LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

24 March 2015

आधी इतरांना समजुन घ्या - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या सदरातील 'आधी इतरांना समजुन घ्या' या विषयावरील दिनांक २३ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

"प्लीज मला समजुन घ्यायचा प्रयत्न कर!"
"तु मला कधीच समजुन घेत नाहीस"
"He will never understand my feelings."
मित्रांनो ही वाक्य बर्‍याच वेळा आपल्या कानावर पडत असतील, किंवा आपण सुध्दा कधीतरी, कोणाबद्दल तरी, कळत नकळत हे असे बोलत असु. आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटत असतं की इतर व्यक्तींनी आपल्याला समजुन घेतलं पाहिजे. खास करुन आपले कुटुंबिय, आपला मित्रपरिवार व आपले सहकारी ज्यांच्या बरोबर आपण दिवसातील जास्त वेळ व्यतित करतो. सहाजिकच आहे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या व्यक्तींनी जर आपल्याला समजुन घेतलं तर आपलं जगणं किती सुखकर होईल. परंतु प्रश्नं असा पडतो की इतरांनी आपल्याला समजुन घेण्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे? मित्रांनो, इतरांनी जर आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर सर्वात रामबाण मार्ग म्हणजे, 'आधी इतरांना समजुन घ्या!'

आपण जर आधी इतरांना समजुन घेण्यासाठी पुढाकार घेतला तर इतर देखिल आपल्याला समजुन घेण्यासाठी पुढे सरसावतात. जर आपण त्यांना समजुन घेत आहोत तर त्यांना सुध्दा आपल्याला समजुन घेण्याची नैतिक जबाबदारी जाणवते आणि ते आपल्याला समजून घेतात. जसं आपल्याला वाटतं की इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं. तसचं इतरांनाही वाटत असत की आपण त्यांना समजुन घ्यावं. म्हणून आपण आधी इतरांना समजुन घेण्यासाठी स्वतःमध्ये समजुतदारपणा आणला पाहिजे. परंतु आणखी एक प्रश्न पडतो की इतरांना समजुन घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
मित्रांनो, समजुन घेणं म्हणजेच इतर व्यक्ती ज्या परिस्थितीमध्ये आहेत ज्या अनुभवातून सध्या जात आहेत, त्याठिकाणी आपण स्वतःला ठेवून कल्पना करणे की जर आपण त्या व्यक्तीच्या जागी असतो तर आपल्याला कसं वाटलं असतं. जेव्हा आपण स्वतःला दुसर्‍या व्यक्तीच्या जागी ठेवून विचार करतो त्यावेळी आपल्याला त्या व्यक्तीच्या भावनांची जाणिव होते व आपण त्या व्यक्तीला समजुन घेऊ शकतो. परंतु आणखी एक प्रश्न निर्माण होतो की त्या व्यक्तीची परिस्थिती किंवा अनुभव आपल्याला कळणार कसा? आपण अंतरज्ञानी नाही आहोत! म्हणूनच जर आपल्याला इतर व्यक्तींना समजुन घ्यायचं असेल तर आपण त्या व्यक्तीचं बोलणं 'कान आणि मन लावून ऐकलं' पाहीजे. जेव्हा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील व्यक्ती किंवा आपला सहकारी त्याच्याबद्दल सांगत असेल त्यावेळी त्याचं म्हणणं शांतपणे ऐका. त्या व्यक्तीच्या भावना समजुन घ्या. फक्त ऐकू नका. कान व मन लावून ऐका. फक्त कानाने ऐकल्याने आपल्याला माहीती मिळते परंतु कान व मन लावून ऐकल्याने त्या व्यक्तीच्या भावनांची आपल्याला जाणिव होते, व आपल्याला व्यक्तीच्या खर्‍या परिस्थितीची जाणिव होते. इतर व्यक्तींचं म्हणणं ऐकल्यामुळे समजुन घेतल्यामुळे सहाजिकच त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल आपुलकी व मैत्री निर्माण होते. त्यामुळे आपलं म्हणणं ऐकण्यासाठी ती व्यक्तीसुध्दा पुढाकार घेते.

मित्रांनो, ऐकणं हे कोणत्याही संभाषणामध्ये बोलण्याइतकचं प्रभावी ठरु शकतं. आपल्याला देवाने दोन कान व एक तोंड दिलं आहे. बहूतेक हाच संदेश त्यातुन आपण घ्यायला हवा की त्याच प्रमाणामध्ये बोला आणि ऐका. कमी बोला आणि जास्त ऐका! आपल्या स्नेहसंबंधांमध्ये यशस्वी होण्यासाठी एक चांगला श्रोता होणं गरजेचं आहे. चांगला श्रोता म्हणजेच जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल, तेव्हा कान व मन लावून ऐका.
मित्रांनो, आज मी आपल्याला एक आव्हान देतो, आजच व आत्तापासुनच दुसर्‍यांचं म्हणणं शांतपणे, कान व मन लावून ऐकण्याचा निर्णय घ्या. जेव्हा दुसरी व्यक्ती बोलत असेल तेव्हा मनामध्ये आपलं उत्तर तयार करु नका. जेव्हा एखादी व्यक्ती आपले विचार मांडत असेल तेव्हा दुसरीकडे कुठेच लक्ष देऊ नका; फक्त मनापासुन ऐका. त्या व्यक्तीला महत्त्व द्या. प्रत्येक व्यक्तीच्या मनात बर्‍याच गोष्टी दडल्या आहेत. त्यांना व्यक्त व्हायचं आहे. त्यांना वाट करुन द्या. फक्त एवढं करुन बघा आणि आपल्या स्नेहसंबंधांमध्ये चमत्कार अनुभवा. इतर व्यक्ती देखिल आपल्याला महत्त्व देऊ लागतील व आपलं म्हणणं, ऐकतील. आपल्याला समजुन घेतील. जर इतरांनी आपल्याला समजुन घ्यावं असं वाटत असेल तर आधी इतरांना समजुन घ्या.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठवा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689

'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy

19 March 2015

उद्योजकता... म्हणजे काय रे मित्रा? - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'उद्योजकता म्हणजे काय?' या विषयावरील उद्योजकीय मानसिकता उलगडणारा दिनांक १८-मार्च-२०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...
नमस्कार मित्रांनो 'माझा बिझनेस मित्र' या सदराअंतर्गत मी उद्योजक मित्रांशी संवाद साधणार आहे. आज बर्‍याच प्रमाणात मराठी तरुण उदयोग क्षेत्रात येत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरु करुन तो यशस्वी करण्याच्या उद्देशाने ते निरनिरळ्या क्षेत्रांमध्ये बिझनेस करत आहेत. 'मराठी माणूस धंदा करु शकत नाही!' ही समजुत हळूहळू इतिहास जमा होऊ लागली आहे. मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षण क्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. प्रामुख्याने मराठी माणसाने स्वतःचा व्यवसाय सुरु करावा व नोकरी मागणार्‍यांच्या यादीत सामिल न होता नोकरी देणार्‍यांच्या यादीत सामिल व्हावे या विचारांचा मी आहे. परंतु आपल्यापैकी बहूतांश मराठी लघुउद्योजक, खास करुन पहिल्या पिढीचे लघुउद्योजकांना व्यवसायाचा काहीच अनुभव नसतो. त्यांच्याकडे विशिष्ट क्षेत्राचे थोडेफार तांत्रिक ज्ञान असते. त्याच्या आधारावर ते स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतात. उद्योजक बनतात! परंतु व्यवसायाचा अनुभव पाठीशी नसल्यामुळे, व्यावसायिक कौशल्य आत्मसात न केल्याने व व्यवसाय उभारणीबद्दल आवश्यक ज्ञान नसल्यामुळे कित्येक लघुउद्योजक वेगवेगळ्या समस्यांना तोंड देत असतात. मी शेकडो मराठी लघुउद्योजकांना व्यक्तिगतरित्या ओळखतो. त्यांच्या व्यवसायाबद्द्ल मला इथंबुत माहीती आहे व त्यांच्या अडचणी मी जवळून पाहिल्या आहेत. मी स्वतःदेखिल एक उद्योजक आहे. त्यामुळे 'माझा बिझनेस मित्र' या सदराव्दारे मी लघुउद्योजक मित्रांना, दर आठवडयाला आपला व्यवसाय यशस्वी करण्याच्या मार्गावर येणार्‍या अडचणींवर परिणामकारकपणे मात करण्यासाठी एक कानमंत्र देणार आहे. मी ठामपणे सांगु शकतो प्रत्येक कानमंत्र आपल्याला आपली व्यावसायिक उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लाभदायक ठरेल.
मित्रांनो आपण एक उद्योजक आहात. परंतु उद्योजकता म्हणजे काय? ह्या मुलभुत प्रश्नाचं उत्तर आपल्याला समजुन घेतलं पाहीजे. जो पर्यंत आपण 'उद्योजकता' या शब्दाचा अर्थ समजुन घेत नाही तो पर्यंत आपण उद्योजकीय मानसिकतेचा अवलंब करु शकत नाही. बर्‍याच व्यक्तींची अशी समजुत असते की उद्योजक म्हणजे 'आपण आपल्या मर्जीचे मालक' असणे. आपण हवे ते करु शकतो व त्याचे आपल्याला पैसे मिळतात. बर्‍याच जणांना असं देखिल वाटत असते की उद्योजकता म्हणजे स्वावलंबी असणे, भरपुर मेहनत घेण्याची तयारी असणे व सर्व गोष्टी आपण स्वतः करणे. आपल्या, उद्योजकते विषयीच्या समजुती ठरवत असतात की एक उद्योजक म्हणुन आपण किती प्रगती कराल. आणि म्हणुनच 'उद्योजकता' म्हणजे काय हे समजुन घेणं महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, उद्योजकता म्हणजे Entrepreneurship (आंत्रप्रुनियरशीप) उद्योजक म्हणजे Entrepreneur ( आंत्रप्रुनियर). 'आंत्रप्रुनियर' हा शब्द इंग्रजी जरी असला तरी त्यांचं मुळ फ्रेंच भाषेमध्ये आहे. या शब्दाचा अर्थ आहे 'अशी व्यक्ती जी जोखिम घेते'. Someone who undertakes risk. उद्योजकाचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' आपल्याला उद्योजकता म्हणजे काय हे समजुन घ्यायचं असेल तर उद्योजक जोखिम का घेतो व कशी घेतो हे समजुन घेतलं पाहीजे. उद्योजकाने जोखिम घेण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 'बाजारपेठेतील व्यावसायिक संधी'. उद्योजक संधी ओळखुन त्यातुन यश मिळवण्यासाठी जोखिम घेतो व व्यवसाय उभारणीसाठी तो आपली कार्यक्षमता, पैसा, वेळ, मनुष्यबळ व यंत्रणा पणाला लावतो. त्या मोबदल्यात मिळालेले यश किंवा अपयशाला सामोरे जाण्याची त्याची तयारी असते.
मित्रांनो, जो पर्यंत बाजारपेठेत संधी नाही तो पर्यंत व्यवसाय किंवा कोणतंही प्रॉडक्ट किंवा सर्विस अस्तित्वात येणं अशक्य! उद्योजकाकडे ही संधी ओळखण्याची नजर असली पाहीजे. तसा दॄष्टिकोन आपसुक नसेल तर उद्योजकांनी विकसित केला पाहीजे. उद्योजक नेहमी भविष्याचा वेध घेणारा व त्यामध्ये संधी शोधणारा असला पाहीजे. एकदा व्यावसायिक संधी हेरली की मग वेळ येते रिस्क घेण्याची म्हणजेच जोखिम घेण्याची! व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजक महत्त्वाचे रिसोर्स उपलब्ध करुन देतो व रिसोर्स उपलब्ध करुन देण्यासाठी त्याला जोखिम घ्यावी लागते. जोखिम घेण्यासाठी उद्योजकाने पुरेसा अभ्यास करणे गरजेचे आहे. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी उद्योजकाने कार्यक्षमता, संस्था व यंत्रणा, मनुष्यबळ, आर्थिक भांडवल व वेळ या सर्व रिसोर्सची योग्य त्या प्रमाणात उपलब्धता करुन दिली पाहीजे.
कार्यक्षमता : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी महत्त्वपूर्ण तांत्रिक ज्ञान व कौशल्य.
संस्था व यंत्रणा : व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी संस्था निर्माण करणे व त्या अंतर्गत सुनियोजीत यंत्रणा प्रस्थापित करणे.
मनुष्यबळ : योग्य प्रमाणामध्ये आवश्यक कार्यक्षमतेचे मनुष्यबळ उपलब्ध करणे.
आर्थिक भांडवल : व्यवसाय उभारणीसाठी लागणारा पैसा उभा करणे.
वेळ : आपला वेळ व्यवसाय निर्मितीसाठी गुंतवणे.
वरील सर्व बाबी जेव्हा उद्योजक उपलब्ध करतो तेव्हा तो एक प्रकारे जोखिम घेतो. व्यावसायिक संधीचं सोनं करण्यासाठी प्लान बनवतो व कृती करतो. साध्य होणार्‍या परिणांमाना उद्योजक स्वतः सामोरा जातो. मग तो परिणाम यश असेल कींवा अपयश! आणि हा मुलभुत फरक आहे उद्योजकांमध्ये व इतरांमध्ये. 'Entrepreneur takes risk & experiences the consequences!' व्यवसायाच्या वाट्याला जर अपयश आलं तर त्याचा भुर्दंड उद्योजकालाच भरावा लागतो. आणि जर यश हाती आलं तर त्याचा मोलाचा वाटा उद्योजकाच्या वाट्याला येतो. म्हणुनच जगातील सर्वात श्रीमंत माणसे हे उद्योजकच असतात. त्यांनी घेतलेल्या जोखिमेचा त्यांना फार मोठा मोबदला मिळतो. कारण व्यवसाय उभारणीची एवढी मोठी जोखिम जर उद्योजक घेत असेल आणि जर अपयश आले तरी तो सामोरा जात असेल तर यश मिळाल्यावर त्याच्या जोखिमेच्या प्रमाणातच त्याला मोबदला मिळतो.
मित्रांनो, बरेच लघुउद्योजक व्यवसायाच्या सुरुवातीलाच जोखिम घेतात. थोडेफार यशस्वी होतात. परंतु त्यानंतर व्यवसाय विकासासाठी जोखिम घेणं थांबवतात. नवीन संधीचा शोध घेत नाहीत. नवीन रिसोर्सची निर्मीती करत नाहीत. फक्त आहे तो व्यवसाय टिकवण्यावर भर देतात. बचावात्मक पवित्रा घेतात. माझ्यामते असे उद्योजक फक्त कागदावरच उद्योजक असतात. मानसिकतेने ते निवृत्त उद्योजक असतात असं मला वाटतं.
मित्रांनो, उद्योजकाचा महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे 'जोखिम' व्यवसायात अग्रेसर राहण्यासाठी उद्योजकांनी सातत्याने 'अर्थपूर्ण जोखिम' घेणं गरजेचं आहे. जो जोखिम घेतो तो उदयोजक! हे सुत्र लक्षात ठेवलं पाहीजे. त्यासाठी भविष्याचा वेध घेणारा दृष्टीकोन अवलंबला पाहीजे. जगातील बाजारपेठेत होणार्‍या गोष्टींचा आढावा घेतला पाहीजे. नवीन संधींचा ठाव घेतला पाहीजे व संधींच सोनं करण्यासाठी, व्यवसाय उभारणी केली पाहीजे. आणि त्यासाठी जोखिम घेतली पाहीजे.
लक्षात ठेवा, बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते. पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही.
- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि 7666426654 या क्रमांकावर पाठ्वा...

वेबसाईट: www.born2win.in
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.
http://goo.gl/uNdKBy


11 March 2015

प्रथम दर्शनी छाप - अतुल राजोळी

अतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील दिनांक ९ मार्च २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...

नमस्कार मित्रांनो! 'माणसे जोडूया, जग जिंकूया' या माझ्या सदरा अंतर्गत मी आपल्या बरोबर अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडणार आहे. लोकांशी संवाद साधून त्यांच्याशी उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासून व त्यांचं सहकार्य मिळवून आपण नेमकी कश्या प्रकारे प्रगती करु शकतो हे आपण या सदराद्वारे समजुन घेऊ शकाल. त्याच बरोबर नक्की कोणती कृती केल्यामुळे मांडण्यात आलेल्या विचारांची आपल्याला अंमलबजावणी करता येईल यावर माझा भर असेल, आणि निश्चितच अगदी साध्या व सोप्या भाषेत मी माझे विचार व्यक्त करेन. चला तर मग 'माणसे जोडूया जग जिंकुया!'
मित्रांनो, लोकांशी नेमकं कसं वागावं आणि कसं बोलावं? हा खुप मोठा प्रश्न बहूतांश व्यक्तींना सतावत असतो. विशेषतः जर आपण व्यावसायिक वर्तुळात वावरत असाल तर नक्कीच ही गोष्ट आपल्याला जाणवत असेल. त्याच प्रमाणे जर आपण गृहीणी असाल, विद्यार्थी असाल किंवा निवृत्त व्यक्ती असाल तरीसुध्दा ती तितकीच महत्त्वाची बाब आहे. 'कार्नेगी फाउंडेशन' या संस्थेने या विषयावर रिसर्च केला, त्या दरम्यान असे निष्पन्न काढण्यात आले की, व्यक्तींची आर्थिक प्रगती ही १५% त्याच्या तांत्रिक ज्ञानावर अवलंबून असते आणि ८५% प्रगती ही परस्पर व्यवहारावर कौशल्यावर अवलंबून असते.
मित्रांनो, मी वैयक्तिक व व्यावसायिक विकास प्रशिक्षणक्षेत्रात गेल्या १० वर्षांपासुन कार्यरत आहे. हजारो व्यक्ती माझ्या विविध कार्यशाळांमध्ये भाग घेत असतात. बर्‍याच व्यक्तींशी माझा वैयक्तिक संपर्क देखिल होतो. बहुतांश व्यक्तींना परस्पर व्यवहार कौशल्याबद्दल औपचारीक शिक्षणादरम्यान मार्गदर्शन मिळालेलेच नसते व त्यामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनात प्रगती करण्यासाठी मदतीची गरज असते. 'माणसे जोडूया जग जिंकुया!' या सदरा अंतर्गत याच महत्त्वाच्या विषयाला अनुसरुन मी निरनिराळ्या संकल्पना मांडेन. आज पासुन त्याची आपण सुरुवात करुया, 'प्रथमदर्शनी छाप' कशी पाडावी या समकल्पनेपासुन!
मित्रांनो, आपली प्रथम दर्शनी छाप म्हणजे आपलं 'फर्स्ट इंप्रेशन'! असं म्हंटलं जात की 'Your first impression is your last impression.' खरं आहे, कारण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो, तेव्हा कळतनकळत त्या व्यक्तिवर आपला प्रभाव हां पडतच असतो. मग तो प्रभाव सकारात्मक असेल तर त्या व्यक्तीबरोबर आपण चांगले स्नेहसंबंध प्रस्थापित करु शकतो व भविष्यात नक्कीच त्या व्यक्तीचे सहकार्य मिळणे आपल्याला सोपे जाईल. नकारात्मक प्रभावामुळे ते शक्य होणार नाही. आपण आपली प्रथमदर्शनी छाप प्रभावशाली नक्कीच करु शकतो. प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी आपल्याकडे फारसा वेळही नसतो. फक्त काही सेकंद असतात तर मग एवढ्या कमी वेळेत हे शक्य आहे का? हो मित्रांनो! हे शक्य आहे! आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर पहिल्या 'चार सेकंदात' प्रभाव पाडू शकतो! प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी, चार सेकंद पुरेशी आहेत. या चार सेकंदांमध्ये, खालिल चार गोष्टी जाणीवपुर्वकपणे करा...
१. पहिला सेकंद-
डोळ्यात डोळे घालुन पाहा: मित्रांनो, सर्व प्रथम आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटतो, त्या व्यक्तीशी कनेक्ट होण्यासाठी आपण त्या व्यक्तीशी 'आय कॉन्टॅक्ट' करायला हवा. आपली नजर थेट त्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये असली पाहिजे. जर आपली नजर स्थिर नसेल तर त्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे आपण सहज नजरेने पाहिल्याने, त्या व्यक्तीचा चेहरा सुध्दा लक्षात राहण्यास मदत होते. कृपया डोळे वटारुन पाहू नका. आपले बघणे सहज, स्वाभाविक असु द्या!
२. दुसरा सेकंद-
स्माइल: आपल्या चेहर्‍यावर छान असे स्मितहास्य ठेवा. आपण एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदा भेटत आहात याचा आपल्याला आनंद होत आहे हे त्या व्यक्तीला जाणवू द्या. त्या व्यक्तीला भेटण्याआधी आपला मुड कसाही असला तरी त्या व्यक्तीला भेटताना मात्र चेहरा प्रफुल्लित असु द्या. लक्षात ठेवा आपण ज्या प्रमाणे त्या व्यक्तीच्या चेहर्‍याकडे पाहत आहोत त्याच प्रमाणे ती व्यक्ती सुध्दा आपल्या चेहर्‍याकडे पाहत आहे. स्मितहास्यामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये त्वरीत सकारात्मक उर्जा निर्माण होते. स्मितहास्य म्हणजे मोठमोठ्याने हसणे नव्हे! जस्ट स्माइल प्लिज!
३. तिसरा सेकंद-
हस्तांदोलनः जर प्रोफेशनल वर्तुळात वावरत असाल तर त्या व्यक्तीला भेटण्यासाठी व हस्तांदोलन करण्यासाठी आपला उजवा हात पुढे करा. जेणेकरुन त्या व्यक्तीला सुचित होईल. हस्तांदोलन करताना हाताची पकड मध्यम ठेवा. एकदम घट्ट नाही किंवा एकदमच सैलही नाही. भारतीय संस्कृतीनुसार पुरुष स्त्रीला भेटत असेल तर हस्तांदोलनासाठी पुढाकार घेण्याचा अधिकार स्त्रीकडे आहे. अश्यावेळी हस्तांदोलन ऐवजी 'नमस्ते' करु शकता.
४. चौथा सेकंद-
अभिवादन: स्पष्ट आवाजात व विनम्रपणे 'नमस्कार', ‘Good Morning’, ‘Good Afternoon’, ‘Good Evening’ असे ग्रीट करा.
मित्रांनो, चार सेकंदात आपण कोणत्याही व्यक्तीवर सकारात्मक प्रथम दर्शनी छाप पाडू शकतो. १. डोळ्यात डोळे घालुन पाहा २. स्मितहास्य करा ३. हस्तांदोलन करा ४. अभिवादन करा. महत्त्वाचं म्हणजे हे सर्व मनापासून करा. आपल्या वागणुकीमध्ये दिखावा नसला पाहिजे.
मी सांगितलेल्या चार सोप्या व परिणामकारक मंत्रांचे पालन करा व परस्पर व्यवहार कौशल्य आत्मसात करण्यासाठी पहिली पायरी उचला.
माणसे जोडूया जग जिंकुया!
ऑल द बेस्ट!

- अतुल राजोळी, बॉर्न टू विन

Whatsapp वर हा लेख मिळवण्यासाठी आपल्या मोबाईलवरील Whatsapp मधुन टाईप करा "Subscribe: Atul Rajoli (तुमचे नाव)" आणि ७६६६४२६६५४ या क्रमांकावर पाठवा...

वेबसाईट: www.born2win.in
फेसबुकः www.facebook.com/AtulRajoliBORN2WIN
संपर्कः 022-22939375/76/77/78, 7666426654, 9619465689
'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर "Maza Motivator Mitra" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा येथे क्लिक करा.


22 February 2015

हमखास यशाचा फॉंर्म्युला - अतुल राजोळी

देवाने आपणा सर्वांना जवळजवळ समान शारिरीक क्षमता आहेत, बौध्दिक क्षमतासुध्दा दिलेल्या आहेत, म्हणजेच आपल्या सर्वांचं हार्डवेअर जवळजवळ सारखच आहे परंतु प्रश्न आहे तो फक्त त्यात इंस्टॉल करण्यात आलेल्या सॉफ्टवेअरचा. ते बरोबर आहे की चुकीचं? जर सॉफ्टवेअर इंस्टॉल करायचंच असेल तर आपण यशस्वी लोकांच्या डोक्यात इंस्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरबद्दल आधी माहीत करुन घेतलेले बरं. त्याच सॉफ्टवेअरचा जर आपणसुध्दा वापर केला तर आपण त्यांनी मिळविलेल्या यशाची पूनरावृत्ती करु शकतो. मी स्वतःला सतत एक प्रश्न विचारला, तो म्हणजे, 'हमखास यश मिळवण्यासाठी कुठला फॉंर्म्युला आहे का?' 'यशस्वी माणसं कुठला समान मार्ग वापरतात ज्यातून त्यांना जे पाहिजे ते मिळतं?'

बर्‍याच आदर्श व्यक्तिमत्त्वांचा अभ्यास, पुस्तकं, प्रशिक्षण व मुलाखाती इत्यादी मधून माझ्या असं लक्षात आलं की, जरी यशस्वी माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातील असली, त्यांची ध्येय व ते साध्य करण्याचे आराखडेदेखील वेगवेगळे असले तरी त्यांच्यामध्ये काही तरी समान आहेच; आणि ते असं : सर्व यशस्वी माणसं त्यांना जे पाहिजे आहे ते मिळविण्यासाठी एका विशिष्ट क्रमामध्ये विशेष अशी पावलं उचलतात. मी या पावलांच्या क्रमाला हमखास यशाचा फॉंर्म्युला असं म्हणतो.
तुम्हाला यशस्वी उद्योजक व्हायचं असो वा गुंतवणू़कदार, शिक्षक वा उत्कृष्ट विक्रेता, वकील वा सी. ए. हा फॉंर्म्युला तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल. हा फॉंर्म्युला म्हणजे चार महत्त्वाच्या पायर्‍या आहेत.

पहिली पायरी: तुमचं ध्येय स्पष्ट करा.
तुम्हाला पाहिजे ते मिळविण्यासाठी, पहिली पायरी म्हणजे तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे ते माहिती असणं.  परंतु बर्‍याच लोकांना त्यांना जे पाहिजे आहे ते मिळत नाही कारण त्यांना नेमकं काय पाहिजे आहे हेच त्यांना माहिती नसतं. बरेच लोक म्हणतात की त्यांना यशस्वी व्हायचं आहे, पण त्यांना जर विचारलंत की म्हणजे नेमकं काय? तर बर्‍याच जणांचं उत्तर असतं 'नक्की काय ते माहित नाही' किंवा काही तरी ढोबळ उत्तर असतं 'मला सुखी व्हायचं आहे', 'मला खूप पैसा कमवायचा आहे', 'मला माझ्या सर्व अडचणींवर मात करायची आहे', वगैरे वगैरे. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की जोपर्यंत आपल्याला आपलं ध्येयंच माहीत नाही तोपर्यंत आपल्याकडील क्षमतेचा, वेळेचा व इतर साधनसामुग्रीचा वापर कसा करावा हेच आपल्याला कळणार नाही. यशस्वी माणसांचा हा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म असतो असं मला प्रकर्षाने जाणवलं. त्यांना नेमकं काय पाहिजे आहे, भविष्याबद्दलची त्यांची संकल्पना त्यांच्या मनामध्ये स्पष्टपणे कोरली गेलेली असते. त्यांची ध्येयं निश्चित व नेमकी असतात आणि म्हणूनच त्या दिशेने ते प्रयत्न करतात. सचिन तेंडुलकरला त्याच्या लहानपणापासून एकच माहीत होतं 'मला भारतासाठी क्रिकेट खेळायचं आहे. बस्स', भविष्याबद्दलचं त्याच्या मनातील चित्र हे स्पष्ट होतं आणि म्हणूनच तो रात्रंदिवस फक्त एक गोष्ट जगायचा ती म्हणजे 'क्रिकेट'. त्यामुळेच तो भारताचा मास्टर ब्लास्टर आहे. याचप्रमाणे जर इतर यशस्वी माणसांचा अभ्यास केला तर हीच समान बाब जाणवते की त्यांची ध्येयं ही स्पष्ट होती. आमच्या 'लक्ष्यवेध' प्रशिक्षणक्रमामध्ये, माझा हाच प्रयत्न असतो. लोकांना नेमकं काय पाहिजे आहे याचं स्पष्ट चित्र त्यांना बघायला लावणं व ते नेमक्या शब्दात कागदावर मांडणं. आपल्या मेदूंला नेमक्या शब्दात सूचना मिळाल्या की त्याची कार्यक्षमता किती तरी पटींनी वाढते.

दुसरी पायरी: ध्येयं साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा.
जर आपली ध्येयंच स्पष्ट नसतील तर ती साध्य करण्यासाठी आराखडा कसा काय बनविणार? कंपनीचा टर्नओव्हर पाच कोटी करण्यासाठीचा आराखडा, पन्नास कोटी करण्यासाठीचा आरा़खडा हा वेगवेगळाच असतो परंतु तो तेव्हाच आपण तयार करु शकतो जेव्हा आपलं ध्येयं स्पष्ट असेल. पण आराखडा बनविणं म्हणजे नेमकं काय? आराखडा बनविणं म्हणजेच तुमचं ध्येयं साध्य करण्यासाठी कराव्या लागणार्‍या कृतींची क्रमवार मांडणी करणं. उदाहरणार्थ: जर तुम्हाला अंधेरी ते चर्चगेट प्रवास करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी क्रमवारपणे कराव्याच लागतील. तुम्हाला आधी अंधेरी स्टेशनवर येऊन तिकीट काढावं लागेल, मग प्लॅटफॉर्मवर जावं लागेल, ट्रेन पकडावी लागेल व चर्चगेट स्टेशनवर उतरावं लागेल. ह्या क्रमवार कृती तुम्हाला कराव्या लागतील. तुमचं ध्येयं साध्य करण्यासाठी जो आराखडा बनवाल त्याचा क्रम खूप महत्त्वाचा आहे व आराखडा बनविण्याआधी योग्य संशोधन केलं पाहिजे व मगच आराखडा तयार केला पाहिजे. आराखडा लेखी स्वरुपात कागदावर उतरवावा.

तिसरी पायरी: आराखडयाशी संलग्न कृती करा.
तिसरी पायरी म्हणजे आपलं ध्येयं साध्य करण्यासाठी आपल्या आराखड्याशी संलग्न कृती करणं होय. हीच पायरी आपल्याला आपल्या ध्येयाच्या जवळ घेउन जाते. यशस्वी माणसं व फक्त स्वप्नं बघणार्‍यांमध्ये जर कुठला फरक असेल तर तो म्हणजे संलग्न 'कृती'. बर्‍याच सुरक्षित व हुशार माणसांना माहीत असतं की आपणास काय केलं पाहीजे, कसं केलं पाहिजे पण ते कृती करतच नाहीत. ते म्हणतात ना, 'कळतं पण वळत नाही'. आपल्याला खरोखरच जर आपलं ध्येय साध्य करायचं असेल तर कृती ही केलीच पाहीजे. तुम्हाला अशी व्यक्ती माहीत आहे का, जी तुमच्यापेक्षा कमी गुणवान आहे पण तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आहे? जर उत्तर हो असेल तर लक्षात घ्या, जरी तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा हुशार असलात तरी त्या व्यक्तीने तुमच्यापेक्षा जास्त कृतीवर भर दिला असणार. संलग्न कृती करण्यासाठी मानसिक व शारीरिकरीत्या सक्षम असणं अत्यंत आवश्यक असतं. आपल्या भावनांवर ताबा मिळवून, जोशात व आत्मविश्वासाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणं गरजेचं आहे.

चौथी पायरी : अपयशातून शिका
जेव्हा आपण आपल्या आराखड्यानुसार संलग्न अशी कृती करतो तेव्हा फक्त दोन गोष्टी घडण्याची शक्यता असते. एक: तुम्ही ध्येयाच्या दिशेने यशस्वी वाटचाल करता किंवा ध्येय साध्य करता आणि दोन: तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाहीत, काही तरी अनपेक्षित घडतं. आपल्यातले बरेच लोक याला 'अपयश' असं म्हणतात! अपयश सर्वांच्या आयुष्यात येतं का?  हो अर्थातच. तुम्ही मला एक यशस्वी माणूस शोधून दाखवा ज्याने कधी अपयश अनुभवलं नाही. उलट तुमचा जेवढा कृतीवर भर जास्त तेवढं अपयशाचं प्रमाण जास्त आणि म्हणूनच माझ्या संशोधनामध्ये मला असं आढळून आलं की माणूस जेवढा यशस्वी,त्याच्या आयुष्यात अपयशाचं प्रमाण तेवढंच जास्त.

अपयशाला तोंड देण्याचे तीन पर्याय :

पर्याय क्रमांक एक: कारण देणं, आरोप प्रत्यारोप करणं व सोडून देणं. काही माणसं अपयश मिळालं की इतर गोष्टींना कारणीभूत ठरवतात किंवा इतरांवर अपयशाचं खापर फोडतात. त्यांना वाटतं की ध्येय साध्य करणं त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. ते निराश होतात व पुन्हा कृती करण्याच्या भानगडीतच पडत नाहीत. ते म्हणतात, "मी प्रयत्न केला व फसलो आता पुन्हा नाही".

पर्याय क्रमांक  दोन: त्याच कृतीची पूनरावृत्ती करणं. ही माणसं प्रयत्नशील माणसं असतात. अपयशानंतरसुध्दा गप्प बसत नाहीत व पुन्हा प्रयत्न करतात. त्यांना असं वाटतं 'आपण जास्त कसोशीने प्रयत्न करुया, जास्त मेहनत करुया व आधी केलेली कृती पुन्हा करुया'. जर आपण एकाच कृतीची पुनरावृत्ती केली व प्रत्येक वेळी वेगळा परिणाम अपेक्षित केला तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल. जर आपण तेच केलं जे आधी केलं होतं तर आपल्याला तेच मिळेल जे आपल्याला आधी मिळालं होतं.

पर्याय क्रमांक तीन: शिका, आराखडयात योग्य बदल करा आणि कृती करा.
हा पर्याय जो सर्व यशस्वी माणसं वापरतात. जेव्हा ते आपलं ध्येय साध्य करीत नाहीत तेव्हा ते त्याला 'अपयश' मानत नाहीत. ते त्यातून नवीन काही तरी शिकतात. ते शिकतात की त्यांनी तयार केलेला आराखडा परीणामकारक नव्हता किंवा त्यांच्या कृतीमध्ये कुठे तरी कमतरता होती. नवीन शिकवण घेऊन ते आपल्या आराखड्यामध्ये योग्य ते बदल करतात व पुन्हा कृती करतात.

जर पुन्हा ते अपयशी झाले तर त्यातून ते पून्हा नवीन काही तरी शिकतात, आराखड्यात योग्य ते बदल करतात आणि त्याप्रमाणे कृती करतात. असं ते तोपर्यंत करतात, जोपर्यंत त्यांचं ध्येयं साध्य होत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी ते सर्व काही करतात.

मित्रांनो, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा जेव्हा आपणास यश मिळत नाही तेव्हा तेव्हा आपल्याला त्यातून नवीन काही तरी शिकलं पाहीजे. आपल्या प्रयत्नांमध्ये बदल केले पाहीजेत, जोपर्यंत आपलं ध्येयं साध्य होत नाही तोपर्यंत! असं म्हंटल जातं की थॉमस एडीसनने विजेच्या बल्बचा शोध लावण्यासाठी एकूण १०,००० वेळा प्रयत्न केले. जेव्हा त्याला त्याबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्याचं म्हणणं होतं की'प्रत्येक अयशस्वी प्रयत्नानंतर मी माझ्या पध्दतीमध्ये बदल केला व माझं ध्येय साध्य झालं. पहिल्या ९९९९ प्रयत्नांतून मी बल्ब कसा बनविला जात नाही, हे शिकलो!'

मित्रांनो, तर हा होता 'हमखास यशाचा फॉर्म्युला' यातील चार पायर्‍या नक्कीच तुम्हाला जे पाहिजे आहे ते मिळवून देण्यास मदत करतील, अशी आशा करतो.

हमखास यशाचा फॉर्म्युला :
१) तुमचं ध्येय स्पष्ट करा.
२) ध्येय साध्य करण्यासाठी आराखडा तयार करा.
३) आराखड्याशी संलग्न कृती करा.
४) अपयशातून शिका.

- अतुल राजोळी

11 February 2015

केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे! Just do it! - अतुल राजोळी

नमस्कार मित्रांनो,
माझे गुरू डॉ. डेव्हीड लिंकन, ज्यांच्याकडून मी NLP शिकलो, त्यांनी मला यशाचा एक जबरदस्त कानमंत्र दिला. त्यांनी मला सांगितले की, "To be successful you need to follow a simple formula for success... 'Just do it'...!" हा फॉर्म्युला ऐकून मी सुरुवातीला थोडासा चक्रावलो! मी सरांना म्हटलं की, "Sir, is it really a formula for success? As far as I know it's a tagline of NIKE!" आम्ही दोघेही हसलो. मग सर म्हणाले की, "अतुल, सृष्टी फक्त अशाच माणसांना मदत करते जे कृती करतात. सृष्टीची कृपादृष्टी जे आपण करतो त्यावर असते, जे आपण जाणतो त्यावर नव्हे! हा फंडा समजायला फार सोपा आहे परंतु बरीच माणसं बरंच काही करतात परंतु त्यांना जे खरोखर हवे आहे त्या दिशेने कृती मात्र करत नाही. प्लॅनिंग करणं नक्कीच महत्त्वाचं आहे. परंतु बरीच माणसं फक्त प्लॅनिंग करतात, विचार करण्यात बराच वेळ घालवतात. आणि कोणत्या तरी मुहूर्ताची वाट पाहत बसतात. त्यांना असं वाटतं की, योग्य वेळेवर आपण कृती करू. आणि योग्य वेळ त्यांच्या आयुष्यात कधी येत नाही आणि यशापासून ते वंचित राहतात! या उलट कृती केल्याने आपल्या विचारांना चालना मिळते, आयुष्याला ऊर्जा प्राप्त होते व आपल्या आजूबाजूला  सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला परिणाम प्राप्त होतात." मित्रांनो आजपासून जवळजवळ चार वर्षांपूर्वी सरांनी मला दिलेल्या या मंत्राला मी प्रामाणिकपणे आचरणात आणलं. मी आणि बॉर्न टू विनच्या आमच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत नेहमी जास्तीतजास्त कृतीवर भर दिला. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की, जे परिणाम आम्हाला प्राप्त झाले ते खरोखरच जबरदस्त आहेत. 'Just do it...!' या साध्या व सोप्या मंत्राचा इतका फायदा होईल हे त्या वेळी मला जाणवलं नव्हतं.
मित्रांनो, आज माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की, कृतीमध्ये प्रचंड ताकद आहे. यश मिळवण्यासाठी कृती करणं अत्यावश्यक असतं. आपल्याकडे जगातील सर्व ज्ञान असेल परंतु आपण काही कृतीच केली नाही व त्या ज्ञानाचा वापरच केला नाही तर काय उपयोग? जर आपली स्वप्नं मोठी आहेत, ती स्वप्नं साकार करण्याची क्षमतादेखील आहे. परंतु ती स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक कृतीच आपण केली नाही तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. बर्‍याच वेळा तो असा विचार करतो की, मी त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. परंतु तो काहीच करत नाही. तर त्याला काय प्राप्त होईल? `काहीच नाही`.
BMW ही एक उत्कृष्ट कार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ती कार फक्त शोरूम किंवा गॅरेजमध्ये पडून असेल तर त्या कारचा काय फायदा? जोपर्यंत कोणी तरी त्या कारमध्ये बसून तिचं इंजिन सुरू करत नाही तोपर्यंत त्या कारच्या खर्‍या क्षमतेला काही अर्थ नाही. जेव्हा कारचं इंजिन सुरू असेल आणि ती वेगात पुढे जात असेल तेव्हाच त्या इंजिनचा वापर होईल  व इतर माणसं त्या कारला डोळे विस्फारून पाहतील!

कृतीमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते
बहुतांश माणसं जी आपल्या खर्‍या क्षमतेचा कधीच ठाव घेत नाहीत, त्यांच्याकडे स्वप्नंच नसतं किंवा जर स्वप्नं असेल तर ते साकार करण्यासाठी ते कृतीच करत नाहीत. जगातील प्रत्येक माणसामध्ये प्रचंड क्षमता आहे.
यातील बरीच माणसं आपल्या खर्‍या क्षमतेचा ठाव घेतल्याशिवायच संपूर्ण आयुष्य जगतात. बरीच माणसं संपूर्ण आयुष्यभर असं काही करतात जे त्यांना अजिबात आवडतच नाही. बरीच माणसं आपल्या मनाविरुद्ध आयुष्य जगातत. त्यांना जाणवत असतं की, आपल्यामध्ये काही तरी असामान्य दडलेलं आहे परंतु कोडं कधीच उलगडत नाही. अशा व्यक्तींना वाटत असतं की, "माझ्याकडे खूप पैसे असते तर किती बरं झालं असतं.", "मला चांगली नोकरी मिळाली असती तर फार छान झालं असतं", "माझं शिक्षण जास्त झालं असतं तर मी प्रगती करू शकलो असतो. "अशा व्यक्तींच्या फक्त बर्‍याच इच्छा असतात. परंतु त्या इच्छांचं रूपांतर स्वप्नांमध्ये व ध्येयांमध्ये ते करत नाहीत व त्याला अनुसरुन ते कृती कधीच करत नाहीत. कृतीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कृती केल्याने आपली देहबोली बदलते. आपण उत्साही बनतो. आपली मन:स्थिती टवटवीत होते. एक उदाहरण पाहू या, आपण कधीतरी संध्याकाळी दमून भागून घरी येतो. दिवसभराच्या दगदगीमुळे शारीरिक व मानसिकरीत्या प्रचंड थकवा आपल्याला जाणवत असतो. आपण घरी आल्या आल्या झोपण्यासाठी गादीवर आडवे व्हायच्या मन:स्थितीत असतो आणि अचानक आपल्याला एक फोन येतो आणि आपल्याला सांगण्यात येतं की जो प्रोजेक्ट आपण बर्‍याच दिवसांपासून मिळवण्याच्या प्रयत्नात होतो तो आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी दोन दिवसांत रिपोर्ट सबमीट करावा लागणार आहे. हे कळताच क्षणी आपला आनंद गगनात मावत नाही, आपला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. आपण चटकन फ्रेश होतो, कपडे बदलतो व आपल्या सहकर्मचार्‍यांना फोन करून ही आनंदाची बातमी सांगतो. आपली देहबोली बदलते. आपण पुढच्या दोन दिवसांसाठी आपली कृती योजना बनवतो व रिपोर्ट तयार करण्याच्या तयारीला लागतो. आपण आपोआपच सकारात्मक मन:स्थितीत येतो. नकारात्मक मन:स्थिती व थकवा कुठल्याकुठे उडून जातो!




कृतीमुळे भीती दूर होते!
बरीच माणसं कृती न करण्यामागचं कारण असतं अपयशाची भीती! भीतीला इंग्रजीमध्ये FEAR म्हणतात. FEAR चा माझ्या मते अर्थ पुढील प्रमाणे असला पाहिजे. 'False Enemy Appearing Real' म्हणजेच भीती म्हणजे आपला असा शत्रू तो खरा अस्तित्वातच नसतो परंतु आपल्या मनात त्याचे असे रक्तरंजित चित्र आपण निर्माण करतो की, तो खरा वाटू लागतो. या स्वकल्पित शत्रूला आपण एवढे घाबरतो की, आपण कृती करत नाही. विरोधाभास असा की, भीतीवर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे कृती!
आपल्या मनात कोणतीही भीती ही अजाणतेपणामुळे किंवा भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे निर्माण झालेली असते. आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपण काही ना काही परिणाम साध्य करतो व त्यातून अनुभव निर्माण करतो. या अनुभवमुळे आपला आत्मविश्वास वाढतो व भीतीचा अंत होतो. या उलट आपल्याला एखाद्या गोष्टीच्या भीतीने पछाडले असताना आपण काहीच कृती करत नाही तेव्हा आपला अजाणतेपणा आणखी वाढतो, त्यामुळे आपला आत्मविश्वास आणखी ढासळतो व भीती आणखी वाढते.
मित्रांनो, माझा एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मला पोहता येत नाही. माझ्या पाण्याच्या भीतीमध्ये आणखी भर पडली जेव्हा माझ्या एका चांगल्या मित्राचं तलावात बुडून निधन झालं. माझी पाण्याबद्दलची भीती दिवसेंदिवस वाढू लागली. मी त्यावर काही कृतीदेखील केली नाही. एक दिवस मी मुद्दाम पाण्याची भीती दूर करायचं ठरवलं. लाईफ जॅकेट घालून मित्रांच्या मदतीने तलावात उतरलो व पाण्यात पोहण्याचा अनुभव घेतला. सुरुवातीला अक्षरश: माझी फाफरली होती. परंतु थोड्या वेळानंतर मी एंजॉय करत होतो. आता मला पाण्याची भीती वाटत नाही !
माझ्या अनुभवारून मी ठामपणे सांगू शकतो की, भीती वाटली की बिनधास्तपणे कृती करा.




कृतीमुळेच परिणाम साध्य होतात
कृतीमुळे काही ना काही परिणाम साध्य होतोच मग तो अपेक्षित परिणाम असेल किंवा अनपेक्षित. कृती केल्यावर काहीच परिणाम साध्य झाला नाही असं होणारच नाही. उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याने आपलं प्रेझेंटेशन ग्राहकासमोर केल्यानंतर ग्राहक `हो` तरी म्हणतो किंवा काही तरी कारण सांगून टाळाटाळ करतो.
परंतु सांगायचा मुद्दा हा आहे की, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम साध्य होतोच.
यशस्वी माणसं सतत कृती करतात. त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाल्यानंतर पुढील उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृती करतात. जर त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत तर परिणामांचं आणि कृतीचं विश्लेषण करतात व आपल्या कृतीमध्ये योग्य तो बदल करून पुन्हा कृती करतात. अपेक्षित परिणाम साध्य होईपर्यंत आपल्या कृतीमध्ये सतत बदल करतात !
कृती करण्याची योग्य वेळ कोणती?
आज, आत्ताच मुहूर्त टाळू नका!
कृतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चालढकल करणं!
बर्‍याच माणसांना ठाऊक असतं की, आपण काय केलं पाहिजे परंतु ते कृती करण्यासाठी चालढकल करत असतात. चालढकल करण्यामागची बरीच कारणं आहेत. प्रमुख कारण भीती हेच असलं तरी आळशीपणा हादेखील कृतीच्या आड येत असतो. कृती करण्याच्या आड काहीही येऊ दे, भीती किंवा आळशीपणा, या दोन्ही गोष्टींना झटकण्यासाठी मुहूर्ताच्या शोधात राहू नका! मला विचाराल की कृती करण्याची योग्य वेळ कोणती? मीं म्हणेन की, आत्ता हीच वेळ आहे कृती करण्याची. आत्ता, ह्याच क्षणी आपण ताबडतोब कृती केली पाहिजे. जास्त विचार करू नका. आत्ता तडक उठा आणि कामाला लागा. लक्षात ठेवा, कृती केल्यानेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कृतीमुळेच भिती नाहीशी होते आणि कृतीमुळेच परिणाम साध्य होतात. म्हणूनच आत्ता ह्या क्षणाचा मुहूर्त टाळू नका!
खालील पायर्‍या आपल्याला आत्ता ह्या क्षणी कृती करण्यासाठी प्रेरक ठरतील.
१) एक कागद घ्या आणि पेन घ्या आणि अशा पाच कृती लिहा ज्या बर्‍याच लहानात लहान कृती असेल्या तरी चालेल. एखादा फोन कॉल, ई-मेल, पुस्तक वाचणं, एखादं ताटकळत राहिलेलं काम. काहीही असो. कमीत कमी पाच कृतींची यादी बनवा.
२) उठा, आता एक-एक काम एका मागोमाग एक सरळ करून टाका. आज दिवस संपण्याच्या आत कमीत कमी एक गोष्ट तरी करून टाका. (नाही तर मी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन त्रास देईन !!!)
Just do it!
केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे!
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Share

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites