उद्योजकीय मानसिकता आत्मसात करा - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

28 March 2015

उद्योजकीय मानसिकता आत्मसात करा - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकीय मानसिकता आत्मसात करा' या विषयावरील दिनांक २५ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो, एखादा व्यक्ती जेव्हा आपला स्वतःचा उद्योग सुरु करतो तेव्हा तो उद्योजक बनतो. स्वतःचा उद्योग सुरु करणं आजच्या युगात तसं फारसं कठीण नाही. कोणतीही व्यक्ती कोणत्याही वयात स्वत:चा उद्योग सुरु करु शकते. उद्योजक होण्यासाठी कोणतीही औपचारीक पात्रता लागत नाही. शिक्षणाचीही अट नाही, किंवा वयाची मर्यादा नाही. बर्‍याच तरुणांना आजकाल व्यवसायात यायची इच्छा असते, खास करुन सर्विस इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची देखिल आवश्यकता नसते. त्यामुळे असंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक स्वतःचा उद्योग सुरु करतात. सुरु केल्यानंतर प्रत्येक व्यवसाय हा यशस्वी होतोच असे नाही, त्यामागे मला जाणवणारे प्रमुख कारण म्हणजे, व्यवसाय यशस्वी करण्यासाठी 'उद्योजकीय मानसिकता' फार कमी उद्योजकांनी आत्मसात केलेली असते.

मित्रांनो, माझं असं ठाम मत आहे की उद्योजकता ही मानसिकता आहे. व्यवसाय करत असलेल्या व्यक्तीची मानसिकता ठरवते की तो व्यक्ती खर्‍या अर्थाने उद्योजक आहे की नाही. मी बर्‍याच लघुउद्योजकांना व्यक्तीगतरित्या ओळखतो, त्यांना मार्गदर्शन करतो. त्यामुळे माझ्या अनुभवावरुन मी सांगु शकतो की प्रत्येक लघूउद्योजक हा कागदावर उद्योजक जरी असला तरी मानसिकतेने तो उद्योजक असतोच असं नाही. उद्योजक होण्यासाठी कोणत्याही प्रकारची औपचारिक पात्रता जरी लागत नसली, तरी यशस्वी उद्योजक होण्यासाठी प्रत्येक उद्योजकाने 'वैचारीक पात्रता' नक्कीच आत्मसात केली पाहीजे. उद्योजकीय मानसिकता' आत्मसात करण्यासाठी प्रत्येक लघुउद्योजकाने ७ महत्वाचे गुणधर्म आत्मसात केले पाहीजेत. कोणताही व्यवसाय सुरु करताना उद्योजकाने हे ७ गुणधर्म आत्मसात करणे व्यवसायाच्या प्रगतीसाठी निर्णायक ठरु शकतात. उद्योजकीय मानसिकतेचे ७ गुणधर्म कोणते ते समजुन घेऊया.

१) आत्मविश्वास : मित्रांनो, यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वात महत्त्वाची डिग्री लागते ती म्हणजे 'आत्मविश्वास' व पैकीच्या पैकी गुण मिळवावे लागतात 'सकारात्मक प्रवृत्ती' मध्ये. आपले शिक्षण किती आहे? आपले वय काय आहे? आपली जात-धर्म कोणता आहे? आपला भुतकाळ कसा होता? ह्या सर्व गोष्टींचा फारसा प्रभाव आपल्या व्यावसायिक कामगिरीवर होऊच शकत नाही जर आपला स्वतःवर प्रचंड विश्वास असेल. व्यवसाय सुरु केल्या नंतर, खास करुन सुरुवातीच्या काळात आपल्याकडे सर्वात महत्त्वाचा कोणता एक असेट असला पाहीजे तर तो म्हणजे आपला 'आत्मविश्वास'. व्यवसाय चालवताना आपल्या मार्गामध्ये असंख्य अडचणी येतात, कित्येक घटना आपल्या मनाविरुध्द् घडतात, प्रत्येक वळणावर आव्हानं आपली वाट पाहत असतात या सर्व परिस्थितीवर मात करायची असेल तर आपण मानसिकरीत्या सक्षम असणे अत्यावश्यक असते. या सर्व आव्हानांना बिनधास्तपणे तोंड देण्यासाठी आपला आत्मविश्वासच आपल्या कामी येतो. टुरिझम इंडस्ट्रीमधील अग्रगण्य कंपनी 'केसरी टुर्स' चे संस्थापक श्री. केसरी पाटील यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी, प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमध्ये केसरी टुर्सची स्थापना केली. त्यांचा आत्मविश्वास हीच त्यांची त्यावेळची अमुल्य संपत्ती असेल या बद्दल मला शंका नाही.

२) स्वातंत्र प्रिय परंतु वचनबध्द : मित्रांनो, यशस्वी उद्योजकांना स्वातंत्र प्रिय असते. बर्‍याच जणांची अशी समजुत असते उद्योजकीय स्वातंत्र म्हणजे 'आपल्याला कोणी विचारणार नाही!' स्वातंत्र म्हणजे आपण पाहीजे तेव्हा काम करु शकतो, पाहीजे तेव्हा नाही. स्वातंत्र म्हणजे आपण आपल्या मर्जीचे मालक? परंतु मी या स्वातंत्र्याबद्द्ल बोलत नाही आहे. उद्योजकाकडे स्वातंत्र असते व्यवसायाचे ध्येय ठरवण्याचे! नक्की आपला व्यवसाय किती मोठा करायचा या बाबत निर्णय घेण्याचे स्वातंत्र उद्योजकाकडे असते. आपण किती पैसा कमवायचा हे ठरवण्याचे स्वतंत्र्य उद्योजकाकडे असते. त्यासाठी आराखडा तयार करण्याचे स्वातंत्र त्याच्याकडे असते. महत्त्वाची साधनसामुग्री उपलब्ध करण्याचे, योग्य व्यक्तींबरोबर, पुरवठादारांबरोबर स्नेहसंबंध प्रस्थापित करण्याचे, व्यवसायात महत्त्वाच्या योजना राबवण्याचे इ. स्वातंत्र उद्योजकाकडे असते. परंतु सर्वात महत्त्वाचे ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी उद्योजक १००% वचनबध्द् असला पाहीजे. यशस्वी उद्योजकांची त्यांच्या व्यावसायिक ध्येयांना अनुसरुन प्रचंड वचनबध्द्ता असते. ते माघार घेत नाहीत, प्रयत्न करणे सोडत नाहीत. काय साध्य करायचे ते ठरवण्याचे स्वातंत्र्य उद्योजकाकडे असते परंतु ते साध्य करण्यासाठी तो स्वतःशी वचनबध्द् असतो.

३) भविष्याचा वेध घेणारा, संधीसाधक व लवचिकपणा असलेला : उद्योजकीय मानसिकतेचा हा गुणधर्म फार कमी उद्योजकांकडे असतो. माझ्या संपर्कात येणार्‍या बर्‍याच लघुउद्योजकांच्या बाबतीत मला हे प्रकर्षाने जाणवतं की जगात होत असलेल्या बदलांचा त्यांच्या व्यवसायावर व बाजारपेठेवर काय परिणाम होईल याचा वेध ते घेत नाहीत. आदर्श उद्योजक भविष्याचा वेध घेतो, होणार्‍या बदलांना ओळखतो, त्यामधे तो संधी शोधतो व व्यवसायामध्ये त्याला अनुसरुन बदल घडवून आणण्यासाठी तो लवचिकपणा दाखवतो. 'मोडेन पण, वाकणार नाही' या विचारसरणीचा तो नसतो. उलट तो 'वाकेन पण मोडणार नाही' या मानसिकतेचा असतो.

४) ध्येयवादी व परिश्रम घेण्यास तयार : उद्योग उभारणी करत असताना, उद्योजकाकडे स्पष्ट ध्येय असणे अत्यंत गरजेचं असतं. ध्येयाशी गाठ बांधल्यानंतर ते साध्य करण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागेल तेवढी मेहनत करण्याची तयारी उद्योजकाची असली पाहीजे. खास करुन कोणत्याही उद्योगाच्या सुरवातीच्या काळात दिवस रात्र एक करुन परिश्रम घ्यावे लागतात. उद्योगामध्ये एक प्रकारे गतिज उर्जा निर्माण करण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. आदर्श उद्योजकाची तशी मानसिक तयारी असते. तो उत्साहाने काम करतो, न थकता, न थांबता. जे. आर. डी. टाटा यांची अविरतपणे काम करण्याची क्षमता विलक्षण होती. त्यांच्या सभोवतालची माणसे त्यांना बघुन थक्क व्हायची. लार्सन अ‍ॅंन्ड टुर्बोचे अध्यक्ष ए. एम. नाईक वायाच्या ७४ व्या वर्षी १४ ते १६ तास काम करतात. तळवळकर जिमचे अध्यक्ष श्री. मधुकर तळवळकर सर वयाच्या ८२ व्या वर्षी आजसुध्दा कंपनी मध्ये रोज सक्रीयपणे काम करतात. आपले व्यावसायिक ध्येय साध्य करण्यासाठी यशस्वी उद्योजक वाट्टेल तेवढे परिश्रम घेण्यास तयार असतात.

५) पैशांच महत्त्व : मित्रांनो, व्यवसायासाठी पैसा हा खुप महत्त्वाचं साधन आहे. प्रत्येक उद्योजकाने पैशाला महत्त्व दिलच पाहिजे. आपण व्यवसाय यशस्वीपणे करत आहोत की नाही. हे व्यवसायातील कोणता एक घटक ठरवतो? उत्तर किती सोपं आहे. प्रॉफिट! जर व्यवसायाला पैसा कमवता आला नाही तर व्यवसाय फार काळ टिकणार नाही, आणि जर व्यवसायाला पैसा कमवायचा असेल तर त्याचा कर्ताधर्ता उद्योजकाला पैश्याचं महत्त्व माहीत असलं पाहिजे. पैसे कमवायला महत्त्व देणं म्हणजे चैनीच्या वस्तुंचा उपभोग घेणं, ऐश करणं असं नाही. तर पैश्याचा योग्य प्रकारे वापर करुन व्यवसायाची आर्थिक प्रगती घडवून आणणे व त्याच प्रमाणे व्यवसायाशी संलग्न व्यक्तींचे जीवन समृध्द करणे. जगातील सर्व यशस्वी उद्योजक पैशांना महत्त्व देतात, म्हणुनच ते आर्थिक यश मिळवतात.

६) उत्कृष्ट विक्री कौशल्य : मित्रांनो, ग्राहकाला उत्पादन व सेवा विकत घेण्यास प्रवॄत्त करण्यासाठी विक्री कौशल्य फार महत्त्वाची भुमिका बजावते. परंतु उद्योजकाच्या मानसिकतेमध्ये उत्कृष्ट विक्री कौशल्य असण्याचे कारण असे की उद्योजक आपल्या मनातील संकल्पना त्याच्या सभोवतालच्या व्यक्तींना कळत नकळत विकत असतो. ग्राहकांना आपले उत्पादन कसे त्यांना उपयुक्त आहे हे पटवून देण्यासाठी, आपल्या कर्मचार्‍यांना ध्येयसाध्य करण्यासाठी प्रेरीत करण्यासाठी, पुरवठादारांना योग्य किंमतीत चांगल्या दर्जाचे उत्पादन व सेवा पुरवण्यासाठी, बँका किंवा गुंतवणुकदारांकडून आर्थिक सहाय्य मिळवण्यासाठी, सरकारी अधिकार्याकडून हव्या त्या मान्यता मिळवण्यासाठी उद्योजकाकडे उत्कृष्ट विक्री कौशल्य असलेच पाहीजे. उत्कृष्ट विक्री कौशल्य असलेली व्यक्ती इतरांवर प्रभाव पाडू शकते. जर आपल्याला यशस्वी उद्योजक व्हायचं असेल तर आपल्याला वेगवेगळ्या लोकांवर प्रभाव हा पाडावाच लागेल.

७) विनम्र व अहंकार विरहीत : मित्रांनो, आपला आत्मविश्चास, क्षमता व आपण केलेले परिश्रम यांच्या जोरावर आपण यशस्वी व्हाल व यशाच्या शिखरावर पोहोचाल परंतु तिथे पोहोचल्यानंतर जर आपण अहंकार बाळगला तर जास्त काळ आपण त्या शिखरावर टिकू शकणार नाही. मी अश्या कित्येक उद्योजकांना ओळखतो जे एका विशिष्ट पातळी पर्यंत पोहोचून यशस्वी झाले परंतु त्यांनी मिळवलेल्या यशाच्या अहंकाराचे ते बळी पडले. त्यांचा 'इगो' इतका वाढतो की व्यवसायापेक्षा तो जपणे जास्त महत्त्वाचं त्यांना वाटू लागतो. त्यांचा विनम्रपणा नष्ट होतो व त्यांनी मिळवलेल्या यशाच्या जोरावर त्यांना आदर व सन्मानाचा जास्त लोभ वाटु लागतो. त्यादरम्यान त्यांच्या व्यवसायावरचा फोकस हलतो व व्यवसायाला उतरती कळा लागते.

मित्रांनो, मला प्रामाणिकपणे असं वाटतं की एखादी व्यक्ती जर नोकरी करत असेल परंतु वरील सात गुणधर्मांचं पालन करत असेल तर ती एक प्रकारे उद्योजकच आहे. परंतु एखाद्या व्यक्तीचा कागदावर स्वतःचा व्यवसाय असेल परंतु वरील सात गुणधर्म त्याच्या मानसिकतेत नसतील तर तो स्वतःच्या व्यवसायात नोकरीच करत आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार कारण 'उद्योजकता' ही मानसिकता आहे. पेशा नाही!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा.

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites