उद्योजकता... म्हणजे काय रे मित्रा? - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

19 March 2015

उद्योजकता... म्हणजे काय रे मित्रा? - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकता म्हणजे काय?' या विषयावरील उद्योजकीय मानसिकता उलगडणारा दिनांक १८-मार्च-२०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...
नमस्कार मित्रांनो 'माझा बिझनेस मित्र' या सदराअंतर्गत मी उद्योजक मित्रांशी संवाद साधणार आहे. आज बर्‍याच प्रमाणात मराठी तरुण उदयोग क्षेत्रात येत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करण्याच्या उद्देशाने ते निरनिरळ्या क्षेत्रांमध्ये बिझनेस करत आहेत. 'मराठी माणूस धंदा करु शकत नाही!' ही समजुत हळूहळू इतिहास जमा होऊ लागली आहे. मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय सुरु करावा व नोकरी मागणार्‍यांच्या यादीत सामिल न होता नोकरी देणार्‍यांच्या यादीत सामिल व्हावे या विचारांचा मी आहे. परंतु आपल्यापैकी बहूतांश मराठी लघुउद्योजक, खास करुन पहिल्या पिढीचे लघुउद्योजकांना व्यवसायाचा काहीच अनुभव नसतो. त्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्राचे थोडेफार तांत्रिक ज्ञान असते. त्याच्या आधारावर ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतात. उद्योजक बनतात! परंतु व्यवसायाचा अनुभव पाठीशी नसल्यामुळे, व्यावसायिक कौशल्य आत्मसात न केल्याने व व्यवसाय उभारणीबद्दल आवश्यक ज्ञान नसल्यामुळे कित्येक लघुउद्योजक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतात. मी शेकडो मराठी लघुउद्योजकांना व्यक्तिगतरित्या ओळखतो. त्यांच्या व्यवसायाबद्द्ल मला इथंबुत माहीती आहे व त्यांच्या अडचणी मी जवळून पाहिल्या आहेत. मी स्वतःदेखिल एक उद्योजक आहे. त्यामुळे 'माझा बिझनेस मित्र' या सदराव्दारे मी लघुउद्योजक मित्रांना, दर आठवडयाला आपला व्यवसाय यशस्वी करण्याच्या मार्गावर येणार्‍या अडचणींवर परिणामकारकपणे मात करण्यासाठी एक कानमंत्र देणार आहे. मी ठामपणे सांगु शकतो प्रत्येक कानमंत्र आपल्याला आपली व्यावसायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लाभदायक ठरेल.
मित्रांनो आपण एक उद्योजक आहात. परंतु उद्योजकता म्हणजे काय? ह्या मुलभुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजुन घेतलं पाहीजे. जो पर्यंत आपण 'उद्योजकता' या शब्दाचा अर्थ समजुन घेत नाही तो पर्यंत आपण उद्योजकीय मानसिकतेचा अवलंब करु शकत नाही. बर्‍याच व्यक्तींची अशी समजुत असते की उद्योजक म्हणजे 'आपण आपल्या मर्जीचे मालक' असणे. आपण हवे ते करु शकतो व त्याचे आपल्याला पैसे मिळतात. बर्‍याच जणांना असं देखिल वाटत असते की उद्योजकता म्हणजे स्वावलंबी असणे, भरपुर मेहनत घेण्याची तयारी असणे व सर्व गोष्टी आपण स्वतः करणे. आपल्या, उद्योजकते विषयीच्या समजुती ठरवत असतात की एक उद्योजक म्हणुन आपण किती प्रगती कराल. आणि म्हणुनच 'उद्योजकता' म्हणजे काय हे समजुन घेणं महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, उद्योजकता म्हणजे Entrepreneurship (आंत्रप्रुनियरशीप) उद्योजक म्हणजे Entrepreneur ( आंत्रप्रुनियर). 'आंत्रप्रुनियर' हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. उद्योजकाने जोखिम घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 'बाजारपेठेतील व्यावसायिक संधी'. उद्योजक संधी ओळखुन त्यातुन यश मिळवण्यासाठी जोखिम घेतो व व्यवसाय उभारणीसाठी तो आपली कार्यक्षमता, पैसा, वेळ, मनुष्यबळ व यंत्रणा पणाला लावतो. त्या मोबदल्यात मिळालेले यश किंवा अपयशाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असते.
मित्रांनो, जो पर्यंत बाजारपेठेत संधी नाही तो पर्यंत व्यवसाय किंवा कोणतंही प्रॉडक्ट किंवा सर्विस अस्तित्वात येणं अशक्य! उद्योजकाकडे ही संधी ओळखण्याची नजर असली पाहीजे. तसा दॄष्टिकोन आपसुक नसेल तर उद्योजकांनी विकसित केला पाहीजे. उद्योजक नेहमी भविष्याचा वेध घेणारा व त्यामध्ये संधी शोधणारा असला पाहीजे. एकदा व्यावसायिक संधी हेरली की मग वेळ येते रिस्क घेण्याची म्हणजेच जोखिम घेण्याची! व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजक महत्त्वाचे रिसोर्स उपलब्ध करुन देतो व रिसोर्स उपलब्ध करुन देण्यासाठी त्याला जोखिम घ्यावी लागते. जोखिम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व रिसोर्सची योग्य त्या प्रमाणात उपलब्धता करुन दिली पाहीजे.
कार्यक्षमता : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक ज्ञान व कौशल्य.
संस्था व यंत्रणा : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी संस्था निर्माण करणे व त्या अंतर्गत सुनियोजीत यंत्रणा प्रस्थापित करणे.
मनुष्यबळ : योग्य प्रमाणामध्ये आवश्यक कार्यक्षमतेचे मनुष्यबळ उपलब्ध करणे.
आर्थिक भांडवल : व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे.
वेळ : आपला वेळ व्यवसाय निर्मितीसाठी गुंतवणे.
वरील सर्व बाबी जेव्हा उद्योजक उपलब्ध करतो तेव्हा तो एक प्रकारे जोखिम घेतो. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी प्लान बनवतो व कृती करतो. साध्य होणार्‍या परिणांमाना उद्योजक स्वतः सामोरा जातो. मग तो परिणाम यश असेल कींवा अपयश! आणि हा मुलभुत फरक आहे उद्योजकांमध्ये व इतरांमध्ये. 'Entrepreneur takes risk & experiences the consequences!' व्यवसायाच्या वाट्याला जर अपयश आलं तर त्याचा भुर्दंड उद्योजकालाच भरावा लागतो. आणि जर यश हाती आलं तर त्याचा मोलाचा वाटा उद्योजकाच्या वाट्याला येतो. म्हणुनच जगातील सर्वात श्रीमंत माणसे हे उद्योजकच असतात. त्यांनी घेतलेल्या जोखिमेचा त्यांना फार मोठा मोबदला मिळतो. कारण व्यवसाय उभारणीची एवढी मोठी जोखिम जर उद्योजक घेत असेल आणि जर अपयश आले तरी तो सामोरा जात असेल तर यश मिळाल्यावर त्याच्या जोखिमेच्या प्रमाणातच त्याला मोबदला मिळतो.
मित्रांनो, बरेच लघुउद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखिम घेतात. थोडेफार यशस्वी होतात. परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखिम घेणं थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत. नवीन रिसोर्सची निर्मीती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. बचावात्मक पवित्रा घेतात. माझ्यामते असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात. मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक असतात असं मला वाटतं.
मित्रांनो, उद्योजकाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने 'अर्थपूर्ण जोखिम' घेणं गरजेचं आहे. जो जोखिम घेतो तो उदयोजक! हे सुत्र लक्षात ठेवलं पाहीजे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन अवलंबला पाहीजे. जगातील बाजारपेठेत होणार्‍या गोष्टींचा आढावा घेतला पाहीजे. नवीन संधींचा ठाव घेतला पाहीजे व संधींच सोनं करण्यासाठी, व्यवसाय उभारणी केली पाहीजे. आणि त्यासाठी जोखिम घेतली पाहीजे.
लक्षात ठेवा, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठ्वा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites