व्यावसायिक संधी ओळखा - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

01 April 2015

व्यावसायिक संधी ओळखा - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यावसायिक संधी ओळखा' या विषयावरील दिनांक १ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो! यशस्वी उद्योजक होण्यासाठी आपल्याला 'उद्योजकीय मानसिकता' आत्मसात करावी लागते व व्यावसायिक संधी ओळखून उद्योजकाला जोखिम घ्यावी लागते. व्यावसायिक संधी ओळखणं आणि त्या संधीचं सोनं करणं हे उद्योजकाला अवगत असलेलं एक महत्त्वाचं कौशल्य आहे. बर्‍याच यशस्वी उद्योजकांच्या अभ्यासादरम्यान मला आढळून आलं की, यशस्वी उद्योजक व्यावसायिक संधी इतरांपेक्षा आधी ओळखतात. व्यावसायिक संधी ओळखण्याचा एक अजब दृष्टीकोन त्यांनी स्वत:मध्ये विकसीत केलेला असतो. त्याच व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी ते व्यवसाय उभारणी करतात आणि यश मिळवतात.

मित्रांनो, 'डेल कंप्युटर्स' चे संस्थापक मायकल डेल यांनी तरुण वयातच पर्सनल कंप्युटर्स क्षेत्रामध्ये निर्माण झालेली संधी हेरली. त्यांना कळून चुकलं की भविष्यात या क्षेत्रात प्रचंड मागणी असणार आहे. त्या संधीवर त्यांना पक्का विश्वास होता. त्यांना बरेच अडथळे आले परंतु व्यावसायिक संधीवर असलेल्या त्यांच्या भरवश्यामुळे ते डगमगले नाहीत. त्याचा परिणाम असा झाला की 'डेल' ने खुप कमी कालावधीत प्रचंड यश मिळवले. पर्सनल कंप्युटर्स क्षेत्रातील दिगज्ज कंपन्यांना 'डेल' ने 'काटे की टक्कर' दिली.

मित्रांनो, आपण स्वतःचा व्यवसाय करण्याचा प्लान करत आहात किंवा व्यवसाय विस्तार करणार आहात, आपण बाजारपेठेतील व्यावसायिक संधीचा मागोवा सातत्याने घेतला पाहीजे. व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी मी आपल्याला विचार मंथन करण्यासाठी टिप्स देणार आहे. या टिप्सचा वापर करुन आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी ओळखू शकता व त्या संधीचं मुल्यमापन करु शकता. व्यावसायिक संधी ओळखण्यासाठी आपण खालिल बाबींचा विचार करु शकता.
गरज : आपण ज्या बाजारपेठेत व्यवसाय करणार आहोत, त्या बाजारपेठेत एखाद्या उत्पादन अथवा सेवेची गरज असणे गरजेचे आहे. उत्पादन व सेवेद्वारे ग्राहकांची कोणतीतरी गरज पुर्ण झाली पाहीजे व ग्राहक त्या उत्पादन व सेवेसाठी पैसे देण्यास तयार असला पाहिजे. जो पर्यंत बाजारपेठेत गरज नाही तो पर्यंत उत्पादन व सेवा बाजारपेठेत आणणे कठीण आहे. बाजारपेठेत काही उत्पादनांसाठी गरज निर्माण करावी देखिल लागते. त्यामुळे बाजारपेठेतील गरज सर्व प्रथम उद्योजकाला ओळखता आली पाहीजे.
ग्राहक : बाजारपेठेत गरज जरी असली तरी नक्की ती गरज किती प्रमाणामध्ये आहे हे देखिल ओळखता आले पाहीजे. आपल्याला जे उत्पादन विकायचं आहे ते विकत घेणार्‍या ग्राहकांची संख्या मुबलक प्रमाणात असली पाहीजे. जेवढी ग्राहकांची उपलब्धता जास्त तेवढा मोठा व्यवसाय आपण उभारु शकतो. नवीन व्यवसाय सुरु करत असताना किंवा व्यवसायाचा विस्तार करत असताना याबाबत खात्री लायक माहीती मिळवून आपण योजना बनवली पाहिजे.
नफा : व्यवसायाने आर्थिक यश हे मिळवलच पाहीजे. आपण ज्या क्षेत्रात उद्योग करत आहोत त्यामध्ये आर्थिक यश मिळवण्यासाठी योग्य टक्केवारित नफा कमवणे शक्य आहे का? याचं आपण गणित मांडल पाहिजे. उद्योजक जेवढी जोखिम घेतो त्याच्या मानाने उद्योजकाला अपेक्षीत नफा हा मिळालाच पाहीजे. बाजारपेठेत गरज असुन देखिल असं होऊ शकतं की आपल्याला हवा तेवढा नफा कमवणे शक्य नाही. अश्यावेळी खरच जोखिम घ्यायची की नाही प्रश्न निर्माण होतो. उद्योजकाला आपल्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती नफा कमवता येईल याचं गणित मांडल्यामु़ळे हा निर्णय घेणे सोपे जाते.
• कौशल्य : बाजारपेठेत असलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी आपल्याकडे व आपल्या सहकार्‍याकडे आवश्यक कौशल्य असणं गरजेचं आहे. एखाद्या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी काही विशिष्ट कौशल्यांची, अनुभवाची गरज असते. आपल्याकडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे ती असतील तरच आपण व्यवसायात तग धरुन उभे राहू शकतो.  वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रात वेगवेगळी कौशल्ये आवश्यक आहेत. उदाहरणार्थ : हॉटेल इंडस्ट्रीमध्ये, रिटेल इंडस्ट्रीमध्ये, आय. टी. इंडस्ट्रीमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये इ. वेगळी कौशल्ये आपल्याकडे किंवा आपल्या सहकार्‍याकडे असली पाहीजेत.
भविष्य : व्यावसायिक संधी आज कितीही मोहक वाटत असली तरी त्या संधीचं भविष्यातील स्वरुप काय असणार आहे याचा देखिल वेध आपल्याला घेता आला पाहीजे. आज दिसत असलेली संधी ही तात्पुरती लाट असेल तर व्यवसायाला दुरगामी यश मिळवणे कठीण आहे. परंतु आजची सुवर्ण संधी भविष्यात देखिल असणार आहे किंवा ती वाढत जाणार असेल तर व्यवसायाचा पाया आणखी मजबुत होऊ शकतो व व्यवसायाला दुरगामी यश प्राप्त करणे शक्य होते. बरेच मोठे यशस्वी उद्योग सुरु करत असताना भविष्यातील मोठी संधी लक्षात घेऊन व्यवसाय सुरु करतात. वर्तमानात त्यामानाने संधीचं स्वरुप लहान असतं परंतु भविष्याचा विचार करुन ते जोखिम घेतात.
पैसा : व्यावसायिक संधीचं रुपांतर व्यवसायामध्ये करण्यासाठी आवश्यक आर्थिक भांडवल किती लागणार आहे याचं आपल्याला मुल्यमापन केलं पाहीजे. जेवढं भांडवल लागेल ते आपल्याकडे आहे का? नसेल तर आपण भांडवल उभं करु शकतो का? बर्‍याच वेळी लघुउद्योजक व्यवसाय सुरु करण्यासाठी आवश्यक भांडवल उभं करतात परंतु व्यवसाय चालवण्यासाठी लागणारं खेळतं भांडवल उभं करण्यामध्ये ते मार खातात. त्यामुळे या दोन्ही प्रकारच्या भांडवलांचा विचार केला पाहीजे. जर भांडवल उभारणं आपल्याला शक्य असंणार असेल तर व्यवसाय सुरु केल्यावर आर्थिक व्यवस्थापन करणे सुलभ होऊ शकते.
आनंद : उद्योग उभारणी करताना किंवा विस्तार करताना आपण जोखिम घेतो. साहजिकच आहे हा प्रवास सोपा नसणार आहे. या प्रवासात आपण बर्‍याच खाचखळग्यातून जातो. बर्‍याच अडथळ्यांना सामोरे जातो, कधी अपेक्षित परिणाम होतात, कधी नाही होत. कधी यश मिळतं तर कधी अपयशाला तोंड द्यावे लागते. परंतु आपण जो व्यवसाय करत आहोत त्या व्यवसायात आपल्याला जर आंतरिक आनंद मिळत असेल तर या सर्व उतार-चढावा दरम्यान आपण मानसिकरित्या उत्साही राहतो. व्यवसायनिर्मितीच्या प्रक्रीयेचा आपण आनंद घेणं गरजेचं आहे. परंतु ज्या क्षेत्रात आपण व्यवसाय करत आहात त्यात आपल्याला आनंद मिळत नसेल किंवा आपल्या मुल्यांविरुध्द वागावं लागत असेल तर नक्कीच दुरगामी यश मिळणं मुश्कील आहे.
मित्रांनो, व्यवसायाची सुरवात करताना किंवा व्यवसाय विस्तार करत असताना व्यावसायिक संधी ओळखा, तिचं मुल्यमापन करा. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी तसा दृष्टीकोन आत्मसात करा. मी सांगितलेल्या सात बाबींबद्दल विचार करा. मी ठामपणे सांगु शकतो की या बाबींचा जर आपण सखोलपणे विचार केलात, अभ्यास केलात तर आपण व्यावसायिक जोखिम घेण्यासाठी सज्ज व्हाल. आपला आत्मविश्वास आणखी वाढेल. उद्योजकता हे एक Adventure आहे, त्यामध्ये धाकधुक आहे, उत्सुकता आहे, आव्हान आहे, साहस आहे, जोश आहे, आणि आनंद आहे. या रोलर-कोस्टर राइड साठी खुप खुप शुभेछा!
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा.

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites