व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

08 April 2015

व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य' या विषयावरील दिनांक ८ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो! कोणतीही गगनचुंबी इमारत बांधणं कश्यामुळे शक्य होतं? निश्चितच त्या इमारतीच्या भक्कम पायामुळे! कोणताही आर्किटेक्ट उंच इमारतीचं डिझाइन तयार करताना त्या इमारतीचा पाया खोल आणि भक्कम करण्यावर जास्त भर देतो. इमारत बांधकामाच्या कामाची सुरुवात देखिल आधी पायाभरणीनेच होते. पायाभरणीच्या कामाला वेळ देखिल जास्त लागतो. एखादं उंच, बहरलेलं झाड आपण पाहतो. वर्षानुवर्ष ते झाड उभं असतं. ऊन-पाऊस बाह्य परिस्थितीचा विशेष फरक त्या झाडावर पडत नाही कारण त्या झाडाची मुळं जमिनीमध्ये खुप खोलवर पसरलेली असतात. खोलवर घट्ट रुतलेल्या मुळांमु़ळेच झाड मोठं होतं व वर्षानुवर्षे उभं राहतं. पडत नाही! 

मित्रांनो, ज्या प्रमाणे उंच इमारत बांधण्यासाठी व बहरलेल्या झाडासाठी त्यांचा पाया किंवा मुळे मजबुत असणं महत्त्वाचं असतं, त्याच प्रमाणे यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी व दुरगामी व्यावसायिक यश मिळवण्यासाठी व्यवसायाची 'पायाभूत तत्त्वप्रणाली' महत्त्वाची असते. व्यवसायात निर्माण होणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्णायक भुमिका बजावते. बाजारपेठेमध्ये किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणतेही बदल घडून आले तरी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली कायम राहते व व्यवसायाला वर्षानुवर्षे जीवंत ठेवते. पायाभूत तत्त्वप्रणाली व्यवसायाला 'आपण कोणत्या गोष्टींवर ठाम आहोत (पायाभूत मुल्यं) आणि आपल्या अस्तित्वात असण्यामागचा नेमका उद्देश काय (पायाभूत उद्देश)' या बद्दल स्पष्ट संकल्पना देते. व्यवसायाची पायाभूत मूल्ये व उद्देश, व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्माण करतात. ही तत्त्वप्रणाली वर्षानुवर्षे तशीच असते ती कधीच बदलत नाही. जगातील यशस्वी व्यवसाय जे ५०, १०० किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ अस्तित्वात आहेत, त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली आजही तशीच कायम आहे. उत्पादने व सेवा बदलतात, बाजारपेठ बदलते, व्यवसायाचे नेतृत्व व व्यवस्थापन यंत्रणा बदलते, टेक्नोलॉजी बदलते, व्यावसायिक कृतीआराखडा बदलतो परंतु पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र कधीच बदलत नाही. टाटा समूहाचे जमशेदजी टाटा व जे. आर. डी. टाटा आज हयात नाहीत परंतु त्यांनी टाटा समूहाला पायाभूत तत्त्वप्रणालीच्या स्वरुपात दिलेला 'वसा' आजही तसाच अस्तित्वात आहे. टाटा उद्योग समूह १०० वर्षांपेक्षा जुना आहे व वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे परंतु त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र तीच आहे. ती बदलली नाही.

या लेखामध्ये आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीतील पहिला भाग म्हणजेच 'पायाभूत मुल्ये' या बद्दल जाणून घेउया.
पायाभूत मुल्ये आपल्या व्यवसायाची अत्यंत आवश्यक व अजरामर तत्त्वे असतात. काही मोजकी व निरंतर अशी दिशादर्शक तत्त्वे जी कोणत्याही बाह्य कारणांमुळे अस्तित्वात येत नाहीत. व्यवसायातील कार्यरत लोकांसाठी ती महत्त्वाची असतात. व्हिजनरी व्यवसाय आपल्या पायाभूत मुल्यांबद्दल ठाम असतात व आपल्या मुल्यांना अनुसरुनच निर्णय घेतात. सर्व व्हिजनरी व्यवसाय विशिष्टच पायाभूत मुल्ये ठरवतात असे नाही. प्रत्येक व्हिजनरी व्यवसाय त्यांना त्यांच्यासाठी जी पायाभूत मुल्ये योग्य वाटतात, तीच ठरवतात. या व्यवसायांची पायाभूत मुल्ये वेगवेगळी जरी असली तरी ठराविक 'पायाभूत मुल्ये' असणे महत्त्वाचे आहे.
उदाहरणार्थ : टाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये- 'सचोटी', 'समजुतदारपणा', 'उत्कृष्टता', 'ऐक्य' आणि 'जबाबदारी' ही आहेत. टाटा समूहाच्या कोणत्याही व्यावसायिक योजना ह्या त्यांच्या महत्त्वाच्या मुल्यांना मुरड न घालता आखल्या जातात. मुल्यांशी तडजोड करायला व्हिजनरी व्यवसाय कधीच तयार नसतात. प्रत्येक पायाभूत मुल्याला अनुसरुन विशिष्ट कृती करण्यावर त्यांचा भर असतो. बघुया 'टाटा'ची पायाभूत मुल्यं काय कृती करण्यासाठी त्यांना सदैव प्रेरणा देतात.   
टाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये:

१) सचोटी : आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने करतो. आम्ही जे काही करतो त्या बद्दल सार्वजनिक चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.
२) समजुतदारपणा : आपण आपल्या सहकार्यांची व जगभरातील आपल्या ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे. त्याच बरोबर आपण सदैव समाजाच्या हिताचा विचार करुनच आपले कार्य केले पाहिजे.
३) उत्कृष्टता : आपण आपल्या दैनंदिन कामात नेहमी उच्च परिणाम साध्य करण्यासाठी झटले पाहिजे आणि आपल्या उत्पादन व सेवेचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे.
४) ऐक्य :  आपण जगभरातील आपल्या सहकार्‍यांबरोबर, ग्राहकांबरोबर व भागीदारांबरोबर संलग्नतेने काम केले पाहिजे. त्यांच्या बरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासण्यावर आपला भर असला पाहिजे.
५) जबाबदारी : ज्या परिसरामध्ये, समाजामध्ये व देशामध्ये आपण कार्यरत आहोत त्याबद्दल आपल्याला जबाबदार व संवेदनशील असले पाहिजे. लोकांकडून जे मिळेल ते लोकांनाच जास्त पटीने देण्याचा आपला मानस असला पाहिजे. 
(*टाटा उद्योग समूहाची वरील 'पायाभूत मूल्ये' त्यांच्या 'पायाभूत तत्वप्रणाली'चा भाग आहेत. टाटा समूहाच्या वेबसाइट वर सुध्दा आपण वाचू शकता.)

मित्रांनो, मला असं वाटतं टाटा उद्योग समूहाचं व्यावसायिक यश, पत आणि यशस्वी इतिहासामागे त्यांची 'पायाभूत मूल्य' फार मोलाची कामगिरी बजावतात.

मी हजारो लघुउद्योजकांबरोबर संवाद साधतो, त्यांना भेटतो. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये हा विषय मी सखोलपणे मांडतो व उद्योजकांना आपल्या व्यवसायची पायभूत मूल्ये ठरवण्यास प्रेरित करतो. पायाभूत मुल्ये निश्चित केल्याने उद्योजकांचा त्यांच्या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. उद्योजकांना कळून चुकते की आपण मोठी स्वप्ने पाहत जरी असलो तरी त्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींबरोबर तडजोड नाही केली पाहिजे.

मित्रांनो, व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली तयार केली पाहिजे. 'पायाभूत मुल्ये' व 'पायाभूत उद्देश' हे त्याचे दोन भाग आहेत. पायाभूत मुल्यांमुळे आपल्या व्यवसायाची एक प्रकारे संस्कृती निर्माण होते. व्यवसायामध्ये कार्यरत कर्मचार्यामधे एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासाठी ही पायाभूत मुल्ये व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिने अंगीकारावी लागतात. सुरुवात मात्र उद्योजकाने स्वतः पासुन केली पाहिजे कारण उद्योजकच व्यवसायाचा लिडर असतो आणि Leader should always lead from the front. शिवाजी महाराजांसाठी 'स्वराज्य' आणि 'स्वाभिमान' ही दोन पायाभूत मुल्ये महत्वाची होती. आपल्या मवळ्यांमध्ये त्यांनी ही मुल्ये यशस्वीपणे विकसित केली परंतु त्याची सुरुवात मात्र त्यांनी स्वत: पासून केली!
पुढील लेखात आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीचा दुसरा भाग समजून घेऊ. तो म्हणजे 'पायाभूत उद्देश'
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites