संघ बांधणी - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

08 July 2015

संघ बांधणी - अतुल राजोळी

नमस्कार उद्योजक मित्रांनो! आपण 'चक दे इंडिया' चित्रपट पाहिला आहे का? ज्या व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाअंतर्गत एक उत्कृष्ट संघ बांधणी करायची आहे, त्या व्यक्तीने हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे. हा चित्रपट भारतीय महिला हॉकी टीमच्या एका काल्पनिक कथेवर आधारीत आहे. चित्रपटामध्ये महिला हॉकी टीमचा कोच कबीर खान, हा विश्वचषक जिंकण्याच्या उद्देशाने संघ बांधणी करतो. संघ बांधणी करत असताना त्याला बर्‍याच अडचणी येतात, परंतु विश्वचषक जिंकण्याची त्याची इच्छा तीव्र असते. ज्या महिला खेळाडूंना घेऊन त्याला संघ बांधणी करायची असते, सुरुवातीला त्याचा त्याला प्रचंड विरोध करतात. विश्वचषक जिंकणं तर दुरची गोष्ट, महिला खेळाडूंना एकमेकांबरोबर एक टीम म्हणून खेळणं हेच फार कठीण काम असतं. खेळाडूंचा स्वतःवर आत्मविश्वास सुद्धा नसतो की आपण विश्वचषक जिंकू शकतो. त्यांची शारिरीक क्षमता व क्रिडा कौशल्य देखिल प्रतिस्पर्धींच्या तुलनेत फार कमी असतात. या सर्व अडचणींवर मात करत हा भारतीय महिला हॉकीचा संघ विश्वचषक जिंकतो!
मित्रांनो, माझ्या मते या चित्रपटातून लघुउद्योजकांनी संघ बांधणीला अनुसरुन महत्त्वाचा धडा शिकला पाहिजे. जर आपण उद्योजक आहात, आणि व्यवसायाला एक संघटनात्मक स्वरुप देण्याच्या प्रयत्नात आहात तर, व्यवसायाअंतर्गत आपल्याला एक उत्कृष्ट संघ बांधणी करता आली पाहिजे. एका जबरदस्त टीम शिवाय आपण व्यवसायाचं भव्य ध्येय साध्य करणं निव्वळ कठीण आहे. उद्योजक फक्त स्वतःच्या कार्यक्षमतेच्या जोरावर फक्त एका विशिष्ट पातळीपर्यंतच प्रगती करु शकतात. व्यवसायाची आपल्या भव्य ध्येयाच्या दिशेने होणार्‍या पुढील वाटचाली दरम्यान उद्योजकाने संघ बांधणीवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. संघ बांधणीच्या प्रक्रीयेदरम्यान उद्योजकाची भुमिका व्यवस्थापक किंवा लिडरची असते. संघ बांधणी प्रक्रीया ही कोणत्याही व्यवस्थापकासाठी सोपी नसते. परंतु संघ बांधणी प्रक्रीयेबद्दल योग्य मार्गदर्शनाच्या मदतीने व्यवस्थापक हा निर्णायक प्रवास नक्कीच करु शकतो. या लेखाद्वारे मी आपल्याला संघ बांधणीच्या प्रक्रीयेतील महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल थोडक्यात सांगणार आहे. या टप्प्यांना समजुन घेतल्यानंतर निश्चितच आपण एका उत्कृष्ट संघाची बांधणी करु शकाल.
संघ बांधणीचे महत्त्वाचे चार टप्पे पुढील प्रमाणे असतात.
१) प्राथमिक टप्पा
२) अस्वस्थ टप्पा
३) अनुकूल टप्पा
४) अंमलबजावणी टप्पा
संघ बांधणीतील प्रत्येक टप्पा आपण थोडक्यात समजुन घेऊया.

१) प्राथमिक टप्पा :
हा संघ बांधणीचा पहीला टप्पा असतो. या टप्प्या दरम्यान व्यवस्थापक आपल्या संघामध्ये कर्मचार्‍यांची नेमणूक करतो. त्यांना संघाचे ध्येय सांगतो. त्यांना प्रेरीत करतो. त्यांच्यामध्ये सकारात्मक भावना निर्माण करतो. या टप्प्या दरम्यान कर्मचारी उत्सुक असतात. कर्मचार्‍यांना पुर्णपणे त्यांच्या भुमिकेबद्दल व कामाबद्दल स्पष्ट कल्पना आली असतेच असे नाही. व्यवस्थापकाच्या सुचनांचं पालन करणे हेच त्यांना ठाऊक असतं. व्यवस्थापक या टप्प्यादरम्यान प्रत्येकाला त्याच्या जबाबदारी बद्दल सविस्तर कल्पना देतो. या टप्प्यादरम्यान संघाचं ध्येय साध्य करण्यासाठी प्लान तयार केला जातो. संघातील कर्मचारी त्याप्रमाणे काम करण्यासाठी तयार होतात व हळूहळू काम करु लागतात आणि संघबांधणी प्रक्रीयेतील दुसर्‍या व अत्यंत निर्णायक टप्प्याची सुरुवात होते.

२) अस्वस्थ टप्पा :
या टप्प्यादरम्यान कर्मचारी ठरवलेल्या प्लान प्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करु लागतात. या टप्प्यादरम्यान एकमेकांबरोबर संवाद साधुन टिमवर्कने काम करणं महत्त्वाचं असतं. परंतु याच टप्प्यादरम्यान बर्‍याच अडचणी उद्भवतात. संघाने ठरवल्याप्रमाणे कामं होतातच असं नाही. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार येणार्‍या अडचणींना सोडवू लागतो. या टप्प्यादरम्यान कर्मचार्‍यांम
ध्ये तणाव निर्माण होतो. बर्‍याच वेळा या कालावधीदरर्‍यानं कर्मचार्‍यांकडून चुका होतात. त्यामुळे आरोप-प्रत्यारोप होऊ लागतात. वाद-विवाद होऊ लागतात. कर्मचार्‍यांचा विश्वास कमी होऊ लागतो. आपण आपलं ध्येय खरंच साध्य करु शकतो का? असा प्रश्न निर्माण होतो. कर्मचारी निराश होण्याची शक्यता जास्त असते. अश्या परिस्थितीत व्यवस्थापकाची भुमिका महत्त्वाची असते.

३) अनुकूल टप्पा :
अस्वस्थ टप्प्यादरम्यान कर्मचार्‍यांमध्ये तणाव निर्माण झालेला असतो. अस्वस्थ टप्प्या दरम्यान व्यवस्थापकाच्या महत्त्वाच्या भुमिकेमुळे हळूहळू संघबांधणीच्या तिसर्‍या टप्प्याची सुरुवात होते. अनुकूल टप्प्यादरम्यान कर्मचारी आपापसातील वाद-विवाद मिटवतात. कर्मचार्‍यांना एकमेकांची बलस्थाने व कमतरता कळू लागतात. ते एकमेकांना समजुन घेऊ लागतात. व्यवस्थापकावर त्यांचा विश्वास वाढतो. कर्मचार्‍यांमध्ये मैत्रीचे संबंधं प्रस्थापित होतात. एकमेकांना ते सहकार्य करु लागतात. त्यांच्यातील संभाषण सुधारते व ते एकमेकांना सुधारणेबाबत अभिप्राय देतात. एक संघ म्हणुन सगळे एकजुट होतात व हळूहळू संघाची प्रगती होऊ लागते. बर्‍याच संघटनांमध्ये अस्वस्थ टप्प्याच्या दरम्यानच संघाला अपयश येते. अस्वस्थ टप्पा ते अनुकूल टप्पा हा प्रवास कोणत्याही संघासाठी निर्णायक असतो. बहुतांश प्रमाणात अस्वस्थ टप्पा ते अनुकूल टप्पा हा प्रवास मोठ्या कालावधीचा असतो.

४) अंमलबजावणी टप्पा :
चौथ्या टप्प्यात संपूर्ण टिम जबरदस्त कामगिरी करु लागते. कोणत्याही प्रकारचा तणाव न बाळगता संघ ठरवल्या प्रमाणे काम करतो. आपल्या ध्येयाच्या दिशेने प्रत्येक कर्मचारी 
प्लान प्रमाणे परिश्रम घेतो. व्यवस्थापक या टप्प्याच्या दरम्यान आपली संपुर्ण जबाबदारी टिमवरच सोपवतो. संघाची कामगिरी उच्च दर्जाची असते. विशिष्ट यंत्रणा व संघटनात्मक रचनेमुळे अंमलबजावणी साध्य होते.
मित्रांनो, संघबांधणीच्या प्रक्रीयेदरम्यान व्यवस्थापकाची भुमिका फार महत्त्वाची असते. मला खात्री आहे की या संघ बांधणी प्रक्रीयेच्या टप्प्यांच्या ज्ञानामुळे आपण आपल्या व्यवसायाअंतर्गत संघ बांधणी करण्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकाल.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन


संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
वेबसाईट: www.born2win.in


'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy


No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites