नजर स्थिर नसेल तर त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे आपण सहज नजरेने पाहिल्याने, त्या व्यक्तीचा चेहरा सुध्दा लक्षात राहण्यास मदत होते. कृपया डोळे वटारुन पाहू नका. आपले बघणे सहज, स्वाभाविक असु द्या!
२. दुसरा सेकंद-
स्माइल: आपल्या चेहर्‍यावर छान असे स्मितहास्य ठेवा. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत आहात याचा आपल्याला आनंद होत आहे हे त्या व्यक्तीला जाणवू द्या. त्या व्यक्तीला भेटण्याआधी आपला मुड कसाही असला तरी त्या व्यक्तीला भेटताना मात्र चेहरा प्रफुल्लित असु द्या. लक्षात ठेवा आपण ज्या प्रमाणे त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे पाहत आहोत त्याच प्रमाणे ती व्यक्ती सुध्दा आपल्या चेहर्‍याकडे पाहत आहे. स्मितहास्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये त्वरीत सकारात्मक उर्जा निर्माण होते. स्मितहास्य म्हणजे मोठमोठ्याने हसणे नव्हे! जस्ट स्माइल प्लिज!
३. तिसरा सेकंद-
हस्तांदोलनः जर प्रोफेशनल वर्तुळात वावरत असाल तर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात पुढे करा. जेणेकरुन त्या व्यक्तीला सुचित होईल. हस्तांदोलन करताना हाताची पकड मध्यम ठेवा. एकदम घट्ट नाही किंवा एकदमच सैलही नाही. भारतीय संस्कृतीनुसार पुरुष स्त्रीला भेटत असेल तर हस्तांदोलनासाठी पुढाकार घेण्याचा अधिकार स्त्रीकडे आहे. अश्यावेळी हस्तांदोलन ऐवजी 'नमस्ते' करु शकता.
४. चौथा सेकंद-
अभिवादन: स्पष्ट आवाजात व विनम्रपणे 'नमस्कार', ‘Good Morning’, ‘Good Afternoon’, ‘Good Evening’ असे ग्रीट करा.
मित्रांनो, चार सेकंदात आपण कोणत्याही व्यक्तीवर सकारात्मक प्रथम दर्शनी छाप पाडू शकतो. १. डोळ्यात डोळे घालुन पाहा २. स्मितहास्य करा ३. हस्तांदोलन करा ४. अभिवादन करा. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मनापासून करा. आपल्या वागणुकीमध्ये दिखावा नसला पाहिजे.
मी सांगितलेल्या चार सोप्या व परिणामकारक मंत्रांचे पालन करा व परस्पर व्यवहार कौशल्य आत्मसात करण्यासाठी पहिली पायरी उचला.
माणसे जोडूया जग जिंकुया!
ऑल द बेस्ट!

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि ७६६६४२६६५४ या क्रमांकावर पावा...

वेबसाईट: www.born2win.in
फेसबुकः www.facebook.com/AtulRajoliBORN2WIN
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा येथे क्लिक करा.


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites