व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसायाचा पायाभूत उद्देश - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

15 April 2015

व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसायाचा पायाभूत उद्देश - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसायाचा पायाभूत उद्देश' या विषयावरील दिनांक १५ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो! व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली: भाग १ मध्ये आपण पायाभूत मुल्यांबद्दल समजून घेतलं. या लेखामध्ये आपण व्यवसायच्या पायाभूत उद्देशाबद्दल समजून घेऊया.

मित्रांनो एखादं जहाज समुद्रातून प्रवास करत असताना, समुद्र कधी शांत असतो तर कधी प्रचंड खवळलेला असतो. रात्रीच्या वेळी समुद्र खवळलेला असताना जहाज हवे त्या दिशेने नेणं आव्हानात्मक असतं परंतु अश्यावेळी जहाजाला योग्य दिशा दाखवण्यासाठी 'दिपस्तंभ' मार्गदर्शक ठरतो आणि वादळी वातावरणातून जहाजाला आपला मार्ग काढता येतो. तसेच एखादा वाटसरु प्रवास करताना 'होकायंत्राचा' वापर करुन आपली वाट शोधू शकतो. ज्या प्रमाणे 'दिपस्तंभ' किंवा 'होकायंत्र' प्रवासा दरम्यान दिशा दाखवण्याचे महत्त्वपुर्ण काम करतात त्याच प्रमाणे 'व्यवसायाचा पायाभूत उद्देश' व्यवसायाला सतत योग्य दिशेने प्रगती करण्यासाठी मार्गदर्शक ठरतो.
'व्यवसायाचा पायाभूत उद्देश' म्हणजेच व्यवसाय अस्तित्वात असण्यामागचे खरे कारण होय. परिणामकारक पायाभूत उद्देश संस्थेतील व्यक्तींना आपण करत असलेल्या कामामागचे खरे महत्त्वाची जाणीव करुणा देते त्यामुळे त्यांना आंतरिक प्रेरणा मिळते. व्यवसायाचे ध्येय म्हणजे व्यवसायाचा पायाभूत उद्देश नाही. पायाभूत उद्देश व्यवसायाच्या अस्तित्वाचे मुळ असते आणि कोणत्याही व्यवसायाचा मुळ उद्देश हा फक्त पैसा कमवणे नसतो. व्यवसाय अस्तित्वात असण्यामागचे खरे कारण आणखी भक्कम असेल तरच व्यवसाय दुरगामी प्रगती करु शकेल.

मित्रांनो, व्हिजनरी कंपन्या ज्या वर्षानुवर्षे जगात यशस्वीपणे व्यवसाय करत आहेत, त्यांचा अभ्यास केल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे व्यवसाय सुरु होण्याचा त्यांचा प्रमुख हेतू आजही तसाच कायम आहे. हे व्यवसाय सुरु होऊन कित्येक वर्षे झाली परंतु ज्या पायाभूत उद्देशाने व्यवसायाच्या संस्थापकाने व्यवसाय सुरु केला तो उद्देश आजही संस्थेला प्रगती करण्यासाठी कारणीभूत ठरतो.

उदाहरणार्थ, इंन्फोसिस या भारतीय बहुराष्ट्रीय आय. टी. कंपनीच्या अस्तित्वात असण्यामागचा पायाभूत उद्देश आहे. "Building Tomorrow's Enterprise Today". इंन्फोसिस ही आज एक यशस्वी व जगामध्ये आदर प्राप्त झालेली कंपनी आहे. त्यांचा पायाभूत उद्देश त्यांना सतत नाविन्यपुर्ण नवनिर्मिती (Innovation) करून विविध कंपन्यांच्या व्यावसायिक अडचणींवर मात करण्यासाठी प्रेरित करतो. 'भविष्यातील व्यवसाय निर्माण करण्याचा' त्यांचा पायाभूत उद्देश खर्‍या अर्थाने ही इंन्फोसिस कंपनी जगते. श्री. नारायण मुर्थी यांनी इंन्फोसिसचा पाया रचला आणि याच पायावर आज इंन्फोसिस प्रगती करत आहे.
मित्रांनो, 'वॉल्ट डिस्ने' या प्रख्यात कौटुंबिक करमणूक करणार्‍या कंपनीचा पायाभूत उद्देश आहे, 'Making people happy!', 'लोकांना आनंदी करणे' हा 'वॉल्ट डिस्ने' या कंपनीचा ध्यास आहे. याच ध्यासापोटी आतापर्यंत वेगवेगळ्या माध्यमांव्दारे ही कंपनी लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करत आहे. अ‍ॅनिमेशन फिल्मस, चित्रपट, टिव्ही चॅनल्स्, अ‍ॅम्युजमेंट पार्क, खेळणी इ. सेवांव्दारे आपला पायाभूत उद्देश साध्य करण्यासाठी ही कंपनी कार्यरत असते. कंपनीचे संस्थापक स्वतः श्री. वॉल्ट डिस्ने यांची नेहमी हीच तळमळ असायची. आज ते जिवंत नाहीत परंतू त्यांची कंपनी त्यांनी जडण घडण केलेल्या पायाभूत उद्देशाभोवतीच कार्यरत आहे. 'Making people happy' हे वाक्य जणू 'वॉल्ट डिस्ने' ला दिपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवते.
मित्रांनो, भारतातील प्रसिध्द ब्रॅण्ड व यशस्वी कंपनी 'महींद्रा' या कंपनीचा पायाभूत उद्देश आहे, 'Challenging conventional thinking & innovatively use all our resources to drive positive change in the lives of our stakeholders & communities across the world, to enable them to Rise'. महींद्राचे सध्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. आनंद महींद्रा कंपनीच्या पायाभूत तत्त्वप्रणालीला प्रचंड महत्त्व देतात. महींद्रा कंपनीच्या आगामी योजना त्यांच्या पायाभूत उद्देशाला अनुसरुनच निर्माण केल्या जात आहेत. इतकच नव्हे तर 'Mahindra Rise' हे त्यांचे बँड स्लोगन व कँपेन सुध्दा त्यांच्या पायाभूत उद्देशाला अनुसरुनच आहे. त्यामुळे व्हिजनरी कंपन्यांमध्ये पायाभूत उद्देशाला किती महत्त्व दिले जाते हे आपल्याला आता लक्षात आले असेलच.
पायाभूत उद्देश व्यवसायाच्या दुरगामी अस्तित्वाचा विचार करुन तयार केलेला असला पाहिजे. कोणत्याही विशिष्ट उत्पादन व सेवेचा त्यामध्ये उल्लेख नसावा. पायाभूत उद्देश व व्यावसायिक ध्येय, कृती योजना यांमध्ये घोळ घालू नये. ध्येय, कृती योजना, उत्पादने व सेवा भविष्यात कित्येक वेळा बदलू शकते परंतू पायाभूत उद्देश हा दुरगामी असतो. तो सहसा बदलत नाही.

मित्रांनो, मी माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाचा पायाभूत उद्देश नक्की कसा ओळखायचा, ठरवायचा व शब्दबध्द करायचा यावर उद्योजकांना मार्गदर्शन करतो. त्याच बरोबर व्यवसायामध्ये पायाभूत उद्देशाची अंमलबजावणी करण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण सुध्दा देतो.

मी आपल्याला आवाहन करतो की आपण जर व्यवसाय करत असाल तर व्यवसायाचे अस्तित्वात असण्यामागचं नेमकं कारण ओळखा व ठरवा! ते योग्य शब्दाचा वापर करून लिहून काढा. आपल्या व्यवसायाचा हाच पायाभूत उद्देश आहे. आपण रोज प्रेरित होऊन कार्यरत असण्यासाठी, व्यवसायाच्या सर्व कर्मचार्‍यांमध्ये आंतरीक ऊर्जा निर्माण होण्यासाठी जबरदस्त कारण असणे गरजेचे आहे. व्यवसायाला पायाभूत उद्देश प्राप्त झाल्यामुळे आपण काम करतोय असं वाटणार देखिल नाही. उलट आपल्या कामाला अर्थ प्राप्त होतो व व्यवसायाच्या अस्तित्वाला स्फुर्ती मिळते. कोणतेही मोठे आवाहन पेलण्याची ताकद मिळते. दुरगामी यश मिळवायचं असेल तर बळ आणि प्रेरणा ही अंतरमनातूनच आली पाहिजे. नेमकं हेच पायाभूत उद्देशामुळे प्राप्त होतं.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites